एखाद्या राष्ट्रातील असंतोष हा अनेक वर्षांच्या अपूर्ण राहिलेल्या अपेक्षांमधून आणि व्यवस्थेवरील कमी होत जाणार्या विश्वासातून आकार घेतो, असे म्हणतात. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सुरु असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन याच प्रक्रियेचा भाग आहे. सिंधमधील हैदराबाद येथे विद्यार्थ्यांनी ‘सिंध लोकसेवा आयोगा’च्या भरती प्रक्रियेविरोधात आंदोलन सुरू केले आहे. २०२४ मध्ये झालेल्या संयुक्त स्पर्धा परीक्षेच्या निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखली गेली नसल्याचा त्यांचा आरोप असून, परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी आणि भरती व्यवस्थेत सुधारणा करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या आंदोलनाला ‘कॉकरोच पार्टी ऑफ पाकिस्तान’ असे नावही देण्यात आले असून, समाजमाध्यमांवर डिजिटल मोहिमेद्वारे या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एखाद्या परीक्षेतील अनियमिततेचा प्रश्न इतक्या व्यापक असंतोषाचे रूप का घेतो, हाच खरा प्रश्न आहे. कारण, हा प्रश्न तरुणांच्या विश्वासाचा असतो. नोकरी मिळवण्यासाठी गुणवत्तेपेक्षा ओळख आणि प्रभाव यांनाच महत्त्व मिळणार असेल, तर तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होणे स्वाभाविकच.
पाकिस्तानातील विद्यार्थी चळवळीचा इतिहास मोठाच आहे. अयुब खान यांच्या राजवटीविरुद्ध १९६८-६९ मध्ये विद्यार्थ्यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यावेळी ‘नॅशनल स्टुडंट फेडरेशन’सारख्या डाव्या संघटनांचा त्यात पुढाकार होता. पुढे झिया उल हक यांच्या काळातील आंदोलनामुळे, विद्यार्थी संघटनांवरच बंदी घालण्यात आली. त्यावेळी पाकिस्तानातील विद्यापीठांना नवीन विद्यार्थ्यांकडून राजकारणात सहभागी होणार नाही, अशा प्रतिज्ञापत्रांवर सह्या करून घेणे भाग पडले. राजकीय नेतृत्व घडविणारी विद्यापीठेच यातून निर्जीव करण्यात आली. आजही पाकिस्तानातील विद्यार्थी चळवळीला अनेक कायदेशीर समस्यांचा सामाना करावा लागत आहे.
मात्र, पाकिस्तानची शोकांतिका अशी आहे की, तेथे सामाजिक प्रश्नाला राजकीय आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चष्म्यातूनच पाहिले जाते. विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, प्रादेशिक अस्मितेचा असो किंवा आर्थिक विषमतेचा असो; त्यामागील सामाजिक कारणांचा शोध घेतला जात नाही. सिंधमधील विद्यार्थ्यांचा रोष याच पार्श्वभूमीवर समजून घ्यावा लागतो. सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी जर ओळख आणि राजकीय संबंध सर्वोच्च ठरत असतील, तर असंतोष निर्माण होणारच.
तरुणाईचा असंतोष हा समाजाच्या भविष्याशी जोडलेला असतो. जेव्हा शिक्षण घेतलेली पिढी रोजगाराच्या प्रतीक्षेत राहते, जेव्हा संधींचे वितरण त्यांना असमान वाटते, जेव्हा निर्णय प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवले जात असल्याची भावना निर्माण होते, तेव्हा या असंतोषाला राजकीय स्वरूपही प्राप्त होते. आज पाकिस्तानात सिंधबरोबरच, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वाही अस्वस्थ आहे. सिंध तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग. कराचीसारखे महानगर याच प्रदेशात. तरीही याभागात विकास, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर नाराजी आहे.
बलुचिस्तानचा प्रश्न तर आणखीच गुंतागुंतीचा. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध या प्रांतापर्यंत, संपत्तीचा लाभ कधी पोहोचलाच नाही. संसाधनांवरील नियंत्रण, लष्करी कारवाया, बेपत्ता व्यक्तींचे प्रश्न आणि केंद्र सरकारवरील अविश्वासाने तेथील असंतोषाला धार दिली. खैबर पख्तूनख्वाच्या मुळाशीही अस्थिरताच. अफगाणिस्तानातील युद्ध, दहशतवादाचा सर्वाधिक परिणाम याच प्रांताने सहन केला. सर्वांगीण विकासाची अपेक्षा असलेल्या या खैबर पख्तूनख्वाला, दीर्घकाळ असुरक्षिततेचाच सामना करावा लागला.
पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या आज भारत नसून, त्यांची राज्यव्यवस्थाच आहे. सिंधमधले विद्यार्थी प्रश्न विचारत आहेत, बलुचिस्तानमध्ये लोक प्रतिनिधित्व मागत आहेत, खैबर पख्तूनख्वात सुरक्षित आयुष्याची मागणी आहे, तर अर्थव्यवस्था ‘आयएमएफ’च्या आधारावर श्वास घेत आहे. या प्रत्येक प्रश्नाचे स्वतंत्र उत्तर असू शकते; पण त्यांची मूळ कारणे एकाच व्यवस्थेत दडलेली आहेत. सिंधमधील विद्यार्थ्यांचा आवाज हा पाकिस्तानला ही व्यवस्था बदलण्याचा दिलेला इशाराच म्हणावा लागेल.
कौस्तुभ वीरकर