मुंबई : (NEET UG Paper Leak) नीट युजी पेपरफुटी प्रतरणात सीबीआयने अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र दिल्लीतील न्यायालयात सादर करण्यात आले असून, आता या प्रकरणाची सुनावणी पेपरफुटी प्रकरणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात होणार आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, पेपरफुटीचा संपूर्ण कट, प्रश्नपत्रिकेचा स्रोत आणि ती परीक्षार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे संपूर्ण नेटवर्क उघडकीस आले आहे. सध्या सर्व १३ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.(NEET UG Paper Leak)
सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये ३६० साक्षीदारांचे जबाब, ४२२ महत्त्वाची कागदपत्रे आणि ४३ भौतिक पुरावे समाविष्ट करण्यात आले आहेत. डिजिटल फॉरेन्सिक अहवाल, हस्ताक्षर तज्ज्ञांचे मत आणि विषयतज्ज्ञांच्या तपासणीतून परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचा बेकायदेशीर प्रसार झाल्याची पुष्टी झाली आहे. या आधारे आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ तसेच सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) अधिनियम, २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीबीआयने स्पष्ट केले की, फॉरेन्सिक विश्लेषण आणि नव्याने समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील काळात आणखी कारवाई केली जाऊ शकते.(NEET UG Paper Leak)
सीबीआयच्या माहितीनुसार, दि. ३ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत पेपरफुटी झाल्याच्या तक्रारीनंतर १२ मे रोजी केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. त्याच दिवशी एफआयआर दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली. या तपासासाठी ७२ अधिकारी आणि ८ सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. तपासादरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक राज्यांतील ९२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. याशिवाय, तपास यंत्रणेने आरोपींची बँक खाती, बँक लॉकर आणि एक डीमॅट खातेही गोठवले आहे.(NEET UG Paper Leak)
पेपरफुटीशी संबंधित संपूर्ण नेटवर्कची ओळख पटली असून तपास अद्याप सुरू आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात होणार असून, सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार आहे.(NEET UG Paper Leak)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक