मुंबई : (Jharkhand Naxalism) माओवादी संघटनेचा शेवटचा सक्रिय केंद्रीय समिती तसेच पोलिट ब्युरो सदस्य मिसिर बेसरा याला अखेर अटक करण्यात आली. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात सुरक्षा दलाने मंगळवारी ही कारवाई केली. मिसिर बेसरा सह गौरव हसदा आणि मोचू या आणखी दोन नक्षलवाद्यांनाही सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती आहे की, याच दिवशी झारखंडमध्ये १६ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, त्यामध्ये अनेक मोठे इनामी नक्षलवादीही आहेत. यावरून असे लक्षात येते की, मिसिर बेसराच्या अटकेनंतर माओवादी संघटनेचा एकही सक्रिय केंद्रीय समिती सदस्य आता बाहेर उरलेला नाही.(Jharkhand Naxalism)
मिळालेल्या माहितीनुसार, मिसिर बेसराला धनबाद-गिरीडीह सीमेवरील टुंडी-मंडिया जंगल परिसरातून अटक करण्यात आली. सुरक्षा दलांनी घातलेल्या वेढ्यातून तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पारसनाथ मंदिराजवळील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. मंगळवारी त्याच्या निकटच्या सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर मिसिर बेसरा जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी सुरक्षा दलांनी त्याला जिवंत पकडण्यात यश मिळवले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तो गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागत नव्हता.(Jharkhand Naxalism)
मिसिर बेसराच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास एक कोटी रुपयांहून अधिकचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, माओवादी संघटना बळकट असताना तिच्या केंद्रीय समितीत ४० हून अधिक सदस्य होते. कालांतराने सुरक्षा दलांनी २१ सक्रिय सदस्यांना अटक केली, चकमकीत ठार केले किंवा आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. मात्र मिसिर बेसरा हा अखेरपर्यंत आत्मसमर्पणास नकार देणाऱ्या मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होता.(Jharkhand Naxalism)
मिसिर बेसराचा मुलगा सिद्धार्थ बेसरा याने सांगितले की, त्याला अद्याप वडिलांच्या अटकेची अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र यापूर्वी अनेकदा पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता. सुमारे १५ दिवसांपूर्वीही पोलिसांनी त्याच्याकडून वडिलांच्या नावाने आणखी एक पत्र लिहून घेतले होते, जेणेकरून त्यांनी आत्मसमर्पण करावे. त्याने सांगितले की, गेल्या २० वर्षांपासून त्याने आपल्या वडिलांना पाहिलेले नाही, मात्र सुरक्षा दलांनी त्यांना जिवंत पकडल्याचा आनंद असल्याची भावना त्याने व्यक्त केली.(Jharkhand Naxalism)
१६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
मंगळवारी झारखंड पोलिसांसमोर १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यापैकी सहा नक्षलवाद्यांवर एकूण ३९ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यामध्ये १२८ गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेला आणि १५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला संतोष महतो याचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण मोहिमा आणि सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाचा सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे.(Jharkhand Naxalism)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक