॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ३४॥

    30-Jul-2026
 
Saundarya Lahari Commentary Part 34
 
 
जगत्सूते धाता हरिरवति रुद्रः क्षपयते
तिरस्कुर्व-न्नेतत् स्वमपि
वपु-रीश-स्तिरयति|
सदा पूर्वः सर्वं तदिद
मनुगृह्णाति च शिव-
स्तवाज्ञा मलम्ब्य क्षणचलितयो र्भ्रूलतिकयोः॥२४॥
नाम क्रमांक २७० : तिरोधानकरी
श्री ललितादेवी संपूर्ण विश्वाचा विनाश साधते आणि त्याला अदृश्य करते. तिच्या या रूपाला तिरोधानकरी असे संबोधतात. हे ब्रह्मतत्त्वाचे चौथे कर्म आहे, ते म्हणजे संपूर्ण विश्वाचा विनाश अर्थात प्रलय.
 
भावार्थ : प्रलय या संकल्पनेला समजून घेणे आवश्यक आहे. जर प्रत्येक जीवात्मा हा जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून अव्याहतपणे फिरत आहे. अशा वेळी प्रलयाची आवश्यकता काय? असा प्रश्न निश्चित निर्माण होऊ शकतो. जीवित अवस्थेत असावे, ही मूलभूत प्रेरणा अहंभाव, अर्थात स्वअस्तित्त्वाची जाणीव असते. हा अहंभाव किंवा अहंकार हा अंतःकरण चतुष्टयाचा एक भाग आहे. स्वअस्तित्त्वाची जाणीव, या रूपात असलेला अहंकार लोप पावल्यास जीवात्मा जगू शकत नाही. हा अहंभाव देहाचा भाग नसून अंतःकरणाचा आहे, जे आत्म्याशी संलग्न आहे. याच अहंकारामुळेच जीवात्मा, स्वतःच्या आत्म्याच्या अंशात्मक ब्रह्मस्वरूपाला जाणून घेऊ शकत नाही.
 
आत्मा हा अमर आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही. मग तो केलेल्या कर्मानुसार जन्म मरणाच्या फेर्‍यात एकतर अडकून पडतो, किंवा त्याची चांगली आणि वाईट कर्मे भोगून पूर्ण झाली आणि वैराग्य जागृत झाले, तर तो ब्रह्मतत्त्वात लीन होतो. याशिवाय, आत्म्याला एक तिसरी गती प्राप्त होऊ शकते, ती म्हणजे महाप्रलयावेळी त्याचा संपूर्ण विनाश होतो.
 
बहुसंख्य जीवात्मे हे जन्म-मरणाच्या चक्रातच अडकतात. जीवात्म्यावर त्याच्या अहंकारामुळे संलग्न झालेल्या कुकर्मांचा प्रभाव असतो. अशा अहंभावातून एकत्रितपणे झालेला दुष्परिणाम, सृष्टीचे संतुलन बिघडवतो. सृष्टीत दुराचार आणि अनाचार प्रचंड वाढतात. सत्प्रवृत्त लोकांची संख्या रोडावते आणि परिणामवश ब्रह्मतत्त्वात फार कमीच जीवात्मे लीन होऊ लागतात. बहुसंख्य जीवात्मे हे जन्म-मरणाच्या चक्रातच गुरफटतात, या टप्प्यावर महाप्रलय अवतरतो. संपूर्ण सृष्टीमध्ये अशा पद्धतीने जीवात्म्यांचे अपरिवर्तनीय असे अधःपतन होण्यास, कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे महाप्रलय हा कोट्यवधी वर्षातून एकदाच घडतो.
 
जीवात्म्याचा नाश केवळ परमब्रह्मच करू शकते. परमब्रह्म साक्षीभावात असते, अहंकारामुळे जीवात्म्याचे बद्ध होणे आणि त्याचे अधःपतन होणे, या घटनेत ते हस्तक्षेप करत नाही. ज्यावेळी संपूर्ण सृष्टीचे संतुलन धोयात येते, त्यावेळी परमब्रह्मतत्त्व जागृत होऊन महाप्रलय घडवते. यामध्ये संपूर्ण विश्वातील समस्त अहंभावाचा नाश होतो. महाप्रलयापासून कोणीही आणि काहीही वाचत नाही. परमब्रह्मतत्त्व संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक अणुला स्वतःमध्ये विलीन करून घेते. पुनःनिर्मितीच्या वेळी ब्रह्मतत्त्व तप्तसुवर्णवर्णी अंड्याचा आकार धारण करते, त्यालाच ‘हिरण्यगर्भ’ असे म्हणतात.

नाम क्रमांक २७१ : ईश्वरी आवर्तन : ॐ ईश्वर्यै नमः|
 
शब्दार्थ : वरच्या नामात घडलेली तिरोधान क्रिया जे तत्त्व पार पाडते, त्याला ‘ईश्वर’ म्हणतात. या तत्त्वाची कारक चेतना श्री ललिता त्रिपुरसुन्दरी आहे.
 
भावार्थ : ईश्वरी तत्त्व पूर्ण ज्ञानघन आहे. ईश्वरी तत्त्वाचे सर्वांवर नियंत्रण असते. ईश्वरी तत्त्वालाच ‘परमात्मा’ असे संबोधतात. ईश्वरी तत्त्व हे प्रकट स्वरूपात कार्य करत नसून, अदृश्य स्वरूपात कार्यरत असते.

नाम क्रमांक २७२ : सदाशिवा आवर्तन : ॐ सदाशिवायै नमः|
 
शब्दार्थ : श्री ललितादेवीचे एक नाम सदाशिवा आहे. ‘सदा’ या शब्दाचा अर्थ जे सतत अस्तित्त्वात आहे ते आणि ‘शिवा’ म्हणजे अत्यंत पवित्र. सदाशिवा हे ब्रह्मतत्त्वाच्या अनादि-अनंत अशा अति प्रवित्र रूपाचे नाम आहे.
 
भावार्थ : नाम क्रमांक २६४ पासून, ब्रह्मतत्त्वाच्या कार्याचे विवेचन आहे. यात २६४ क्रमांकाचे नाम ‘सृष्टीकर्त्री’ आहे आणि त्यानंतरचे नाम हे‘ ब्रह्मरूपा’. अर्थात ब्रह्मतत्त्वाचे ते प्रथम रूप कोणते कार्य करणार आहे, हा उल्लेख आहे आणि नंतर ब्रह्मतत्त्वाच्या त्या नामाचा उल्लेख आहे. ‘सृष्टीकर्त्री ब्रम्हरूपा!’ या नामात मात्र केवळ ब्रह्मतत्त्वाच्या नामाचा उल्लेख असून, यातून ‘वाग्देवी’ या नामाचे पूर्णत्व ठसवत आहेत. सदाशिव या अवस्थेत इच्छाशक्ती प्रधान आहे. अर्थात ‘एकोहं बहुस्यामि’ हा भाव ब्रह्मतत्त्वात निर्माण होणे, ही सदाशिव अवस्था. कारण, या टप्प्यावर परमब्रह्म आपल्या शुद्ध-विद्या-स्वरूप निर्गुण रूपाचा त्याग करून, सगुण साकार होण्याची इच्छा व्यक्त करते आहे. वैश्विक चेतना प्रकट होण्याची ही प्रथम अवस्था. ब्रह्मतत्त्वाच्या पुनः जागृतीसाठी शक्तितत्त्व हे कारक आहे. या अवस्थेत इच्छाशक्ती ही ब्रह्मतत्त्वाला पुनः जागृत होऊन विश्व उत्पत्तीसाठी प्रेरित करत आहे.
 
नाम क्रमांक २७३ : अनुग्रहदा आवर्तन : ॐ अनुग्रहदायै नमः|
 
शब्दार्थ : अनुग्रहदा म्हणजे, सदाशिव तत्त्वाच्या पुनर्निर्मितीच्या आशीर्वादाचे क्रियारूप आहे. अनुग्रह म्हणजे कृपा. महाप्रलयात संपूर्ण विश्व विलीन होऊन, हिरण्यगर्भ रूपात उरलेले असते. ब्रह्मतत्त्वाचा अनुग्रह म्हणजे, पुनर्निर्मितीच्या क्रियेसाठी शक्तितत्त्वाला हिरण्यगर्भ प्रदान करणे आणि पुनश्च विश्वाच्या लीलेला प्रारंभ करणे.
 
भावार्थ : वैश्विक पातळीवर परमब्रह्म जो अनुग्रह प्रदान करते, त्याचे विवेचन खालीलप्रमाणे. निर्गुण ब्रह्म ‘एकोहं बहुस्यामि’ या भावाने प्रकट होते. प्रकृती पुरुष मिलनातून, संपूर्ण विश्व आकाराला येते. संपूर्ण सृष्टी आकाराला येते. शुद्ध चेतनेचे कोट्यवधी छोटे अंश, जीवात्मा रूपाने देह धारण करतात आणि सृष्टीचक्र सुरू होते. या सृष्टीचे माता आणि पिता म्हणून सगुण आणि निर्गुण ब्रह्माची कामना काय असू शकते, तर जन्म-मरणाच्या चक्रात आणि मायेच्या खेळात बद्ध झालेल्या या सर्व जीवात्म्यांनी आत्मोनत्ती साधून ब्रह्मतत्त्वात लीन होण्याचा प्रयास करावा. परंतु, सृष्टी निर्माण झाल्यावर जीवात्मे मायेच्या बंधनात असे अडकून पडतात की, त्यातील फार कमी जीवात्मेच आत्मोन्नती साधू शकतात आणि ब्रह्मतत्त्वात लीन होऊ शकतात. बाकी बहुतांशी जीवात्मे हे ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ याच चक्रात बद्ध होऊन जातात. केवळ इतकेच घडत नसून, शनैः शनैः या जीवात्म्यांची अधिकाधिक अधोगती होत जाते. शेवटी अशी वेळ येते की, जीवात्म्यांच्या या अधोगतीमुळे संपूर्ण सृष्टीचक्रच धोक्यात येते. या टप्प्यावर प्रलय अपरिहार्य होतो आणि महाप्रलय घडून, ब्रह्मतत्त्व सर्व जीवात्म्यांना नष्ट करून हिरण्यगर्भात बद्ध करतात.
 
अर्थात, सृष्टीनिर्मितीच्या कार्यकारणभावालाच जीवात्मे पराभूत करतात. परंतु, सदाशिव तत्त्व हे परमकरुणामयी असल्याने, ते पुनश्च हिरण्यगर्भरूपी अनुग्रह शक्तितत्त्वाला प्रदान करतात आणि पुनश्च सृष्टी निर्माण होते.
 
‘अनुग्रह’ ही संकल्पना परम कारुण्यातूनच निर्माण होते. गुरू आपल्या शिष्याला संप्रदायात सामील करून घेताना जी दीक्षा देतात, त्याचा उल्लेख अनुग्रह असा केला जातो. गुरूचा अनुग्रह म्हणजे गुरूने शिष्याला संप्रदायात समाविष्ट करून, त्याच्या पुढील आत्मोन्नतीचा मार्ग संप्रदायातील परंपरेनुसार प्रशस्त करणे. गुरू अत्यंत कारुण्याने, आपल्या शिष्याच्या सर्व पूर्वसुकृताला जाणून असूनही त्याला आत्मोन्नती घडवण्यासाठी अनुग्रह प्रदान करतो. गुरू हा ज्ञानाचे मूर्तिमंत रूप असल्याने, त्याला ब्रह्मतत्त्वाच्या समतुल्य समजतात. म्हणून गुरूंची उपासना करताना, प्रथमतः ॐकार रूपात त्यांना वंदन केले जाते. नंतर त्यांना ब्रह्म, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव या रूपात कल्पून, त्यांची पूजाही केली जाते. गुरू या तत्त्वाला परमब्रह्म समतुल्य दर्जा आपल्या संस्कृतीनेच दिला आहे.
 
नाम क्रमांक २७४ : पंचकृत्य परायणा आवर्तन: ॐ पञ्चकृत्यपरायणायै नमः|
 
शब्दार्थ : ब्रह्मतत्त्वाची पाचही कार्ये श्री ललिता त्रिपुरसुंदरी पार पाडते. या आधी पंचब्रह्मस्वरूपिणी या नामात उल्लेख केल्याप्रमाणे, या पाचही कार्यांच्या मागील चेतनाशक्ती ती आहे. ही पंचकार्ये ती प्रकाश-विमर्श-महामायास्वरूपिणी या रूपात पार पाडते. अर्थात, चित्शक्ती रूपाने पार पाडते. ‘चित्’ म्हणजे विशुद्ध चेतना, जी अनादि-अनंत आहे.
 
भावार्थ : शक्ती ही स्वयंप्रेरणेने विश्वनिर्मिती आणि विस्तार घडवते. तिला कोणतेही बाह्य कारण लागत नाही. संपूर्ण ब्रह्मांड तिच्यामध्ये अंतर्भूत असतेच, ती फक्त त्याला बाह्य स्वरूपात प्रकट करते. एक जीवात्मासुद्धा या पंचक्रिया करण्यास सक्षम असतो; कारण तोसुद्धा अंशात्मक रूपाने त्याच चित्शक्तीचे रूप आहे. परंतु, तो स्वतःच्या या सामर्थ्याबद्दल अनभिज्ञ असतो. श्री ललितादेवीची उपासना त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देते आणि त्यामुळे त्याच्या हातून लोकोत्तर कार्य घडते. अत्यंत सामान्य परिस्थितीत जन्माला आलेले लोक आत्मस्वरूपाचे भान आल्यावर लोकोत्तर कार्य करतात, त्यामागे प्रेरणाशक्ती म्हणून ही चित्शक्तीच कार्यरत असते.

सुजीत भोगले
९३७००४३९०१




संबंधित मजकूर