शून्यातून विश्वाचा प्रवास करत कोळी संस्कृतीची पताका जगभरात फडकवणारे लोककलावंत अरुण पेदे (वेसावकर) यांच्याविषयी...
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले| विष्णुपत्नि नमस्तुभ्यं
पादस्पर्शं क्षमस्व मे॥
अर्थात, अथांग समुद्राची वस्त्रे परिधान करणार्या आणि निसर्गाशी एकरूप झालेल्या भूमीला नमन करून, तिच्या आशीर्वादाने संस्कृतीची सेवा करण्याचा हा महायज्ञ आहे. असा हा अथांग पसरलेला समुद्र, फेसाळणार्या लाटा आणि छातीठोकपणे दर्यावर ताबा मिळवणारा कोळी समाज! दर्या आणि कोळी समाजाचे नाते केवळ उपजीविकेचे नसून, ते रक्ताचे आणि आत्म्याचे आहे. याच पवित्र भूमीत दि. १७ जून १९६० रोजी मुंबईतील वर्सोवा येथील कोळीवाड्यात एका युगप्रवर्तक कलावंताचा जन्म झाला, ते अरुण पेदे (वेसावकर)!
अरुणजींच्या जीवनप्रवासाला खरी कलाटणी मिळाली, ती इयत्ता चौथीत असताना. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील एका कार्यक्रमात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका अत्यंत हुबेहूब साकारली. त्या एका क्षणाने बाल अरुणच्या सुप्त कलागुणांना जागे केले. रक्तामध्येच वसलेली कोळी संस्कृतीची आवड उफाळून आली आणि तिथून सुरू झाला एका महान कलाकाराचा कधीही न थांबणारा प्रवास!
पुढे जगविख्यात नृत्यदिग्दर्शक सचिन शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘बॅले’ नृत्यकलेचे धडे घेतले. या शिस्तबद्ध प्रशिक्षणातून त्यांच्या आत्मविश्वासाला पंख मिळाले. कला आणि संस्कृती केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ती आपली ओळख आहे; या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी ‘दर्याचा राजा’ या पारंपरिक कोळीगीतांच्या अप्रतिम कलाकृतीची निर्मिती केली.
आजच्या आधुनिक आणि ‘ग्लॅमरस’ जगात पारंपरिक लोककला मागे पडत असताना, अरुण पेदे यांनी प्रतिकूल परिस्थितीशी लढा दिला. आर्थिक फायद्या-तोट्याचा विचार न करता, प्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून त्यांनी कोळी संस्कृतीचे जतन केले. वैयक्तिक सुख-दुःखांना बाजूला सारून संस्कृती रक्षणाचा वसा त्यांनी अखंडपणे चालवला.
संस्कृती ही केवळ भूतकाळाची आठवण नसून, ती आपल्या भविष्याचा पाया आहे. त्यांच्या या निष्ठेचे फलित म्हणजे आजवर ‘दर्याचा राजा’ या कार्यक्रमाचे तीन हजारांहून अधिक यशस्वी प्रयोग झाले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासोबत ‘दुर्गा’, ‘रामायण’, ‘सत्यवान सावित्री’ आणि ‘मीरा’ यांसारख्या भव्य कलाकृतींमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
रशियातील ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया (१९८८)’, झुरिचमधील ‘फेस्टिव्हल ऑफ इंडिया (१९९७)’, आणि मेसिकोतील ‘आंतरराष्ट्रीय सर्व्हे टिनो फेस्टिव्हल (२०००)’ यांसारख्या जागतिक विचारपीठांवर अरुणजींनी कोळीगीतांचा गजर केला. अमेरिका, मेसिको, स्वित्झर्लंड, टान्झानिया, ट्यूनिशिया आणि युगांडा यांसारख्या देशांमध्ये त्यांनी भारतीय लोकसंस्कृतीचा झेंडा दिमाखात फडकवला. जागतिक वृत्तपत्रांनीही त्यांच्या या अभूतपूर्व योगदानाची वेळोवेळी दखल घेतली आहे.
अरुण पेदे यांची सादरीकरणाची शैली अत्यंत खुमासदार. रंगमंचावर छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली मानवंदना, देवी-देवतांची स्तुती आणि प्रेक्षकांना थेट कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची त्यांची अनोखी कला प्रेक्षकांना अक्षरश: मंत्रमुग्ध करते. नव्या पिढीला व्यासपीठ मिळवून देणे, ज्येष्ठांना योग व मार्गदर्शनातून ऊर्जा प्रदान करणे आणि तरुण कलाकारांना सन्मानित करणे, यातून त्यांचे नेतृत्वगुण दिसून येतात.
अरुण पेदे यांचा जीवनप्रवास म्हणजे शून्यातून सुरू होऊन समुद्राला मिळणार्या एका सळसळत्या झर्यासारखा आहे. थेंबथेंब गोळा करत, वळणे घेत, सर्व संकटांवर मात करत त्यांनी लोककलेचा अथांग सागर कवेत घेतला आहे.
आजच्या युवा पिढीने आपल्या समृद्ध परंपरेशी जोडलेले राहावे आणि लोककलेचा वारसा अभिमानाने पुढे न्यावा, हाच त्यांचा एकमेव ध्यास आहे. त्यांच्या या निष्काम कलासेवेला आणि अद्वितीय योगदानाला ‘दै. मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
-कमलेश संखे