मुंबई : (Nagpur Convention Centre) नागपूरला आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने शहरात जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या प्रकल्पामुळे नागपूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच पर्यटन, उद्योग आणि रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Nagpur Convention Centre)
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे फिरा बार्सिलोना इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो उपस्थित होते. (Nagpur Convention Centre)
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर विमानतळ परिसराच्या नियोजित नागरी विकासाशी सुसंगत पद्धतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे यांसारख्या बहुआयामी वाहतूक सुविधांचा विचार करून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नागपूरमध्ये मोठ्या क्षमतेच्या कन्व्हेन्शन सेंटरची गरज असून, या केंद्रामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद, औद्योगिक प्रदर्शन, कॉर्पोरेट कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन शक्य होईल. (Nagpur Convention Centre)
कन्व्हेन्शन सेंटर हे केवळ परिषद आणि प्रदर्शनांचे ठिकाण न राहता नागपूरच्या सांस्कृतिक आणि आधुनिक ओळखीचे प्रतीक ठरावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यासाठी इमारतीची वास्तुरचना आकर्षक, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि पर्यावरणपूरक असावी. ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या संकल्पनांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Nagpur Convention Centre)
या प्रकल्पाच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, पर्यटन, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट आणि संबंधित सेवा क्षेत्रांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याची संधी उपलब्ध होईल. त्यामुळे नागपूरला जागतिक दर्जाचे परिषद, प्रदर्शन, पर्यटन आणि उद्योग केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रकल्पाशी संबंधित निविदा प्रक्रिया, जमीन हस्तांतरण, बांधकाम आणि इतर सर्व प्रशासकीय बाबी निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून २०२९ पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले. (Nagpur Convention Centre)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.