सेवनहिल्स रुग्णालयाच्या पुनरुज्जीवनाला गती; कॅप्री ग्लोबलसोबत लीज करारास मंजुरी

    29-Jul-2026

SevenHills Hospital
 
मुंबई : (SevenHills Hospital) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने मंगळवारी मरोल येथील सेवनहिल्स रुग्णालयाचा परिसर कॅप्री ग्लोबल व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भाडेपट्ट्यावर (लीज) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
 
हा प्रस्ताव प्रथम मे महिन्यात सुधार समितीसमोर ठेवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी त्याला मंजुरी किंवा नकार देण्यात आला नव्हता. तीव्र चर्चेनंतर हा प्रस्ताव पुनर्विचारासाठी पालिका प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. मंगळवारी तो पुन्हा समितीसमोर मांडण्यात आला आणि बहुमताने मंजूर करण्यात आला.
 
बैठकीदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी खासगी कंपनीकडे रुग्णालयाचा कारभार सोपवण्याची गरज आणि संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी यांनी वैधानिक मंजुरी मिळण्यापूर्वीच रुग्णालय परिसरात काम सुरू झाल्याचा आरोप केला. महापालिकेने ज्या कंपनीशी लीज करार केला आहे, त्या कंपनीने समितीची मंजुरी मिळण्यापूर्वीच काम सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आणि सुधार समितीची मंजुरी नसताना हे कसे शक्य झाले, असा सवाल उपस्थित केला. (SevenHills Hospital)
 
दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत सेवनहिल्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड (एसएचपीएल) साठी कॅप्री ग्लोबल ही यशस्वी समाधान अर्जदार ठरली आहे. गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालय चालवणाऱ्या रिलायन्स फाउंडेशनकडूनही कंपनीला इक्विटी आधारित सहकार्य मिळणार आहे. (SevenHills Hospital)
 
मंजूर प्रस्तावानुसार, कॅप्री ग्लोबलच्या मालकीच्या एसएचपीएलसोबत नवीन लीज करार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत अंधेरी (पूर्व) येथील मरोल परिसरातील पालिकेची सुमारे ६६,६८८ चौरस मीटर जमीन ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर दिली जाणार असून, त्याची मुदत पुढे आणखी ३० वर्षांनी वाढविण्याची तरतूद आहे. रुग्णालयाचे संचालन सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर सुरू राहणार आहे. (SevenHills Hospital)
 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी अंधेरी आणि मरोलमधील लोकप्रतिनिधी सातत्याने महापालिकेनेच हे रुग्णालय चालवावे, अशी मागणी करत असल्याचे सांगितले. खासगी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांसाठी पुरेसे खाट आरक्षित नसतात, तर पालिकेकडे रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक निधी आणि संसाधने उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. (SevenHills Hospital)
 
मात्र, सुधार समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यांनी प्रशासनाकडून कोणतेही अतिरिक्त स्पष्टीकरण न देता हा प्रस्ताव मंजूर केला. (SevenHills Hospital)
 
महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, सेवनहिल्स रुग्णालयाचे पुनरुज्जीवन झाल्यास मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. दीर्घकाळ बंद असलेले हे रुग्णालय पुन्हा सुरू होणार असून, पीपीपी तत्त्वावर पालिकेच्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचाराची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. (SevenHills Hospital)
 
मंजूर पुनर्रचना आराखड्यानुसार, सेवनहिल्स रुग्णालयाचा १,५०० खाटांचे ना-नफा (नॉट-फॉर-प्रॉफिट) तृतीयस्तरीय वैद्यकीय रुग्णालय म्हणून विकास केला जाणार आहे. नव्या संचालकांनी २००५ मधील मूळ करार आणि २०१३ मधील सामंजस्य करार (एमओयू) यातील सर्व अटींचे पालन करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यानुसार रुग्णालयातील २० टक्के म्हणजे ३०० खाटा आणि २० टक्के बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा पालिकेच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या रुग्णांना महापालिकेने निश्चित केलेल्या दरांनुसार उपचार, औषधे आणि तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. (SevenHills Hospital)
 
 




संबंधित मजकूर