हादी मातरला शिक्षा...

    31-Jul-2026   
 
haji madar
 
 
२०१८ साली २४ वर्षांच्या अमेरिकेच्या हादी मातरने त्याच्या आईशी कडाडून भांडण केले, "मला तू शाळेत का शिकायला पाठवलेस? मला इस्लामिक धर्माचे शिक्षण का दिले नाहीस?” याच हादीने दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ‘चौटाउक्वा इन्स्टिट्यूशन’ येथे प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. हादी मातरला अमेरिकन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. खरेतर हादीने ज्या पुस्तकामधील विधानाबद्दल रश्दी यांच्यावर हल्ला केला होता, ते पुस्तक त्याने वाचलेही नव्हते. पण, इराणच्या अयातुल्ला खामेनीचा फतवा ऐकून त्याने हा हल्ला केला होता. मात्र, दहशतवादी संघटना आणि इराण सरकारनेही स्पष्ट केले की, त्यांचा आणि हादी मातरचा काहीएक संबंध नाही.
 
दुसरीकडे अमेरिकेने हादी मातरचा आणि इराणचा, तसेच ‘हिजबुल्ला’ या दहशतवादी संघटनेचा संबंध होता, याची यादीच तयार केली आहे. त्याने हल्ल्यापूर्वी इराणमधील एका व्यक्तीशी संपर्क करून सांगितले होते की, त्याला रश्दी कुठे राहतात, काय करतात याची माहिती आहे. यावर समोरच्या व्यक्तीने काही उत्तर दिले नाही. मग त्यानेे प्रश्न विचारला होता की, रश्दीवरचा ईशनिंदेचा फतवा अजूनही कायम आहे का? त्याच्या या प्रश्नावर उत्तर दिले गेले, ‘हो.’ त्याचा लॅपटॉप आणि दोन फोन अमेरिकन पोलिसांनी जप्त केले. त्यात त्यांना अनेक आक्षेपार्ह संदेश आणि फोटो सापडले. ‘हिजबुल्ला’चे नाव दिलेले टी-शर्ट घालून दहशतवाद्यांना सलाम करतानाचा त्याचा फोटोही मिळाला.
 
तर, हादीचे आई-बाप लेबेनॉनचे. त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले. हादीचा जन्म अमेरिकेतला. वयाच्या २४व्या वर्षी तो त्याच्या बापाच्या गावी म्हणजे लेबेनॉनमधील यारून गावी गेला. धर्माच्या नावावर अधर्म क्रूरतेचा निश्चय करूनच तो अमेरिकेत परतला होता. ‘आईने मदरसा शिक्षण न देता, इतर धर्मियांसारखे शाळेचे शिक्षण का दिले,’ असे म्हणत त्याने तिच्याशी भांडणही केले. काही महिने त्याने लॅपटॉप आणि फोनसकट स्वतःला कोंडून घेतले होते. याकाळात सोशल मीडियाच्या माध्यमातून तो दहशतवादी संघटनांच्या विचारांनी आणखीन जवळ गेला.


Salman Rushdie. Pic: Reuters
 
‘द सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकामध्ये रश्दी यांनी पैगंबराबद्दल आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिहिले, रश्दी यांनी ईशनिंदा केली, आता त्यांना मृत्युदंड द्यायलाच हवा, असा फतवा १९८९ साली अयातुल्ला खामेनी यांनी काढला. याच फतव्याला आदेश मानून हादी याने सलमान रश्दी यांच्यावर भर कार्यक्रमात हल्ला केला. यात सलमान रश्दींना डोळा गमवावा लागला. हल्ला केल्यानंतर तत्काळ हादी पकडला गेला. २०२२ सालापासून त्याच्यावर खटला सुरू झाला. या खटल्यात तो कोणतेही मत व्यक्त करत नसे. मात्र, २०२५ साली त्याचा न्यायालयात खटला सुरू असताना त्याने ‘पॅलेस्टाईन’चा नारा दिला होता. तसेच रश्दी यांच्यावर हल्ला केला, याचा त्याला बिलकूल पश्चात्ताप झाल्याचे कधीही दिसले नाही. त्याने ‘सवाब’चे काम केले, असेच त्याचे मानणे होते.
 
या हादीला अमेरिकेच्या फेडरल न्यायालयाने दि. २९ जुलै आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरवले. त्याच्यावर ‘हिजबुल्ला’ या परदेशी दहशतवादी संघटनेला मदत करणे आणि देशाच्या सीमा ओलांडून दहशतवादी कट रचणे, हे गुन्हे सिद्ध झाले आहेत. तसेच ‘द सॅटनिक व्हर्सेस’ या पुस्तकाच्या अनुवादकांवरही यापूर्वी हल्ले झाले होते. पुस्तकाचे जपानी भाषेतील अनुवादक हितोशी इगाराशी यांची जपानमध्ये चाकू मारून हत्या करण्यात आली, तर इटालियन अनुवादक आणि नॉर्वेजियन प्रकाशकावरही जीवघेणे हल्ले झाले. ईशनिंदा म्हणत असे अनेक हल्ले जगभरात झाले. ‘नोबेल’ पुरस्कार मिळवणारे एकमेव अरबी लेखक नजीब महफूझ बांगलादेशमधील तस्लिमा नसरीन यांच्यावरच नव्हे, तर अविजित रॉय, हुमायूं आझाद, नाझिमुद्दीन समद आणि वशिकुर रहमान यांसारख्या अनेकांवर ईशनिंदेचा आरोप करत हल्ला झालेला आहे, जीवाच्या धमक्या मिळालेल्या आहेत. ‘शार्ली हेब्दो’ मासिकावरील हल्ला तर अत्यंत क्रूरच. प्रश्न असा आहे की, फतव्यानुसार हल्ला करणार्‍याला शिक्षा होते. मात्र, फतवे काढणार्‍यांच्या मानसिकतेचे काय? हादी मातरला शिक्षा झाली; पण असे हादी निर्माण होऊ नयेत, त्यासाठी काय?






योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर