महाराष्ट्राची ओळख ही केवळ औद्योगिक, शैक्षणिक किंवा सामाजिक प्रगतीमुळे नाही, तर तिच्या समृद्ध लोकसंस्कृतीमुळेही आहे. संतपरंपरा, शाहिरी, भारूड, लावणी, तमाशा, गोंधळ, वासुदेव, वाघ्या-मुरळी, पोवाडा, आदिवासी नृत्य, झाडीपट्टी अशा असंख्य लोककला प्रकारांनी शतकानुशतके महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला समृद्ध केले आहे. मात्र, यातील अनेक कलाकार उपेक्षित जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, ‘सांस्कृतिक कार्य संचालनालय’ आणि ‘समरसता साहित्य परिषद’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय समरसता लोककला संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने संमेलनाचे अंतरंग उलगडणारा हा लेख...
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, ‘सांस्कृतिक कार्य संचालनालय’ आणि ‘समरसता साहित्य परिषद’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पहिले राज्यस्तरीय समरसता लोककला संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हे संमेलन केवळ एका सांस्कृतिक कार्यक्रमापुरते मर्यादित राहिले नाही, तर लोककला, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलावंतांच्या सन्मानाचा राज्यव्यापी सांस्कृतिक महोत्सव ठरला. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले लोककलावंतांचे राज्यस्तरीय संमेलन.
या संमेलनाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या इतिहासात केवळ लोककला आणि लोककलावंतांसाठी आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच राज्यस्तरीय संमेलन होय. राज्यातील तब्बल २५ हून अधिक जिल्ह्यांमधून दीड हजारांहून अधिक लोककलावंत, साहित्यिक, संशोधक, अभ्यासक, सांस्कृतिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि रसिक या संमेलनात सहभागी झाले. त्यामुळे हे संमेलन लोककलावंतांच्या अभिव्यक्तीचे, संवादाचे, चिंतनाचे आणि भविष्यकालीन दिशादर्शनाचे ऐतिहासिक व्यासपीठ ठरले.
या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘समरसता आणि लोकसंस्कृती’ ही होती. लोककलेच्या माध्यमातून सामाजिक समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना दृढ करणे, लोककलांना आधुनिक काळात नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीला आपल्या लोकपरंपरेशी जोडणे आणि लोककलावंतांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणणे हे या संमेलनाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
संमेलनाच्या समारोपप्रसंगी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी लोककलेच्या जतन आणि संवर्धनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला.त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "सामान्य जनजीवनाचा कलात्मक आविष्कार असलेल्या लोककला आज कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. महाराष्ट्राचा हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी, त्यावर संशोधन करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना ही काळाची गरज आहे.” त्यांनी शासनाने दरवर्षी अशा प्रकारचे लोककला संमेलन आयोजित करण्याची सूचना केली. तसेच भारतातील विविध राज्यांतील लोककलांना एकत्र आणणारा ’भारतीय लोककला महोत्सव’ आयोजित करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली. या कार्यासाठी मराठी भाषा विद्यापीठ पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. लोककलावंतांचा गौरव आणि अनुभवांची समृद्ध मेजवानी संमेलनाध्यक्ष ‘पद्मश्री’ रघुवीर खेडकर यांनी प्रथमच राज्यस्तरावर लोककला संमेलन आयोजित झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, या संमेलनाला मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री उपस्थित राहू शकले नाहीत, याविषयीदेखील खंत व्यक्त केली. सोबतच लोककलावंतांना एकत्र आणण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.
संमेलनातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे, मान्यवर लोककलावंतांच्या मुलाखती. प्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप, ‘पद्मश्री’ रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर आणि जयमाला इनामदार यांच्या संवादातून लोककलांचा संघर्ष, कलाकारांचे जीवन, बदलते सांस्कृतिक वास्तव आणि लोकपरंपरेचे महत्त्व यांचे प्रभावी दर्शन घडले. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधू कांबीकर यांना त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल जाहीर सन्मान करण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लोककलांचे वैभव अनुभवण्याची पर्वणी संमेलनात पारंपरिक वेशभूषेतील लोककलावंतांनी सादर केलेल्या विविध लोककला प्रकारांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. गोंधळ, वाघ्या- मुरळी, वासुदेव, भारूड, शाहिरी, लावणी, आदिवासी नृत्य, झाडीपट्टी यांसारख्या विविध लोककलांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.
संमेलनातील भव्य लोककला दिंडी हे विशेष आकर्षण ठरले. राज्यभरातील एक हजाराहून अधिक लोककलावंत पारंपरिक वेशभूषेत या दिंडीत सहभागी झाले. दुर्मीळ होत चाललेल्या पारंपरिक लोकवाद्यांचे प्रदर्शनही मोठ्या आकर्षणाचे केंद्र ठरले. साहित्य, कविता आणि विचारांचा संगमसंमेलनात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात रानकवी तुकाराम धांडे, ज्येष्ठ कवी वा. ना. आंधळे आणि युवा कवी कुमार चव्हाण यांच्या कवितांनी लोकजीवन, ग्रामीण संस्कृती आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी चित्र उभे केले. यावेळी डॉ. प्रवीण भोळे यांनी लोककलेचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारे अभ्यासपूर्ण चिंतन मांडले.
सांस्कृतिक चळवळीचा नवा अध्याय
पहिले राज्यस्तरीय समरसता लोककला संमेलन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरले. हे संमेलन केवळ लोककलांचे सादरीकरण नव्हते, तर लोककलावंतांच्या प्रश्नांना न्याय देणारे, त्यांच्या कलेचा गौरव करणारे आणि लोकसंस्कृतीच्या भविष्याचा विचार करणारे व्यापक सांस्कृतिक व्यासपीठ होते. राज्यातील विविध भागांतून आलेल्या लोककलावंतांनी, साहित्यिकांनी, संशोधकांनी आणि रसिकांनी या संमेलनाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोककलेविषयी समाजात आजही असलेल्या जिव्हाळ्याचा पुरावा आहे. तिचे जतन, संशोधन, दस्तऐवजीकरण आणि नव्या पिढीपर्यंत संवर्धनपूर्वक हस्तांतरण ही केवळ शासनाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पहिले राज्यस्तरीय समरसता लोककला संमेलन या जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि लोकसंस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा पाया रचणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. या संमेलनातून मांडण्यात आलेले विचार, मंजूर झालेले ठराव आणि व्यक्त झालेली लोककलावंतांची अपेक्षा यांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास महाराष्ट्राची लोककला परंपरा नव्या उंचीवर पोहोचेल आणि भावी पिढ्यांसाठी हा अमूल्य सांस्कृतिक वारसा अधिक सक्षमपणे जतन केला जाईल. संमेलनाचे प्रास्ताविक धनंजय खुडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे, डॉ. धनंजय भिसे आणि जितेंद्र वाईकर यांनी अत्यंत प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि नेटकेपणाने पार पाडले, तर निलेश गद्रे यांनी आभार प्रदर्शन करून या भव्य, वैचारिक आणि लोकसंस्कृतीच्या वैभवाने उजळून निघालेल्या संमेलनाची सांगता केली. बाळासाहेब मालूसकर, परेश गरुड, विकास माने, सुनील खंडाळे, रेश्मा मुसळे-परितेकर, रजनी पाचंगे, आशा तारे, वंदना कुमावत, रविंद्र ननावरे, विजय मोरे आदी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
सात ऐतिहासिक ठरावांनी दिली भविष्याची दिशा
या संमेलनातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे, लोककला आणि लोककलावंतांच्या भवितव्याशी संबंधित सात ऐतिहासिक ठरावांची एकमताने मंजुरी. या ठरावांमध्ये जिल्हास्तरावर लोककला प्रशिक्षण व संशोधन केंद्रे स्थापन करणे, उपेक्षित लोककलांना मुख्य प्रवाहात स्थान देणे, शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात लोकसंस्कृतीचा समावेश करणे, लोककलावंतांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, लोप पावत चाललेल्या लोककलांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणे, नवोदित कलाकार आणि संशोधकांना प्रोत्साहन देणे आणि स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना करणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. या ठरावांतून लोककलावंतांचे सक्षमीकरण, लोकसंस्कृतीचे शाश्वत संवर्धन आणि समरस समाजनिर्मितीचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला.
प्रवीण खुंटे
९७३०२६२११९