आत्मशुद्धीचे महापर्व

    30-Jul-2026
 
Chaturmas Significance
 
 
आषाढी एकादशी झाली आणि त्याबरोबरच चातुर्मासाची सुरुवात झाली. या चार महिन्यात आता घरोघरी व्रतवैकल्य, जपजाप्य, उपवास यांची सुरुवात होते. अनेकांच्या घरी पारायणे, तर अनेकांच्या घरी व्रतांचे पालन नेमाने होते. मात्र, या चातुर्मासाचे अध्यात्मिक महत्त्व अनेकांना ज्ञात असले, तरीही त्यामागील शास्त्रकारांच्या धारणेवर चिंतन होताना दिसत नाही. त्यामुळे चातुर्मासाचा सर्वांगीण आढावा घेणारा हा लेख...
 
आषाढी एकादशी झाली की, घरातलं वातावरण नकळत बदलतं. कुणी कांदा-लसूण बाजूला ठेवतं, कुणी दुपारी पोथी काढून बसतं, कुणाच्या रोजच्या ताटातून एखादा पदार्थ गुपचूप गायब होतो. लग्नाची बोलणी ‘कार्तिकीनंतर बघू’ म्हणून पुढे ढकलली जातात. पुढचे चार महिने चातुर्मासाचे!
 
आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा तो काळ. पहिलीला ‘देवशयनी’ म्हणतात, शेवटच्या एकादशीला ‘प्रबोधिनी.’ या दिवसांत विष्णू क्षीरसागरात निद्रिस्त असतात, म्हणून विवाह, मुंज, वास्तुशांती अशा मंगलकार्यांना मुहूर्त नाही. कार्तिकीनंतर तुळशीविवाह होतो आणि लग्नसराई पुन्हा सुरू होते. देव झोपतात, ही कल्पना जरा उलगडून पाहिली, की तिच्या तळाशी आकाशाचं निरीक्षण सापडतं. आषाढाच्या सुमारास सूर्य दक्षिणेकडे वळतो. ‘उत्तरायण’ हा देवांचा दिवस आणि ‘दक्षिणायन’ ही देवांची रात्र, असं म्हटलं आहे. प्रकाश मंदावत जातो म्हणून देव निद्रिस्त ही निव्वळ पुराणकथा नाही; पुराणातील ऋतूची नोंद आहे.
 
आपल्या परंपरेत संन्याशासाठी एक कडक नियम होता, कुठेही फार दिवस मुक्काम करायचा नाही! धर्मशास्त्रांनी तर हिशोबच घालून दिला होता, गावात एक रात्र, नगरात त्याहून थोडे दिवस, बस्स! एका ठिकाणी रुळलं की माणसं जोडली जातात, सवयी लागतात, ‘माझं’ म्हणण्याजोगं काहीतरी तयार होतं. ते होऊ नये, म्हणून सतत चालत राहायचं. जैन मुनी आणि बौद्ध भिखू यांच्यासाठीही नेमका हाच दंडक होता. पण, पावसाळ्यात हा नियम पाळणं शयच नव्हतं. नद्यांना पूर येत, होड्या बंद पडत, वाटा चिखलानं बुजून जात. भिजत राहणार्‍या, उघड्यावर झोपणार्‍या माणसाला साथीचे आजार गाठत. भर पावसात कुणी दार उघडून अन्न वाढेल, याचीही शाश्वती नव्हती. चालत राहण्याच्या दंडकापुढं निसर्गानंच मर्यादा घातली.
 
म्हणून नियम उलटाच करण्यात आला, वर्षातले हे चार महिने एका ठिकाणी थांबायचं! आपण त्याला ‘चातुर्मास’ म्हणतो; बौद्ध परंपरा त्याला ‘वर्षावास’ म्हणते; जैन परंपरेतही तो ‘चातुर्मास’च. तिन्हींचे तत्त्वज्ञान वेगळे, पण काळ तोच. कारण, हा काळ कुणा एका पंथानं नव्हे, पावसानं ठरवून दिला आहे. आणि हे थांबणं आपल्याकडे किती खोलवर रुजलं आहे, हे महाराष्ट्राला वेगळं सांगावं लागत नाही. चातुर्मासाची सुरुवात होते, तीच आषाढी वारीनं आणि सांगता होते कार्तिकी वारीनं. दोन्ही टोकांना पंढरपूर उभं आहे.
 
वर्षभर भटकणारा ज्ञानी माणूस चार महिने गावात उपलब्ध झाला. त्यातून प्रवचनं सुरू झाली, पोथ्यांची पारायणं झाली, कीर्तनं रंगली. सक्तीच्या मुक्कामाचं रूपांतर अख्ख्या समाजाच्या शिक्षणसत्रात झालं. चातुर्मासात वाचनाचे, श्रवणाचे नेम का धरले जातात, याचं उत्तर तिथं आहे. सोबत आणखी दोन गोष्टी होत्याच. पेरणी आटोपते आणि प्रतीक्षा सुरू होते. मागच्या वर्षीचं धान्य संपत आलेलं असतं आणि नवं हाती यायचं असतं. अशा वेळी आहारावरचा संयम ही धार्मिक शिस्त नव्हे, तर व्यवहाराची गरज झाली होती.
 
दुसरी गोष्ट आरोग्याची. पावसाळ्यात जठराग्नी मंदावतो, पाणी दूषित होतं, पालेभाज्या किडया निघतात. श्रावणात पालेभाजी नको, भाद्रपदात दही नको, आश्विनात दूध नको, कार्तिकात द्विदल नको, हे नियम त्यातूनच आले. प्रत्येकामागं त्या त्या महिन्यातलं एक ठोस निरीक्षण उभं आहे.
 
पण, या चार महिन्यांचं खरं वेगळेपण दुसरंच आहे. वर्षातला हा एकमेव काळ असा, की ज्यात बाहेरचं सगळंच थांबतं. लग्नं नाहीत, नव्या उद्योगाचे मुहूर्त नाहीत, लांबचे प्रवास नाहीत. माणूस घरात कोंडलेला, बाहेर अखंड पाऊस. असं रिकामपण एकतर भोगायचं असतं, नाहीतर वापरायचं! परंपरेनं ते वापरायचं ठरवलं. वर्षातला जो काळ बाहेरून सर्वांत निष्क्रिय, तोच आतून सर्वांत सक्रिय केला.आणि इथं एक मुद्दा येतो, जो परंपरेनं शब्दांत मांडलेला नाही, पण तिच्या रचनेतून स्पष्ट दिसतो. ‘चातुर्मास’ म्हणजे सलग कितीतरी आठवडे सूर्य न दिसण्याचे दिवस. ढगाळ आकाश, ओलसर भिंती, दुपारीच अंधारून येणं. प्रकाशाचा आणि मनःस्थितीचा संबंध आता विज्ञानानंही नोंदवला आहे. उजेड कमी झाला की, शरीराचं जैविक घड्याळ ढळतं, झोप आणि भुकेचा ताल बिघडतो, उत्साह मंदावतो आणि एक अनामिक मरगळ मनाला येते.
 
अशा वेळी काय मदत करतं? रोजच्या दिवसाला मिळालेली चौकट मदत करते आणि ‘नेम’ नेमकं तेच देतो. दिवसाच्या शेवटी आज मी ठरवलेलं पाळलं एवढी भावनाही, उदासीवरचं फार साधं औषध असतं. भजन, कीर्तन, सामूहिक पारायण, एकत्र उपवास हे कोंडलेल्या माणसाला चार माणसांत आणतात.
 
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सण. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, कोजागरी, दिवाळी. वर्षातले जवळजवळ सगळेच मोठे सण, नेमके याच चार महिन्यांत ठासून भरलेले आहेत. वर्षातला सर्वांत कुंद आणि कोंडलेला काळ हाच सर्वांत जास्त दिव्यांचा आणि गर्दीचा काळ असावा, हा योगायोग वाटत नाही.
 
या सार्‍याच्या मुळाशी मात्र एकच गोष्ट आहे. व्रतवैकल्यांच्या निमित्तानं खरं तर मनाला आवर घालण्याचा प्रयत्न चाललेला असतो. मन ताब्यात ठेवायचं असेल, तर त्याला ऐकण्याची सवय असावी लागते. ती एका दिवसात लागत नाही. मोठ्या मोहाचा प्रसंग समोर आल्यावर आता संयम पाळू, असं ठरवून मन ऐकत नाही. सैनिकाला युद्धाच्या दिवशी शिस्त शिकवता येत नाही; ती रोजच्या कवायतीतून अंगात मुरावी लागते. शरीरावर होणारे परिणाम आहेतच, पण ते दुय्यम. आपल्याला वाटेल ते, मनाला येईल ते करायचं नसतं, एवढं मनावर बिंबवणं, हाच खरा हेतू. पदार्थ काय टाळला, यापेक्षा नकार म्हणण्याचा सराव झाला का, हे महत्त्वाचं.
 
पूर्वजांना हेही पक्कं ठावूक होतं की, एखादी गोष्ट अनिवार्य केल्याशिवाय समाज ती ऐकत नाही. म्हणून त्यांनी या शिकवणीला देवधर्माचं अधिष्ठान दिलं. ‘हे आरोग्याला बरं’ एवढंच म्हटलं असतं, तर ते चार दिवसांत विसरलं गेलं असतं. ‘हे व्रत आहे’ म्हटल्यावर मात्र ते पिढ्यान्पिढ्या टिकलं.
 
नेम म्हणजे तरी काय? सातत्यानं केलेली कोणतीही गोष्ट. ती भव्य असायला हवी असं नाही. रोज एक अध्याय वाचणं, पहाटे उठणं, एक पदार्थ वर्ज्य करणं, कुणाशी कठोर न बोलणं. कृती लहान चालेल, सातत्य मात्र अभंग हवं. आणि त्यामागचा उद्देश एकच तो म्हणजे, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणं. आजची पिढी हेच ३० दिवसांचं आव्हान किंवा ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणून करते. रूप बदललं, कल्पना तीच. एक धोका मात्र आहेच. अर्थ हरवला की नेमाचं नुसतं कर्मकांड होतं. चार महिने कांदा वर्ज्य करून बाकी वागण्यात तसूभरही फरक पडत नसेल, उलट मी पाळतो, तू पाळत नाहीस’ अशी तुलना सुरू होत असेल, तर मूळ हेतू हरवला. व्रत हा स्वतःशी केलेला करार असतो, इतरांना दाखवण्याचं प्रमाणपत्र नव्हे. पूर्वजांनी संयमाचं हे शास्त्र देवाच्या नावानं आपल्या हाती सोपवलं. त्यातला देव मानायचा की नाही, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. पण त्यातलं शहाणपण नाकारण्याचं कारण मात्र कुणालाच नाही!
 
-आसावरी पाटणकर 




संबंधित मजकूर