बालकांचा सर्वांगीण विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि सुदृढ कुटुंबव्यवस्थेच्या उभारणीसाठी आयुष्यभर निःस्वार्थपणे कार्य करणार्या उमा माने यांच्याविषयी...
काही माणसे स्वतःसाठी जगत नाहीत; ती समाजाच्या भविष्यासाठी जगतात. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस हा एखाद्या निरागस चेहर्यावर हसू फुलवण्यासाठी, एखाद्या आईला सक्षम करण्यासाठी आणि एखाद्या मुलाचे भविष्य उजळवण्यासाठी समर्पित असतो. उमा माने यांचे आयुष्य हे अशाच निःस्वार्थ सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण.
पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात उमा यांची जडणघडण झाली. एस. पी. महाविद्यालयातून त्यांनी ‘संस्कृत’ विषयात ‘बीए’ पूर्ण केले, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून वेदांचे सखोल अध्ययन करून ‘पारंगत’ पदवी मिळवली. पुढे ‘कुटुंब व बालकल्याण’ हा विषय घेऊन ‘एमएसडब्ल्यू’ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टप्पा ठरला, तो १९९३च्या लातूर भूकंपाचा.
भूकंपानंतर दीड वर्ष त्या अशा गावात राहिल्या, जिथे भीतीमुळे लोक स्वतःच्या घरातही राहण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी गावकर्यांच्या मनात पुन्हा जगण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. महिलांचे बचत गट उभे राहिले, त्यातून अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले, यातून अनेक कुटुंबे स्वावलंबी बनली. युवकांनाही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतले. समाजाच्या वेदना जवळून अनुभवल्यानंतर त्यांनी ठरवले की, ही सेवा एखाद्या प्रकल्पापुरती मर्यादित न राहता आयुष्यभराची साधना व्हायला हवी. या संकल्पनेतून १९९६ मध्ये ‘क्षितिज’ संस्थेचा जन्म झाला.
१९९६ साली सुरू झालेला हा प्रवास आपला समाज-कुटुंब बालकेंद्रित व्हावे, या ध्येयाने सुरु आहे. आज ‘क्षितिज’ संस्था जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी समुदाय, कुटुंब, शाळा, अंगणवाडी अशा विविध व्यासपीठांवर कार्यरत आहे. विकासात्मक, उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा तीनही स्तरांवर संस्था सातत्याने काम करते. शिक्षण, मानसिक आरोग्य आणि जीवनकौशल्य हे संस्थेच्या कार्याचे तीन प्रमुख आधारस्तंभ. या कार्यात केवळ मुलांपुरते मर्यादित न राहता पालक, शिक्षक आणि समाज यांनाही समान महत्त्व दिले जाते.
सासवड येथे सुरू असलेला ‘जीवनकौशल्य विकास प्रकल्प’ हे त्याचे उत्तम उदाहरण. सुमारे ३५०हून अधिक मुलांना समस्या सोडवणे, निर्णयक्षमता, सारासार विचार आणि प्रभावी संवाद यांसारखी जीवनासाठी अत्यावश्यक कौशल्ये दिली जातात. मुलांचे सातत्याने निरीक्षण केले जाते, त्यांच्या वर्तनातील सकारात्मक बदल नोंदवले जातात आणि प्रत्येक मुलासाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे स्वतंत्र कार्ड तयार केले जाते. आवश्यकतेनुसार समुपदेशनाची जोड दिली जाते. पुढील काही वर्षांत ही मुले आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने स्वतःचे जीवन जगण्यास सक्षम व्हावीत, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.
बालकांसोबत काम करत असताना उमा माने यांच्या लक्षात आले की, मुलांचा विकास हा त्यांच्या पालकांच्या सक्षमतेवर अवलंबून असतो. विशेषतः ग्रामीण भागात काम करताना महिलांच्या अनेक समस्या त्यांच्यासमोर आल्या. अशा परिस्थितीत महिला सक्षम नसतील, तर त्या सक्षम पालक कशा बनतील, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करू लागला. याच जाणिवेतून २००५ पासून महिला सक्षमीकरणाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू झाले. याच विचारातून त्यांनी ‘पालक संवाद’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. मुलांच्या विकासासाठी पालकांनी काय करावे, मुलांशी कसा संवाद साधावा, त्यांच्या भावनिक गरजा कशा समजून घ्याव्यात, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन या उपक्रमातून केले जाते.
या उपक्रमाची परिणामकारकता पाहून वाळवा आणि कराड पंचायत समितीच्या सहकार्याने ‘पालक संवाद - भाग १’ ही पुस्तिका तयार करण्यात आली. वर्षभरासाठी १२ विषयांची अभ्यासक्रमरूप मांडणी असलेली ही पुस्तिका आज हजारो अंगणवाडी सेविकांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जवळपास दीड ते दोन हजार अंगणवाड्यांमध्ये या माध्यमातून एकसमान आणि शास्त्रीय पद्धतीने पालक संवाद घडवला जातो.समाजकार्यासाठी अनेक आकर्षक नोकर्यांच्या संधी त्यांच्या समोर होत्या. घरच्यांचीही इच्छा होती की, त्यांनी स्थिर नोकरी स्वीकारावी. पण, त्यांनी समाजसेवेचाच मार्ग निवडला. विवाहाच्या वेळी त्यांनी त्यांचे पती अजय माने यांच्यासमोर एकच अट ठेवली होती की, ‘मी नोकरी म्हणून घराबाहेर पडेन, पण समाजसेवेसाठीच!’ त्यांच्या या ध्येयवेड्या निर्णयाला अजय माने यांनी मनापासून स्वीकारले आणि आजपर्यंत खंबीर साथ दिली. त्यांची मुलगीसुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीर आहे.
‘भारतीय स्त्रीशक्ती जागरण’ संस्थेचा ‘स्त्रीशक्ती’ पुरस्कार, ‘रमा माधव ट्रस्ट’चा ‘समाजसेवा पुरस्कार’, ‘काव्य-मित्र’ संस्थेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’चा ‘प्रेरणा पुरस्कार’ यांसारखे अनेक सन्मान त्यांच्या कार्याला लाभले. उमा माने यांनी गेली अनेक दशके याच शांत, सातत्यपूर्ण आणि निःस्वार्थ सेवेतून असंख्य आयुष्यांना नवे क्षितिज दिले आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा.
(अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६३७०४५८५)