आता विरोधकांकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही'; गाड्यांच्या वादावर सभागृह नेत्यांचा पलटवार

    31-Jul-2026
Ganesh Khankar
 
मुंबई : (Ganesh Khankar) महापालिकेतील वेट-लीजवरील गाड्यांच्या प्रस्तावावरून सुरू झालेल्या वादानंतर सभागृह नेते गणेश खणकर यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. काही विरोधकांनी स्वतःच विविध सुविधांबाबत मागण्या करून नंतर त्याच मुद्द्यांवर टीका केल्याचा आरोप करत, "यापुढे विरोधकांनी कोणतीही मागणी केली तर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणार नाही," असा टोला त्यांनी लगावला.
 
पत्रकार परिषदेत बोलताना गणेश खणकर म्हणाले की, नगरसेवकांसाठी नव्या गाड्या खरेदी केल्या जात असल्याचा प्रचार चुकीचा आहे. चर्चेत असलेला प्रस्ताव हा अधिकाऱ्यांसाठी वेट-लीज पद्धतीने १६ वाहने उपलब्ध करून देण्याचा असून त्याचा नगरसेवकांसाठी गाड्या खरेदी करण्याशी कोणताही संबंध नाही.(Ganesh Khankar)
 
त्यांनी दावा केला की, काही विरोधी सदस्यांनी पूर्वी प्रवासाच्या अडचणी आणि इतर सुविधांबाबत मागण्या केल्या होत्या. सभागृह नेते म्हणून त्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचविल्या; मात्र आता त्याच मागण्यांवरून राजकारण केले जात आहे. "म्हणूनच आता विरोधकांनी कोणतीही मागणी केली तर आधी प्रतिज्ञापत्र घेईन, नाहीतर नंतर पलटी मारून आरोप करतात," असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.(Ganesh Khankar)
 
यावेळी त्यांनी महापालिकेत वाहनांच्या वाटपात भेदभाव होऊ नये, यासाठी आयुक्त आणि महापौर वगळता सर्व पदाधिकाऱ्यांना एकाच दर्जाची वाहने द्यावीत, अशी मागणीही केली.(Ganesh Khankar)
 
 




संबंधित मजकूर