मुंबई (अक्षय मांडवकर) - नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, प्रतिकूल हवामान आणि कठीण नैसर्गिक परिस्थिती अशा सर्व आव्हानांवर मात करत पुनर्वसित भारतीय गिधाड 'J132' ने जंगलातील जीवनाशी पूर्णपणे जुळवून घेतल्याचे यशस्वी उदाहरण समोर आले आहे (Indian Vulture 'J132') . बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) आणि महाराष्ट्र वन विभागाच्या गिधाड संवर्धन कार्यक्रमांतर्गत ७ जून २०२६ रोजी नाशिक येथे या गिधाडाला मुक्त करण्यात आले होते (Indian Vulture 'J132'). या गिधाडाने सलग ५४ दिवस जंगलात यशस्वी वास्तव्य करत १ हजार ६१८ किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. (Indian Vulture 'J132')
J132 हे भारतीय गिधाड बंदिस्त अधिवासात जन्मास आलेले गिधाड आहे. डिसेंबर २०२५ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पातून पहिल्यांदा मुक्त केल्यानंतर त्याने सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास करून नाशिक गाठले होते. त्यानंतर शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्याला पुन्हा पकडण्यात आले. दुसऱ्या प्रयत्नानंतरही अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र तिसऱ्या प्रयत्नात J132 ने उत्कृष्ट दिशाज्ञान, योग्य अधिवासाची निवड, प्रतिकूल हवामानात संयमाने वावरण्याची क्षमता आणि वन्य गिधाडांच्या थव्यात त्याने मिळवलेले स्थान अशा सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. यंदाच्या दमदार पावसाळ्यात J132 ची खरी कसोटी लागली होती. उपग्रह-आधारित ट्रॅकिंग (Satellite Telemetry) आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय निरीक्षणातून असे दिसून आले की, मुसळधार पावसाच्या काळात या गिधाडाने अनावश्यक उड्डाण टाळत सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. ही वर्तणूक पूर्णपणे नैसर्गिक असून वन्य गिधाडांमध्ये आढळणाऱ्या जगण्याच्या प्रवृत्तीशी सुसंगत असल्याचे संशोधकांनी बीएनएचएसचे वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ मनन सिंग महादेव यांनी सांगितले.
जुलैच्या उत्तरार्धात उत्तर नाशिक परिसरात झालेल्या अतिवृष्टीदरम्यानही J132 सुरक्षित राहिले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर त्याने पुन्हा नियमित उड्डाणे सुरू केली. यापूर्वी १० जुलै रोजी हवामान सुधारताच त्याने तब्बल ८१ किलोमीटरचे उड्डाण केले असून, उड्डाणादरम्यान ताशी ७६ किलोमीटरपर्यंत वेग नोंदविण्यात आला होता. पुनर्वसित गिधाडासाठी पावसाळा हा सर्वांत कठीण काळ मानला जातो. उड्डाणासाठी अनुकूल उष्ण हवेचे प्रवाह कमी असणे, खाद्य शोधण्यातील अडचणी आणि सततचे प्रतिकूल हवामान या परिस्थितीत J132 ने दाखविलेली तग धरण्याची क्षमता ही गिधाड संवर्धन कार्यक्रमासाठी अत्यंत आशादायी बाब आहे. भविष्यात संकटग्रस्त भारतीय गिधाडांच्या पुनर्वसनासाठी हा अनुभव महत्त्वाचा मार्गदर्शक ठरणार असल्याचे संशोधकांनी नमूद केले.
महत्त्वाचे निरीक्षण
निरीक्षणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे, डोल ओहोल आणि देवडोंगरा परिसरात J132 हे अनेक वन्य गिधाडांसोबत वावरताना दिसले. मुसळधार पावसाच्या दिवसांमध्येही त्याने इतर गिधाडांसह मृत जनावरांच्या शवांवर स्वतंत्रपणे खाद्य मिळवून खाल्ल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. त्यामुळे पुनर्वसित गिधाडाने केवळ जंगलात तग धरली नाही, तर वन्य गिधाडांच्या समूहात पूर्णपणे मिसळून नैसर्गिक वर्तन आत्मसात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपग्रह निरीक्षणामुळे J132 च्या हालचालींची सविस्तर माहिती उपलब्ध झाली आहे. गेल्या आठ आठवड्यांत या गिधाडाने नियमित उड्डाणे करत उत्तर नाशिकमधील गिधाडांसाठी महत्त्वाच्या अधिवासांचा शोध घेतला. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील वलसाड परिसरापर्यंत त्याने भ्रमंती केली असून १७ जून रोजी एका दिवसात त्याने केलेले तब्बल १६८ किलोमीटरचे सर्वाधिक उड्डाण नोंदविण्यात आले आहे. - मनन सिंग महादेव, वरिष्ठ जीवशास्त्रज्ञ, बीएनएचएस