मुंबई : (Drug Free Mumbai) राज्यातील युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी सरकारने सुरू केलेले 'ड्रग्ज फ्री मुंबई' अभियान ही केवळ सरकारी मोहीम नसून समाजव्यापी जनआंदोलन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या अभियानाच्या निमित्ताने आयोजित शपथविधी कार्यक्रमात त्यांनी युवकांना ड्रग्जला ठामपणे 'नाही' म्हणण्याचे आवाहन केले.
यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील तरुणांना नशामुक्त करण्याच्या अभियानासाठी पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले. राज्य शासनाच्यावतीने 'नशामुक्ती जनजागृती अभियान' अंतर्गत आज (गुरुवार) मुंबईतील एनएससीआय डोम, वरळी येथे सकाळी १० वाजता सामूहिक शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.(Drug Free Mumbai)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरळी डोम येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल १० हजाराहून अधिक तरुण आणि त्यांचे पालक, शिक्षकांनी नशामुक्त मुंबईसाठी उपस्थित राहून नशा मुक्त मुंबईसाठी शपथ घेतली. तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. यावेळी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी (सदस्य सचिव) सौरभ कटियार तसेच सपना श्रॉफ हे देखील उपस्थित होते.(Drug Free Mumbai)
मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी 'नशामुक्त भारत'चा संकल्प मांडला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्र' आणि 'ड्रग्ज फ्री मुंबई' ही काळाची गरज आहे. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे देशातील तरुणाई असून शत्रूराष्ट्रांकडून युवकांना व्यसनाधीन बनवून देश कमकुवत करण्याचे छुपे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ड्रग्ज हे या छुप्या युद्धाचे शस्त्र बनले असून त्याविरोधात सरकार, पोलीस, पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्रितपणे लढा देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉलेज परिसरात अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून युवकांनी स्वतःच ड्रग्जला नकार दिला, तर विक्रेत्यांची हिंमत होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "मजा नाही, तर ही सजा आहे," हा संदेश प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Drug Free Mumbai)
यावेळी मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र पाठविणार असल्याची माहिती दिली. व्यसनाधीनतेकडे झुकणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी समुपदेशन करून मुख्य प्रवाहात आणण्याचे तसेच ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात 'गनिमी कावा' पद्धतीने कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले. २१ ते २२ वर्षांच्या वयापर्यंत अमली पदार्थांपासून दूर राहणारे युवक पुढील आयुष्यातही त्यापासून दूर राहतात, असे सर्वेक्षण सांगत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.(Drug Free Mumbai)
कार्यक्रमात बोलताना कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही हे अभियान काळाची गरज असल्याचे सांगितले. युवकांना भ्रष्ट करण्याचे षडयंत्र शत्रूराष्ट्रांकडून रचले जात असून त्याविरोधात सरकार कठोर कारवाई करत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई पोलिसांकडून सातत्याने धाडी टाकून कारवाई सुरू असल्याचे सांगत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.(Drug Free Mumbai)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठी जनचळवळ उभी राहत असल्याचे सांगत लोढा यांनी या अभियानातून जनजागृती आणि प्रबोधनावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 'कुटुंब प्रबोधन' हेही महत्त्वाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे अभियान यशस्वी करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित युवकांना "ड्रग्ज फ्री मुंबई कोण करणार? अशी घोषणा देली,या आवाहनाला तरुणांनी 'आम्ही करणार!' असे म्हणत उस्फूर्त प्रतिसाद दिला.(Drug Free Mumbai)