मुंबईभोवती १६९ किमीच्या रिंग रोडची योजना; वर्सोवा-बांद्रा सी लिंक २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय

९.८0 किमी सागरी पुलाचे ३२ टक्के काम पूर्ण; एमएसआरडीसीचे एमडी अनिलकुमार गायकवाड यांची माहिती

Mumbai Ring Road
 
मुंबई : (Mumbai Ring Road) मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा वर्सोवा-बांद्रा सी लिंक प्रकल्प २०२८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दै.'मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधताना दिली. त्यांनी सांगितले की, ९.८ किलोमीटर लांबीच्या या सागरी पुलाचे सुमारे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नियोजनानुसार सुरू आहे.(Mumbai Ring Road)
 
अनिलकुमार गायकवाड म्हणाले की, समुद्रातील बांधकामावर पावसाळ्याचा मोठा परिणाम होत असल्याने मान्सून काळात प्रत्यक्ष समुद्रात काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे हवामान अनुकूल असलेल्या 'ड्राय स्पेल'मध्येच समुद्रातील कामे वेगाने करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.(Mumbai Ring Road)
 
वर्सोवा-बांद्रा सी लिंकची मुख्य समुद्री लिंक ९.८ किलोमीटर लांबीची आहे. या मार्गाला बांद्रा, ऑटर्स क्लब, जुहू कोळीवाडा आणि वर्सोवा येथे कनेक्टर्स जोडले जात आहेत. हे कनेक्टर्स समुद्रकिनाऱ्यापासून साधारण एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारलेले असतील. त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.(Mumbai Ring Road)
 
गायकवाड यांनी सांगितले की, हा प्रकल्प केवळ एक स्वतंत्र सी लिंक नसून मुंबईसाठी विकसित होत असलेल्या समग्र १६९ किलोमीटर रिंग रोड नेटवर्कचा महत्त्वाचा भाग आहे. या रिंग रोडमुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होईल आणि वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणातही लक्षणीय घट होईल. मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागांदरम्यान जलद, अखंड आणि पर्यायी संपर्क उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प मुंबईच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.(Mumbai Ring Road)
 
मुंबईभोवती तयार होणार १६९ किमीचा रिंग रोड
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू - 22 किमी (एमएमआरडीए)
शिवडी-वरळी एलिव्हेटेड कॉरीडॉर- 4.5 (एमएमआरडीए)
वरळी-वांद्रे सी लिंक - 5.6 किमी (एमएसआरडीसी)
वांद्रे-वर्सोवा - 9.8 किमी सी लिंक (एमएसआरडीसी)
वर्सोवा-विरार सी लिंक - 42 किमी (एमएमआरडीए)
विरार–अलिबाग मल्टी-मोडल कॉरिडॉर (चिर्ले जंक्शन येथे अटल सेतू जोडणी) (Mumbai Ring Road)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर