पंतप्रधान मोदींना पदावरून हटविण्याचे सारे मार्ग विफल ठरल्यामुळे वैफल्यग्रस्त विरोधकांनी आता थेट दंगेधोपे करून देशात अराजक माजविण्याचा कट रचला आहे. कसेही करून मोदी-शाह यांना पदावरून दूर करण्यासाठी घायकुतीला आलेल्या विरोधकांची ही अत्यंत घातक खेळी. बाकी काही नाही, तरी उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभांमध्ये भाजपला पुन्हा विजय मिळू न देण्यासाठी विरोधकांचे हे डावपेच आहेत. ‘सीजेपी’चे आंदोलन ही तर फक्त सुरुवात आहे.
तिन्ही सेनादलांचे पहिले संयुक्त प्रमुख (सीडीएस) दिवंगत जनरल बिपीन रावत यांनी भारत सरकार अडीच आघाडयांवर युद्ध लढत असल्याचे म्हटले होते. त्यांपैकी दोन आघाडया म्हणजे पाकिस्तान व चीन. अर्धी आघाडी ही भारतातीलच देशविरोधी शक्तींची आहे, असे जन. रावत यांचे मत होते. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील घटनांनी ही ‘अर्धी आघाडी’ आता अर्धी राहिली नसून, तीसुद्धा एक पूर्ण आघाडी बनली आहे, हे दिसून आले.
‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे निमित्त करून ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाच्या केवळ सोशल मीडियावर अस्तित्वात असलेल्या एका पक्षाने जे मोठे आंदोलन उभे केले, तो सारा घटनाक्रम एखाद्या मसाला हिंदी चित्रपटाच्या कथानकाला शोभावा असाच होता. ज्याचे नावही कोणी ऐकलेले नाही, अशा कोणा अभिजित दीपके या तरुणाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ अशा विचित्र नावाचा पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. अर्थात, हा पारंपरिक स्वरूपाचा पक्ष नव्हता आणि आजही नाही. त्याने ही घोषणा सोशल मीडियावर केली आणि आजही हा पक्ष केवळ तिथेच अस्तित्वात आहे.
दीपकेने या पेपरफुटीसाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरले आणि त्यांचा राजीनामा मागितला. त्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे त्याने धरणे आंदोलन सुरू केले. पण, त्याच्या या आंदोलनाला कोणीच विशेष प्रतिसाद दिला नाही. कोणत्याही विरोधी पक्षाचा एकही नेता तिथे फिरकला नव्हता किंवा सामान्य लोकही तिथे गेले नव्हते. मात्र, काही दिवसांनंतर तेथे सोनम वांगचूक यांनी आमरण उपोषण सुरू केले आणि चित्र पालटले. अचानक तेथे शेकडो आणि लवकरच हजारो तरुणांची गर्दी उसळळी. दीपकेने दि. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा नेण्याचा निर्णय जाहीर केला आणि नंतर दिल्लीच्या रस्त्यावर जणू रण माजले.
लोकसभा निवडणुकांना अडीच वर्षांचा अवकाश असताना आता अचानक मोदींविरोधात हिंसक आंदोलन कसे उभे राहिले, हा खरा विचार करण्यासारखा प्रश्न. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या जवळपास प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपने नेत्रदीपक यश मिळविले. हरियाणासारख्या ज्या राज्यात भाजपला यश मिळणार नाही, असे वाटत होते; तेथेही भाजप स्वबळावर सत्तेत आला. प. बंगालसारखा ‘सेक्युलॅरिझम’चा अभेद्य किल्ला उद्ध्वस्त झाला. त्यामुळे प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेल्या भाजपने घटनादुरुस्ती करणारी विधेयके संमत करण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये लागणारे दोन तृतीयांश बहुमत सत्ताधारी आघाडीकडे नव्हते. तेव्हा काही विरोधी पक्षांच्या खासदारांना आपल्या पक्षात वा अन्यत्र सहभागी करून घेण्यात आले. द्रमुकसारख्या विरोधी आघाडीतून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असलेल्या पक्षाला आपल्या बाजूला वळवून घेण्यात भाजपला यश आले.
भाजपचे हे सारे डावपेच विरोधकांचे अस्तित्वच नष्ट करण्याच्या दिशेने जात असल्याचे पाहून विरोधी नेत्यांमध्ये विलक्षण चलबिचल माजली. कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल; पण भाजपला रोखण्याची रणनीती आखली गेली. सनदशीर मार्गाने भाजपला हरविणे अशक्य असल्याचे दिसून आल्यामुळे विरोधकांनी आता अखेरचा उपाय योजला. तो म्हणजे देशभरात अशांतता व अराजक माजवून सत्ताधारी पक्षाला जेरीला आणणे. यामागचे डोके आणि डावपेच हे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचे होते. देशापुढील खरा धोका राहुल गांधी नसून केजरीवाल आहेत, ही गोष्ट राष्ट्रभक्तांनी लक्षात घेतली पाहिजे. कारण, ‘कॉकरोच पार्टी’ आणि त्याचा नेता दीपके हेही ‘आम आदमी’च्याच शाखा आहेत. या आंदोलनासाठी तत्कालीन ज्वलंत नसलेला विषय उकरून काढण्यात आला तो म्हणजे, ‘नीट’ची पेपरफुटी! पेपरफुटी घडली दि. ३ मे रोजी आणि त्याविरोधात आंदोलन सुरू झाले दि. ६ जून रोजी. दरम्यानच्या काळात सरकारने तत्काळ ‘एसआयटी’ स्थापन करून काही दोषी व्यक्तींना अटक केली होती. ‘नीट’ची फेरपरीक्षाही सुरळीत पार पडली. तरीही, याचे निमित्त करून आंदोलन उभे केले गेले. त्याला लागणारी सारी रसद ही परदेशातून आयात झाली.
आंदोलन उभे केले, त्यात हिंसाचार केला की, सरकार नमते घेते हे विरोधकांच्या लक्षात आले आहे. उघडपणे हिंसाचार करणार्यांवरही कठोर कारवाई करण्यात भाजपचे नेते कच खातात, हेही विरोधकांनी हेरले आहे. कारण, देशातील वृत्तपत्र आणि टीव्ही मीडिया हा विरोधकांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यावरून सरकारच्या नसलेल्या दडपशाहीचा प्रपोगंडा व्यवस्थित प्रसारित करता येतो. म्हणूनच, पाच राज्यांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी नवी आणि हिंसक आंदोलने उभी केली जातील. त्यासाठी इथेनॉलमिश्रित पेट्रोल, राम मंदिरातील दानचोरी, अमेरिकेशी होणारा व्यापारी करार यांसारखे नसलेले विषयही उकरून काढले जातील. सरकारमधील अमित शाह, गडकरी, प्रल्हाद जोशी यांसारख्या सक्षम आणि खंबीर नेत्यांना लक्ष्य केले जाईल.
येत्या काही महिन्यांत देशभरात
अशांतता माजविण्याचे जोरदार प्रयत्न केले जातील. संसदेत गोंधळ घालून संसदेत कामकाज होऊ न देणे, हा विरोधी पक्षांचा प्रमुख उद्देश राहील. त्यांना परदेशी शक्तींकडून भक्कम पाठबळ उपलब्ध असेल.
परदेशात स्थित असलेल्या देशविरोधी शक्तींकडून अशी आंदोलने करण्याचा कट असल्याचे सरकारच्या आता लक्षात आले असेल, अशी आशा आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन ही तर फक्त सुरुवात आहे. मोदी यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांकडे आता यापेक्षा वेगळा मार्गच उरलेला नाही. भाजपविरोधात देशांतर्गत अर्धी नव्हे, तर आता पूर्ण आघाडी उभी राहात आहे.
-राहुल बोरगांवकर