शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, तितकेच उद्धव ठाकरेंच्या आचरट, थुकरट वागण्या-बोलण्यालाही महाराष्ट्र विसरणार नाही. आतातर उद्धव हे थोर ‘दीपके’भक्त झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या नावावर अश्लील, हिंसक असा नंगानाच घालणार्या अभिजित दीपकेमध्ये त्यांना साक्षात विष्णूचा अवतार दिसला. मात्र, त्यांचे हे विधान कुणी गांभीर्याने घेतले नाही. कारण, महाराष्ट्राच्या जनतेने सत्य ओळखले की, एक तर ते टोमणे तरी मारतात किंवा अविचारी बडबड तरी करतात. धन्य, धन्य उधोजीराव! दीपकेला देव मानलेच आहे, तर त्याच्या नावाचा हातात, गळ्यात गंडा बांधा आणि स्वतःच्या कमरेवर सुखेनैव हात ठेवून दीपकेची आरती गा! हो, गंडा म्हणून गळ्यात, हातात झुरळं बांधा! झुरळं! (हे वाक्य लिहिताना संजय राऊत यांनी म्हटलेले, ‘महाराष्ट्र हरला, पेढे वाटा पेढे!’ हे वाक्य उगीच आठवले.)
असो. ज्याच्या नेतृत्वाखाली देश आणि संविधानयुक्त न्यायालय, प्रशासन, सरकार यांना गलिच्छ शिवीगाळ झाली; अमंगलही तोंड लपवेल असे संस्कारहीन वर्तन झाले, त्या दीपकेला उद्धव यांनी विष्णू म्हटले? हे असे बोलताना त्यांनी जनाची नाही, तर मनाची आणि स्वतःची नाही, तर वडिलांच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करायला हवा. सत्तेत नाही म्हणून सत्ताधार्यांना उगीचच विरोध करणारे, ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ झालेले ठाकरे बंधू. काय तर म्हणे, झुरळ आंदोलनाला पूर्ण समर्थन आणि त्यानुसार जल्लोष कार्यक्रम. एकच प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या नावावर अक्षरशः ओवाळून टाकलेले काही विकृत लोक ‘झुरळ’ आंदोलनात जे अपशब्द वापरत होते, जे खुलेआम लैंगिक सूचक हातवारे करत होते, जे हिंसक विकृत वर्तन करत होते, अगदी तसेचवर्तन अमित आणि आदित्य या दोघांनी केले, तर वडील म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंना ते आवडेल का? अर्थातच नाही. मग हेच विकृत कृत्य करणार्या पाखंडी लोकांचे समर्थन का? भरीस भर आमच्या विष्णुदेवाची उपमा त्या दीपकेला का देत आहेत? बरं, त्याला विष्णू मानलेच आहे, तर झुरळाच्या नावाने गंडा बांधून त्याची पूजा कधी करणार? कृपया, ही ‘झुरळपूजा’ आमच्या छत्रपती शिवाजींच्या नावाने असलेल्या पार्कमध्ये तरी करू नका. तूर्तास दीपके-झुरळभक्त उद्धव यांचा जाहीर निषेध!
असेच तडफडत राहा!
मनुवादी के छातीपर बिरसा, फुले, आंबेडकर
ब्राह्मणवाद के छातीपर बिरसा, फुले, आंबेडकर
असे म्हणत, विद्यार्थ्यांच्या नावाने डफली वाजवत काही लोक ‘झुरळ’ आंदोलनात उतरले होते. मुळात भगवान बिरसा मुंडा, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जो लढा दिला, तो संपूर्ण मानवकल्याणासाठीचा लढा होता. भगवान बिरसा मुंडा, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या कलंकित शापाविरोधात उभारलेला महालढा हा स्वार्थविहीन आणि मानवीमूल्यांचा जयघोष करणारा होता. एकमेकांची आईमाई काढत, समाज लज्जित होईल आणि बदनाम होईल, समाजाचे नुकसान होईल, असे एकही वाक्य आणि कृती या महापुरुषांनी कधीही केली नाही. मात्र, त्यांचे नाव घेत फुटीरतावादी काय वाटेल ते बडबडत आहेत. ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायला’ आणि त्यात घुसलं कानात वारं, अशी समस्त फुटीरतावाद्यांची स्थिती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने समाजाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मार्ग दिला. त्याचे अलौकिक प्रत्यंतर येत आहे. पूर्वी गावकुसाबाहेर राहणारी, समाजव्यवस्थेने नाडलेली व्यक्ती आज विविध स्तरांवर सत्ताधारी झाली. याचे श्रेय संविधानाने बदललेल्या समाजाला द्यावेच लागेल. त्याशिवाय, काळानुसार सकारात्मक बदल करणार्या हिंदू समाजालाही द्यावेच लागेल. त्यामुळेच तर इतर मागासवर्गीय आणि अत्यंत कनिष्ठ वर्गातील एक महिला असूनही मी माझे मत आज प्रखरपणे मांडू शकते. कारण, समाज बदलला आहे. अर्थात, जातिभेद होतच नाही, हे मी म्हणणार नाही, काही लोक कळत-नकळत तो करतही असतात. पण, ते नगण्य आहे आणि प्रगतिशील हिंदू समाजमन त्यांच्या विरोधात आहे. आमच्या पूर्वजांनी जातिभेद केला तो योग्यच आहे, असे कुणीही म्हणत नाही आणि मानतही नाही. समाज एकात्मिकरीत्या प्रगती आणि विकासाच्या दिशेने जात आहे. यामुळेच फुटीरतावादी भयभीत झाले. समाज एकवटला, तर मग देश अस्थिर कसा होणार? यामुळे ते तडफडत आहेत. बिरसा-फुले-आंबेडकर या महापुरुषांचे विचार स्मरून समाजातील महिला म्हणून त्यांना सल्ला आहे की, असेच तडफडत राहा!
९५९४९६९६३८