मुदतीपूर्वीच काम पूर्ण; २३ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मध्य रेल्वेने मुंबई–पुणे जीवनवाहिनी पुन्हा सुरू

    31-Jul-2026
Central Railway
 
ठाणे : (Central Railway) जुलै च्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे कर्जत–लोणावळा घाट विभागात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक गंभीरपणे विस्कळीत झाली होती. या घटनेत तिन्ही रेल्वे मार्गिका बाधित झाल्या होत्या विशेषतः अप (तिसरी) मार्गिका सर्वाधिक नुकसानग्रस्त ठरली. रुळांवर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि खडकांचा ढिगारा साचला होता.
 
काही ठिकाणी रेल्वे रुळांच्या अधोसंरचनेलाही गंभीर फटका बसल्याने या ठिकाणी मार्गिकेची जवळपास पुनर्बांधणी करावी लागली. परिणामी, तिसरी मार्गिका पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याची आवश्यकता भासली.देशातील सर्वाधिक आव्हानात्मक घाट रेल्वे विभागांपैकी एक असलेल्या या मार्गावर काम करणे अत्यंत जटिल होते. एकीकडे मुसळधार पावसाचा सततचा मारा सुरू होता, तर दुसरीकडे पुन्हा दरड कोसळण्याचा धोका कायम होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्मचारी आणि अभियंत्यांना अत्यंत दक्षता आणि सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन करत काम करावे लागले.(Central Railway)
 
मध्य रेल्वेने करून दाखवले
 
मध्य रेल्वेने या पुनर्बांधणी मोहिमेसाठी तब्बल ११,७४५ कर्मचारी, अभियंते आणि तंत्रज्ञ तैनात केले. एकूण १,४०,९४० मनुष्य-तासांचे श्रम या कामासाठी खर्ची पडले. आवश्यक साहित्य घटनास्थळी वेळेत पोहोचवण्यासाठी ११० हून अधिक विशेष साहित्य रेक्स कार्यरत ठेवण्यात आल्या. हे संपूर्ण काम सलग दिवस-रात्र सुरू होते.पुनर्बांधणी प्रक्रियेदरम्यान अवजड पोकलेन यंत्रे, जेसीबी, ट्रॅक मशीन आणि इतर आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने दरडी हटवण्यात आल्या. (Central Railway)
 
त्यानंतर रुळाखालचा पाया मजबूत करण्यात आला, खराब झालेल्या रुळांची आणि स्लीपर्सची पुनर्स्थापना करण्यात आली, उतार स्थिर करण्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या तसेच पावसाचे पाणी साचू नये यासाठी जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यात आली. प्रत्येक टप्प्यानंतर अभियंत्यांकडून सुरक्षा तपासणी आणि चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच पुढील काम हाती घेण्यात आले.(Central Railway)
 
विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या ३१ जुलैपूर्वी या कालमर्यादेपेक्षा हे आव्हानात्मक काम आधीच पूर्ण करण्यात आले. अखेर २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मार्गिका पुन्हा कार्यान्वित झाल्या असून, देशातील अत्यंत महत्त्वाच्या मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील प्रवासी तसेच मालवाहतूक सेवा पूर्ण क्षमतेने पूर्ववत झाली आहे.निसर्गाच्या प्रचंड आव्हानांवर मात करत मध्य रेल्वेने केवळ रेल्वेमार्ग पूर्ववत केला नाही, तर प्रभावी नियोजन, उच्च दर्जाचे अभियांत्रिकी कौशल्य आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या समर्पणाच्या बळावर अशक्यप्राय वाटणारे काम यशस्वीपणे पूर्ण केले.(Central Railway)
 
अभियांत्रिकी, विद्युत, सिग्नल व दूरसंचार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रुळांवरील माती-दगड हटविणे, मार्गाची तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली. त्यामुळे घाट विभागातील तिन्ही मार्गिकांवरील रेल्वे वाहतूक आता पूर्ववत होण्यास मदत झाली असून, गाड्यांचा विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे. (Central Railway)
 
 




संबंधित मजकूर