१९ वर्षांनंतर तस्लीमा नसरीन यांचे कोलकात्यात पुनरागमन

लेखन आणि पुस्तकांवरून झालेल्या हिंसक आंदोलनांमुळे सोडावे लागले होते शहर

    31-Jul-2026   
Bengali Literature
 
मुंबई : ( Bengali Literature) बांग्लादेशच्या निर्वासित लेखिका तस्लीमा नसरीन तब्बल १९ वर्षांनंतर शुक्रवारी कोलकात्यात दाखल झाल्या. या पुनरागमनाला त्यांनी अत्यंत भावनिक क्षण संबोधत, "जणू मी माझ्याच देशात परतले आहे," अशी भावना व्यक्त केली. कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी स्वागतासाठी आलेल्या उपस्थितांना हात जोडून अभिवादन केले आणि "येथे परत आल्याने मला खूप आनंद होत आहे," असे सांगितले. नोव्हेंबर २००७ नंतरचा हा त्यांचा पहिलाच कोलकाता दौरा आहे. त्यावेळी त्यांच्या लेखन आणि पुस्तकांवरून झालेल्या हिंसक आंदोलनांमुळे त्यांना शहर सोडावे लागले होते.(Bengali Literature)
 
शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी रवींद्र सदन येथे धार्मिक कट्टरतावादाविरोधातील आयोजित साहित्यिक कार्यक्रमात त्या सहभागी होणार असून कविता वाचनही करणार आहेत. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी तसेच ज्येष्ठ साहित्यिक शीर्षेंदू मुखोपाध्याय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कार्यक्रम साहित्यकेंद्रित असला, तरी पश्चिम बंगालमधील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक भावना या मुद्द्यांवर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.(Bengali Literature)
 
कोलकात्यात येण्यापूर्वी तस्लीमा नसरीन यांनी सांगितले होते की, येथे परत येणे म्हणजे माझ्यासाठी माझ्याच देशात परतल्यासारखे आहे. बांग्लादेश सोडल्यानंतर त्या कोलकात्याला आपले दुसरे घर मानत आल्या आहेत. त्या म्हणाल्या, "माझ्या मनात बंगाल कधीच सीमा किंवा काटेरी तारांनी विभागला गेला नाही. पूर्व बंगालचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले आहेत. त्यामुळे सध्या बंगालचा हा भागच माझे घर आहे. मी आनंदासोबत वेदनाही घेऊन परतत आहे. कोलकात्याने मला घर, मित्र, वाचक आणि आपुलकी दिली; मात्र नंतर मला हे शहर सोडण्यास भाग पाडण्यात आले.(Bengali Literature)
 
तस्लीमा नसरीन यांनी स्पष्ट केले की, त्यांचे हे पुनरागमन केवळ वैयक्तिक नाही, तर त्या आवाजाच्या पुनरागमनाचे प्रतीक आहे, ज्याला धार्मिक कट्टरतावाद्यांनी कधीकाळी गप्प करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे तसेच सध्याच्या पश्चिम बंगाल सरकारचे आभार मानले. त्यांच्या प्रवासाची सोय आणि सुरक्षा व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी सरकारचे कौतुक केले. कोणत्याही सरकारची विचारधारा काहीही असो, लेखकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्याचा मूलभूत अधिकारच राहिला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.(Bengali Literature)
 
कोलकाता का सोडावे लागले होते?
 
आंदोलने इतकी तीव्र झाली होती की, काही भागांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारने तस्लीमा नसरीन यांना कोलकाता सोडण्यास सांगितले. त्यांना प्रथम जयपूर, त्यानंतर दिल्ली येथे हलविण्यात आले आणि पुढे त्या परदेशात गेल्या. त्यानंतर त्यांनी अनेकदा किमान साहित्यिक कार्यक्रमांसाठी तरी कोलकात्यात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र जवळपास १९ वर्षे त्यांचे पुनरागमन होऊ शकले नाही. या काळात अनेक साहित्यिक, सामाजिक संस्था आणि काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या पुनरागमनाची मागणी केली होती.(Bengali Literature)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर