अभिव्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या ठाकरे बंधूंनी पूर्णतः बदलूनच टाकलेली दिसते. विशेषकरून जेव्हा उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री असताना सौम्य टीका झाली, तेव्हाही टीकाकारांचा आवाज दाबून त्यांना थेट तुरुंगात डांंबले गेले. मात्र, आता जंतरमंतरवरील आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील असभ्य भाषेत बरळलेल्या ‘झुरळां’वर कारवाई नको, म्हणून ठाकरेंनी त्यांचे समर्थनच केलेले दिसते.
अभिनेत्री कंगना राणावतने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिप्पणी केल्याने, सूडबुद्धीने पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयातील काही भाग बुलडोझरने पालिकेने तेव्हा पाडला होता. आरजे मलिष्काच्या मुंबईतील खड्ड्यांवरील विडंबनात्मक गीतानंतर तिच्या घरीही पालिकेच्या पथकाने डेंग्यूच्या अळ्या सापडल्या म्हणून धडक कारवाईची तत्परता दाखविली होती. एवढेच नाही तर मविआच्याच काळात सूडबुद्धीने पत्रकार अर्णब गोस्वामी यांनादेखील अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी घरात घुसून अटक केली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात २०२० साली गोस्वामी यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
त्यातूनच पुढे या प्रकरणात गोवून गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. कोकणात उद्धव ठाकरेंवर टीका केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनादेखील २०२१ साली ऑगस्टमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान अटक केली होती. ठाकरेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिलादेखील ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याव्यतिरिक्त पत्रकार राहुल कुलकर्णी, समित ठक्कर यांना अटक, माजी नौदल अधिकार्याला ठाकरेंवरील चित्र शेअर केल्याप्रकरणी मारहाण, आव्हाडांनी करमुसेंना केलेली जीवघेणी मारहाण अशी ही यादी मोठी आहे.
त्यामुळे जेव्हा हातात सत्ता होती, तेव्हा ठाकरेंना त्यांच्यावरील अगदी साधी टीकाही झोंबली आणि त्यांनी पोलिसी बळाचा असा गैरवापर केला. आज तेच ठाकरे पितापुत्र आंदोलकांवर कारवाई नको म्हणून अशा बेताल ‘जेन-झीं’चे खुले समर्थन करताना दिसतात. त्यामुळे ठाकरेंच्या तोंडून अभिव्यक्तीचे धडे मुळी शोभतच नाहीत. कारण, शेवटी त्यांच्या चष्म्यातून दिसणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे असे पराकोटीचे सोयीस्कर!
अन्न हे पूर्णब्रह्म!
आपल्या हिंदू संस्कृतीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असे म्हटले जाते. त्यामुळे अन्नप्राशन करत असताना त्यास नमस्कार करून, देवाचे आभार मानून ते सेवन करण्याचे जुनेच संस्कार. कारण, आपल्या अन्नपदार्थांच्या सेवन सवयींवरच आरोग्य अवलंबून असते. म्हणूनच म्हणतात ना, ‘जसे खाल, तसे व्हाल.’ याच बाबतीत जर ती लहान मुले असतील, तर हा विषय अजूनच नाजूक, महत्त्वाचा आणि कळीचा बनतो. कारण, वाढत्या वयात योग्य आचार, योग्य विचार जसा महत्त्वाचा, तसाच योग्य आहारदेखील महत्त्वाचा. या सर्व दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘ईट राईट स्कूल कॅम्पेन’ मनावर घेऊन जी पावले उचलली आहेत, ती स्वागतार्ह अशीच. त्यानुसार, आता शाळेच्या ५० मीटर परिसरात ‘हाय फॅट, शुगर’ प्रकारातील अन्नपदार्थांची विक्री, जाहिरात, मोफत वितरण आणि वितरणास प्रतिबंध घातलेला असून, याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची व स्थानिक शालेय समितीची असेल.
राज्यात १ लाख, ८ हजारांच्या आसपास शाळांना आणि दोन कोटींच्या आसपास विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू असेल. विशेषतः पालकवर्ग या भूमिकेने खूपच आनंदी झालेला आहे. कारण, आपल्या मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापासून कसे रोखायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. घरातून दिलेला डबा अनेकवेळा तसाच परत येतो किंवा खोटी कारणे सांगून अर्धाच खाल्ला जातो, असा बहुतांशी पालकांचा अनुभव. काही मुले अगदी पाणीसुद्धा कमीच पितात. कारण, त्यांचा कल हा ‘सॉफ्ट ड्रिंक’कडे जास्त. ही चिंता सर्वांनाच भेडसावत होती.
हल्ली सर्वत्र लहान मुले चिप्स, सॉफ्ट ड्रिंस, जंक फूड सर्रास खाताना दिसतात. घराबाहेर पडलो की, पालकांना यासाठी हट्ट करणारी, रडणारी मुले आपण सर्रास पाहतो. माध्यमांवरील जाहिराती साहजिकच त्याच भर घालतात. पण, अशा या जंक फूडच्या अतिसेवनामुळे हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, पचनसंस्था कमकुवत होणे, एकाग्रता कमी होणे, शैक्षणिक कामगिरीवर परिणाम अशा आरोग्याच्या तक्रारी लहान वयातच विद्यार्थ्यांना सुरू होतात. यावर आता थोडा प्रतिबंध येईल. सुरक्षित सकस व संतुलित आहार मिळावा, यासाठी आता सर्व स्तरांतून प्रयत्न होतील. यानिमित्ताने पाल्यांच्या आहाराबाबतदेखील फलदायी चर्चा सुरू होऊन, भविष्यात त्यास प्राधान्यक्रम येऊन ‘सुदृढ महाराष्ट्र’ पाहायला मिळेल, अशी आशा...
- अभिनंदन परूळेकर