वायुतत्त्व
पंचतत्त्वातील वायुतत्त्व दुसरे असून ते विश्वाच्या कोणत्याही स्थळी तत्क्षण गमन करते, असा उच्च साधकांचा अनुभव आहे. आजचे विज्ञानही तसेच मानते.वायुतत्त्वातील वायू म्हणजे हवा नसून, आकाशतत्त्व ज्या अवस्थेत वायुतत्त्वाची विक्राळ गती प्राप्त करते, त्यास वायुतत्त्व म्हणतात. वायू म्हणजे विक्राळ गती जी प्रकाश गतीपेक्षा कित्येक पट अधिक असते. प्रकाशाची गती एका सेकंदास तीन लाख किमी असून, प्रकाशाने एक वर्षांत केलेल्या प्रवासास एक प्रकाशवर्ष म्हणतात. ब्रह्मांड प्रदक्षिणा करण्यास वायुतत्त्वास वेळच लागत नाही. वायुतत्त्वाची ही विक्राळ गती आहे. यासाठी वायुतत्त्वाची साधना अतिशय कठीण असते आणि ती सिद्ध करणारे महान साधक फारच थोडे असतात. वायुतत्त्वाचा साधक प्रचंड बलवान आणि बुद्धिमान असतो. त्यामुळे रामरक्षेत वायुसुत हनुमानाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे,
मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं|
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये|
वायुतत्त्वाची ही भयानक गती ध्यानात येण्याकरिता, वेदात असलेल्या आणि आजच्या विज्ञानाने मान्य केलेल्या लहरींचा विचार करावा लागेल. एखादा आंदोलक जर थोडा हलवला, तर तो विशिष्ट जागेत सतत आंदोलन करतो. त्या आंदोलकाला जर अधिक जागेतून हलविला, तरी त्या आंदोलकाला पूर्वीच्या आंदोलनांना लागणार्या वेळापेक्षा, अधिक लागतो, हे वैज्ञानिक सत्य सगळ्यांनाच माहीत आहे. तद्वत् ओतांच्या (Eletron) लहरव्यासाची (Wave Length) गोष्ट आहे. ओतांमधून दर क्षणाच्याही क्षणाला ‘ओजस्’ म्हणजे (Energy) निघते. त्या ओजसाला एक लांबी अथवा व्यास असतो. ओत इतका सूक्ष्म आहे की, तो विज्ञानाला अजून कोणत्याच उपकरणांद्वारे दिसला नाही. गणिताद्वारेच त्याचे अस्तित्व कळते. असल्या सूक्ष्मातिसूक्ष्म ओताचे ओजस भ्रमण किती सूक्ष्म असेल, याची केवळ कल्पनाच केलेली बरी! असल्या ओताच्या ओजस भ्रमणाचा काळ आणि संपूर्ण अनंताला (Extremity) जाऊन भिडणार्या ओजस भ्रमण व्यासाचा काळ एकच असतो, असे आज नव्याने सिद्ध झाले आहे. ऋग्वेदात हाच सिद्धांत वेदांच्या भाषेत आहे. इंद्राचे म्हणजे, जीवात्म्याचे स्वरूप सांगताना ऋग्वेद सांगतात,
ये अर्वाञ्चस्तां उ पराच आहुर्ये पराञ्चस्तां उ अर्वाच आहुः|
इन्द्रश्च या चक्रथुः सोम तानि धुरा नियुक्ता रजसो वहन्ति॥
ऋग्वेद १|१६४|१९॥
अर्थात, जे जवळ आहे, ते दूर आहे आणि जे अती दूर आहे, ते अती निकट आहे. बैल आपल्या खांद्यावर धुरा घेऊन एका वावरातून दुसर्या वावरात वावराची धुरा ओलांडून जसा जातो, तसेच जीवात्मा (इंद्र) एक जन्म संपल्यावर या जन्माची कर्मरूप धुरा आपल्या कर्मगतिरूप खांद्यांवर घेऊन, अनेक जन्मांच्या धुरा ओलांडून एका मागे एकसारखे जन्म घेतो. अर्थात, ओताची लहर कक्षा ओलांडण्यास जितका वेळ लागतो, तितकाच वेळ या सृष्ट्य जगताच्या दुसर्या टोकास जाण्यास लागतो. वायुतत्त्वाची हीच भयानक गती होय. वायुतत्त्व एकाच क्षणात या अफाट विश्वाच्या दुसर्या टोकास जाऊ शकते. त्या भयानक गतीमुळेच वायुतत्त्वाचा अनुभव साधकाला धूम्र अस्तित्वासारखा वाटतो. अशा वायुतत्त्वाचे अस्तित्व अथवा लोक म्हणजे ‘द्यू’ लोक. या ‘द्यू’ लोकाला धारण करणारा, अधिकार असणारा अतिश्रेष्ठ साधक म्हणजे धृष्टद्युम्न. असली धृष्टद्युम्न अवस्था साधकाला तपस यज्ञाद्वारेच ज्वालांतून, म्हणजे खडतर तपस्येद्वारे प्राप्त होणार! धृष्टद्युम्नाचा जन्म असा आहे. पंचप्राणरूप पांडवांची पत्नी द्रुपदकन्या द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न, अशा तर्हेने सद्वृत्तिरूप पांडव सेनेला सद्वृत्तीच्या व्यूहरचनेत आणतो.
युयुधान सात्यकी
महाभारतात युयुधान सात्यकी एका देशाचा अधिपती दाखविला असून, त्याचा पांडवांशी जवळचा असा संबंध दाखवला आहे. युयुधान सात्यकी शब्दरचनेतील व्यास आशय पाहू. ‘युयु’ म्हणजे झुंज आणि ‘युयुधान’ म्हणजे झुंज देणारा. परंतु, साधकातील असली युयुधान वृत्ती असत्याकरिता भांडणारी नसून, सत्याकरिता भांडणारी होती. ‘सात’ म्हणजे आत्मा किंवा सत्यावस्था, म्हणूनच सत्यापासून अंकित झालेल्या पुरुषार्थी वृत्तीला व्यास ‘सात्यकी’ असे म्हणतात. देव वृत्तींना जन्म देणारी जशी देवकी तद्वत्, सत्य वृत्तींना जन्म देणारी पुरुषार्थी अवस्था सात्यकी होय. असला हा सात्यकी महान पराक्रमी होता. साधकातील अशी अजेयवृत्ती सत्याकरिता कोणाशीच पराजय न मानता, सतत झुंज म्हणजे ‘युयु’ घेत असते. असा सात्यकी पांडवांचा नाही, तर कोणाचा पक्ष घेणार?
विराट
द्युतात हरल्यावर पांडवांना १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालविणे भाग होते. अज्ञातवासात जर पांडवांना कोणी ओळखले, तर त्यांना द्युताच्या अटीनुसार पुन्हा १२ वर्षे वनवास करावा लागणार होता. तेव्हा अज्ञातवासात कोणी आपल्याला ओळखू नये, म्हणून पांडव विराट राजाच्या विराट नगरीत आपापली पूर्व नावे व पूर्वकर्मे बदलून एक वर्ष अज्ञातवासात राहिले. पांडवांचे अज्ञातवासातील उपकारक वागणे पाहून विराट राजाने महाभारत युद्धात पांडवांचा पक्ष घेतला, हे माणुसकीच्या दृष्टीने योग्यच होते. विराटसुद्धा सत्याच्या युद्धात मोठ्या पराक्रमाने लढणारा वीर पुरुष होता. विराट या शब्दयोजनेतून आपण व्यासांना अभिप्रेत असा अर्थ पाहू. मंत्रपुष्पांजलीत वर्णन केलेली वैराज्याची कल्पना विराट कल्पनेशी मिळती-जुळती आहे. ‘राट’ म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे साधकाचा पिंड. शरीरभाव जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत साधक पलीकडील दिव्य भव्य सत्य जाणूच शकत नाही. तुकाराम महाराज स्पष्टच सांगतात. ‘देहभाव हरपला| तुज पाहता विठ्ठला॥’
रामायणातील रामाची सापत्न माता कैकेयी अथवा कैकाया असलीच साधकाची देहभाव विरहित उच्च अवस्था होय. ‘काया’ म्हणजे शरीर आणि कैकाया म्हणजे देहभाव विरहित उच्च अवस्था होय. म्हणूनच कैकेयी एका वरानुसार जीवात्मा रामाला धीर, तापसी बनण्याकरिता दण्डकारण्यात तपस्या करण्यास पाठविते. १४ वर्षे खडतर तपस्या केल्याशिवाय, साधकाला आत्मानंदरूप राम थोडाच होता येईल? याबाबत रामायणातील श्लोक पाहा,
नवपञ्च च वर्षाणि दण्डकारण्यमाश्रितः|
चीराजिनधरो धीरो रामो भवतु तापस:॥
(अयोध्याकांड ७२/२७)
नऊ आणि पाच मिळून एकूण १४ वर्षे चिराजीन धारण करून म्हणजे तापसी जीवन स्वीकारून, रामाने धीरपुरुष बनण्याकरिता तापसी व्हावे, अशा वरानेच कैकायेने आनंदघन रामाला अरण्यात पाठविले.
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७