मुंबई : (Nepal Violence) नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात कावड यात्रेदरम्यान झालेल्या सांप्रदायिक हिंसाचारात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. कावड यात्रा मुस्लिमबहुल परिसरातून जात असताना किरकोळ वादातून हा हिंसाचार भडकला. त्यानंतर जमावाने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंसाचारादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात ओमप्रकाश मेहता यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी शोक व्यक्त केला असून, प्रभावित कुटुंबांना न्याय आणि नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहा शहरांमध्ये अनिश्चितकालीन संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे.(Nepal Violence)
मिळालेल्या माहितीनुसार, कावड यात्रेदरम्यान डीजे आणि मोठ्या आवाजातील संगीतावर काही धर्मांध मुस्लिमांनी आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद होऊन तो हिंसक संघर्षात परिवर्तित झाला आणि यात अनेक जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला, त्यात ओमप्रकाश मेहता यांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, मृतांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. या मृत्यूच्या निषेधार्थ संपूर्ण तराई प्रदेशात आंदोलन सुरू झाले आहे.(Nepal Violence)
घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि प्रभावित नागरिकांना नुकसानभरपाई दिली जाईल. त्यांनी मृताला श्रद्धांजली अर्पण केली तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सुरक्षा दलाच्या गोळीबारात नागरिकाचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.(Nepal Violence)
एपीएफने तीन वर्षांपूर्वीच दिला होता इशारा
नेपाळच्या सीमा सुरक्षा व दंगल नियंत्रण दल आर्म्ड पोलिस फोर्स (एपीएफ) ने तीन वर्षांपूर्वीच सरकारला तराई भागात जातीय आणि धार्मिक तणाव वाढू शकतो, असा इशारा दिला होता. मात्र तत्कालीन नेतृत्वाने या अहवालाकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. नेपाळच्या तराई प्रदेशात मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढली असून, या भागात मोठ्या प्रमाणावर मदरसे आणि मशिदी उभारल्या गेल्या आहेत. पूर्वी अत्यल्प असलेली मुस्लिम लोकसंख्या आता ५ टक्क्यांहून अधिक, म्हणजेच सुमारे १४.८३ लाखांपर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे.(Nepal Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक