पुण्याचे 'जगदीश आफळे' श्रीराम मंदिराचे पहिले सचिव म्हणून नियुक्त

ट्रस्टच्या सप्टेंबर मधील बैठकीत औपचारिक शिक्कामोर्तब होणार

    30-Jul-2026   
Shri Ram Mandir
 
मुंबई : (Shri Ram Mandir) अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या प्रशासकीय व्यवस्थेला अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ट्रस्टने मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यापूर्वी ट्रस्टचे पहिले सचिव म्हणून जगदीश आफळे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीवर २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ट्रस्टच्या बैठकीत औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे. यासोबतच त्यांची भारतीय स्टेट बँकेतील ट्रस्टच्या खात्यांसाठी अधिकृत स्वाक्षरीकर्ते म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. राम मंदिरातील देणगी चोरीच्या वादानंतर ट्रस्टने प्रशासकीय रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, सचिवपदाची निर्मिती आणि नियुक्ती ही त्याच प्रक्रियेचा भाग मानली जात आहे.(Shri Ram Mandir)
 
राम मंदिर ट्रस्टने यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सचिव आणि प्रवक्ते अशी नवीन प्रशासकीय पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सीईओ निवडीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. अशी माहिती आहे की, सीईओ पदासाठी सुमारे ५,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची छाननी आणि निवड प्रक्रिया निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोहली यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून सुरू आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहावे म्हणून प्रथम सचिवाची नियुक्ती करण्यात आली.(Shri Ram Mandir)
 
नव्याने नियुक्त झालेले सचिव जगदीश आफळे हे मूळचे पुणे, महाराष्ट्र येथील असून व्यवसायाने विद्युत अभियंता (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) आहेत. त्यांनी आयआयटी मुंबईमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.टेक. आणि एम.टेक. पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच युरोप आणि अमेरिकेतील कंपन्यांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावली. निवृत्तीनंतर ते भारतात परतले. राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर त्यांनी आपला व्यावसायिक अनुभव मंदिर उभारणीसाठी समर्पित केला. त्यांनी कोणतेही मानधन न घेता प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. मंदिर बांधकामाच्या देखरेखीत आणि प्रकल्प व्यवस्थापनात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.(Shri Ram Mandir)
 
बालपणापासून संघाचे स्वयंसेवक
 
जगदीश आफळे यांचा बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे. राम मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर संघाने त्यांच्यावर संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून ते अयोध्येत राहून मंदिर उभारणीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या कामांवर देखरेख करत आहेत. सध्या ते पत्नीसमवेत तीर्थ क्षेत्र भवनात वास्तव्यास आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि दीर्घकालीन योगदानाचा विचार करून ट्रस्टने त्यांच्यावर सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. (Shri Ram Mandir)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर