पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करणार महापालिका

    31-Jul-2026
Mumbai Tourism BMC
 
मुंबई : (Mumbai Tourism BMC) देश-विदेशातील पर्यटकांसाठी मुंबई अधिक आकर्षक आणि सोयीस्कर बनविण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यापक योजना तयार केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांवर स्वच्छता, सौंदर्यीकरण, सुरक्षा, दिशादर्शक फलक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच डिजिटल माहिती प्रणाली यांसारख्या आधुनिक आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामागील उद्देश पर्यटकांना अधिक चांगला आणि समाधानकारक अनुभव देण्याचा आहे.
 
भिडे म्हणाल्या की, मुंबईतील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वारसास्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबईकरांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्रथम जबाबदारी असून, त्याचबरोबर पर्यटनाला चालना देण्यासाठीही महानगरपालिका सातत्याने कार्यरत आहे. मुंबईमध्ये पर्यटनाच्या मोठ्या संधी असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने विद्यमान पर्यटनस्थळांचा अधिक विकास करण्यात येईल. तसेच नव्या पर्यटनस्थळांच्या विकासावरही काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. (Mumbai Tourism BMC)
 
पर्यटकांना विश्वासार्ह आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्वतंत्र पर्यटन संकेतस्थळ विकसित करावे, अशी सूचनाही आयुक्तांनी केली. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. (Mumbai Tourism BMC)
 
बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जायसवाल यांनी सांगितले की, राज्य सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. पर्यटन पायाभूत सुविधांचा विस्तार, धोरणात्मक योजनांची अंमलबजावणी आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे एमटीडीसीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुंबईसारख्या महानगराला समृद्ध पर्यटन वारसा लाभला असून, इको-टुरिझम आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिकेने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. या दिशेने महापालिकेने सकारात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Mumbai Tourism BMC)
 
शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात 'मुंबई पर्यटन' या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करण्यात आली. (Mumbai Tourism BMC)
 
 




संबंधित मजकूर