मुंबई (अक्षय मांडवकर) - सह्याद्रीतील यंदाच्या अनियमित आणि खंडित पावसाचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर जैवविविधतेवरही स्पष्टपणे दिसू लागला आहे (sahyadri plant). विशेषतः पावसाळ्यात बहरणाऱ्या दुर्मिळ ऑर्किड्स आणि इतर हंगामी वनस्पतींच्या फुलण्याच्या वेळापत्रकात मोठे बदल झाल्याची नोंद वनस्पती अभ्यासकांनी केली आहे (sahyadri plant). काही प्रजातींना नेहमीपेक्षा जवळपास महिनाभर उशिरा फुले येत आहेत, तर काहींमध्ये फुलण्याआधीच फळधारणा झाल्याचे आश्चर्यकारक चित्र दिसून आले आहे. (sahyadri plant)
एलनिनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये पडलेल्या खंडाचा परिणाम सह्याद्रीतील दुर्मीळ, प्रदेशनिष्ठ आणि संकटग्रस्त वनस्पतींच्या बहरावर पडला आहे. वनस्पतीशास्त्रज्ञांच्या क्षेत्रीय निरीक्षणांमधून यंदाच्या पावसाळ्यातील बदलांचे हे चित्र समोर आले आहे. वनस्पती निरीक्षक आणि छायाचित्रकार मयुरेश कुलकर्णी यांच्या मते, साधारणपणे जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात फुलणारे फीका शिंपला (Eria filiformis) हे ऑर्किड यंदा अद्याप कळीच्या अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे जुर्लै महिन्यात मोठ्या संख्येने बहरणाऱ्या पाचगणी हबेआमरी (Habenaria suaveolens) आणि कंगवा हाबेआमरी (Habenaria heyneana) या दोन्ही प्रजातींनाही अद्याप फुले न येता फक्त कळ्याच दिसत आहेत. या फुलांना बहरण्यास अजून १५ ते २० दिवसांचा अवधी लागणार आहे.वनस्पतीशास्त्रज्ञ चिंतन भट यांनीही याच निरीक्षणांना दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, यंदा जमिनीवर उगवणाऱ्या अनेक ऑर्किड प्रजातींना साधारण एक महिन्याचा विलंब झाला आहे.
चिंतन भट यांच्या निरीक्षणानुसार अनेक ठिकाणी गवताची वाढ अपेक्षेपेक्षा कमी झालेली दिसत आहे. त्यामुळे पावसाळी अधिवासाचे स्वरूप बदलत असून अनेक वनस्पतींना आवश्यक सूक्ष्म वातावरण (Microhabitat) तयार होत नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारण जूनअखेरीस फुलणारी आषाढ हाबेआमरी (Habenaria grandifloriformis) यंदा जुलैअखेरीस फुलू लागली आहे. चिरे हाबेआमरी (Habenaria rariflora) या प्रजातीतही हाच कल दिसून आला आहे. याउलट, साधारण ऑगस्टमध्ये फुलणारी जीवंती (Dendrobium nodosum) या ऑर्किडला फुलोऱ्यानंतर थेट फळधारणा झालेली दिसून येत आहे. म्हणजेच या प्रजातीच्या जीवनचक्रात उलटाच बदल झाल्याचे निरीक्षण समोर आले आहे. याशिवाय Habenaria stockii, Habenaria aristata आणि Habenaria plantaginea या काही हबेअमरी प्रजाती अद्याप जमिनीतून उगवल्याच नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
आम्ही महाराष्ट्रातून पहिल्यांदाच नोंदवलेल्या मैसूर इरिया (Pinalia mysorensis) या ऑर्किडने तर अद्याप कळ्याही धारण केलेल्या नाहीत. तर ओबेरोनिया चंद्रशेखरयी (Oberonia chandrashekaranii) या दुर्मिळ ऑर्किडला देखील आता कळ्या येण्यास सुरुवात झाली आहे. या दोन्ही प्रजाती प्रामुख्याने जुलै महिन्यात बहरतात. - मयुरेश कुलकर्णी, वनस्पती निरीक्षक
पावसाळ्यात काही दिवस किंवा काही आठवडेच जीवनचक्र पूर्ण करणाऱ्या अल्पायुषी हंगामी वनस्पती (Ephemeral Plants) यांचा बहर यंदा उशिराने होत असल्याचे निरीक्षण आहे. या वनस्पतींचे जीवनचक्र पावसाच्या सुरुवातीशी अत्यंत निगडित असल्याने पावसातील खंड त्यांच्यावर थेट परिणाम करत आहे. यामध्ये अत्यंत संकटग्रस्त मॅकॅन कंदीलफूल (Ceropegia maccanii), नागकंद (Arisaema tortuosum), सफेद मुसळी (Chlorophytum borivilianum) अशा काही प्रजातींचाही समावेश आहे. - चिंतन भट, वनस्पती अभ्यासक
हवामान बदलाचे संकेत?
तज्ज्ञांच्या मते, पावसाच्या आगमनातील अनिश्चितता, दीर्घ खंड, कमी पर्जन्यमान आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे वनस्पतींच्या फुलण्याच्या आणि वाढीच्या वेळापत्रकात बदल होत आहेत. अनेक ऑर्किड्सचे परागीभवन विशिष्ट कीटकांवर अवलंबून असते. जर फुलण्याची वेळ आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांची उपस्थिती यामध्ये तफावत निर्माण झाली, तर त्या प्रजातींच्या बीजनिर्मितीवर आणि दीर्घकालीन अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो.संशोधकांच्या मते, यंदाची निरीक्षणे ही केवळ एका वर्षापुरती मर्यादित न ठेवता पुढील काही वर्षे सातत्याने नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे हवामान बदलामुळे पश्चिम घाटातील वनस्पती जैवविविधतेमध्ये होत असलेल्या बदलांचे अधिक अचूक चित्र समोर येईल.