'सूर्य सरोवर'ची सुवर्णझेप; देशभरातील जलाशयांवर तरंगणार सोलर पॅलेट्स

५,००० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प;केंद्राची ₹५,०७० कोटींची महत्त्वाकांक्षी योजना; दरवर्षी १ कोटी टन कार्बन उत्सर्जनात घट

PM Surya Sarovar Yojana
 
मुंबई : (PM Surya Sarovar Yojana) देशातील जलाशय, धरणे आणि औद्योगिक तलावांवर तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पांचे जाळे उभारण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना' मंजूर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ५,०७० कोटींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील देण्यात आला. या योजनेअंतर्गत ५,००० मेगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर फोटोव्होल्टेईक प्रकल्प आणि त्यासोबत किमान दोन तास क्षमतेची १०,००० मेगावॅट-तास ऊर्जा साठवण उभारण्यात येणार आहे.
 
ही योजना २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत राबविण्यात येणार असून, आर्थिक सहाय्याचे वितरण २०३२-३३ पर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, देशातील विविध जलाशयांमध्ये सुमारे १०२.१८ गिगावॅट इतकी फ्लोटिंग सौरऊर्जेची क्षमता उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ही योजना साकारण्यात आली आहे.(PM Surya Sarovar Yojana)
 
योजनेनुसार, यशस्वीरीत्या पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र फ्लोटिंग सोलर प्रकल्पासाठी प्रति मेगावॅट १ कोटी रुपयांचे केंद्रीय आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच, जलाशयांचा सखोल अभ्यास, पर्यावरणीय मूल्यांकन, बाथिमेट्री आणि हायड्रोग्राफीसारख्या प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षणासाठी प्रत्येक प्रकल्पाला ५० लाखांपर्यंत अतिरिक्त सहाय्य मिळणार आहे.(PM Surya Sarovar Yojana)
सध्या देशात फ्लोटिंग सोलरची क्षमता केवळ सुमारे ७०० मेगावॅट आहे. नव्या योजनेमुळे ती थेट ५,७०० मेगावॅटांपर्यंत पोहोचण्यास मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे जमिनीवरील ताण कमी होईल आणि धरणे, जलाशय तसेच औद्योगिक तलावांचा अधिक परिणामकारक वापर करता येईल.(PM Surya Sarovar Yojana)
 
ऊर्जा साठवण प्रणालीमुळे वीजपुरवठ्याची विश्वासार्हता वाढणार असून, या योजनेमुळे दरवर्षी सुमारे १ कोटी टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्याचा अंदाज आहे. तसेच प्रकल्प उभारणी, उपकरण निर्मिती आणि देखभाल यांसह संपूर्ण मूल्यसाखळीत १६ ते १७ हजार पूर्णवेळ रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे फ्लोटेशन प्रणाली, सौर सेल, सौर मॉड्यूल्स, ऊर्जा साठवण प्रणाली आणि संबंधित उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार असून, 'आत्मनिर्भर भारत' आणि 'विकसित भारत' या संकल्पनांना बळकटी मिळणार आहे.(PM Surya Sarovar Yojana)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर