मुंबई : (Sion Flyover) बीकेसी, कुर्ला, धारावी आणि शीव परिसराला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या शीव उड्डाणपुलाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करून किमान एका बाजूने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी धारावी बचाव आंदोलनाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेकडे केली. यावेळी मुंबई महापालिकेकडून पोहोच रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाल्यास 31 ऑगस्ट 2026 पर्यंत उड्डाणपुलाचा एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले. (Sion Flyover)
मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयातून शीव उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असले, तरी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शीव पूर्व-पश्चिम भागातील संपर्क विस्कळीत झाल्याने स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. पूल बंद असल्यामुळे 90 फूट रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून परिसरातील उद्योग-व्यवसायांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा धारावी बचाव आंदोलनाने केला आहे. (Sion Flyover)
यासंदर्भात आंदोलनाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावेळी महापालिकेकडून पोहोच रस्त्याचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास 31 ऑगस्टपर्यंत पुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पोहोच रस्त्याच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वेळ न मिळाल्याने लवकरच पुन्हा भेट घेण्यात येणार असल्याचे धारावी बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.(Sion Flyover)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.