पॅलेट गनची सुरुवात काँग्रेसनेच काश्मीरमध्ये केली; राहुल गांधींच्या वक्तव्यावर बारामुलाचे खासदार रशीद शेख यांचा पलटवार

    31-Jul-2026   
Rahul Gandhi
 
मुंबई : (Rahul Gandhi) संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी अँटी पेपर लीक विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत मोठा गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २० जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरण्याचे आदेश दिले, असा आरोप त्यांनी केल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. जम्मू-काश्मीरमधील बारामुला मतदारसंघाचे खासदार इंजिनिअर रशीद (रशीद शेख) यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला. त्यांनी काँग्रेसवरच काश्मीरमध्ये पॅलेट गनच्या वापराची सुरुवात केल्याचा आरोप केला. (Rahul Gandhi)
 
राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना रशीद शेख म्हणाले की, आज पॅलेट गनच्या वापराबाबत चर्चा होत आहे, मात्र इंडिया आघाडीतील नेत्यांनी हे लक्षात ठेवावे की काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर २०१० मध्ये काँग्रेस सरकारच्या काळातच सुरू झाला होता. त्यांच्या मते, त्या काळात पॅलेट गनच्या वापरामुळे सुमारे १५० जणांचा मृत्यू झाला. त्यांनी राहुल गांधींना प्रश्न विचारला की, जर विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर झाला असेल तर तो निश्चितच चुकीचा आहे; पण काश्मीरमध्ये पॅलेट गनमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेकडो मुलांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? (Rahul Gandhi)
 
संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांचे नाव घेऊन असा गंभीर आरोप करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत. रिजिजू म्हणाले, "जर गृहमंत्र्यांनी असा आदेश दिला असेल, तर त्या आदेशाची प्रत सभागृहात सादर करा. आदेश क्रमांक सांगा आणि कोणत्या अधिकाऱ्याला असा निर्देश देण्यात आला होता, याचे दस्तऐवज दाखवा. अन्यथा राहुल गांधींनी सभागृहाची माफी मागावी." (Rahul Gandhi)
 
सभागृहातील वाढता गोंधळ पाहता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वसूचना आणि वस्तुनिष्ठ पुराव्याशिवाय कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक आरोप करणे संसदीय नियमांच्या विरोधात आहे. ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना विधेयकावरील चर्चेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करत सांगितले की, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची कायमस्वरूपी नोंद सभागृहाच्या कामकाजात राहते. त्यामुळे त्यांनी तथ्यांच्या आधारे आणि संसदीय मर्यादा पाळूनच आपले मत मांडावे. (Rahul Gandhi)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर