भारतगौरव भारत-नेपाळ रेल्वे व्यापाराला नवी गती; कोलकाता बंदरातून बिराटनगरपर्यंत थेट धावली मालगाडी

भारत-नेपाळ पहिलीच अंतर्देशीय कंटेनर मालगाडी

India-Nepal Railway Trade
 
मुंबई : (India-Nepal Railway Trade) भारत आणि नेपाळमधील सीमापार मालवाहतुकीच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठत भारतीय रेल्वेने कोलकाता बंदर ते नेपाळमधील बिराटनगर कस्टम्स यार्ड दरम्यानची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी यशस्वीरित्या चालवली आहे. ४० वॅगनच्या या मालगाडीत कॅनोला मालाची वाहतूक करण्यात आली असून, सुधारित भारत-नेपाळ रेल ट्रान्झिट प्रोटोकॉल अंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
 
या नव्या व्यवस्थेमुळे सीमेवर मालाची पुनर्लोडिंग करण्याची आवश्यकता संपुष्टात आली असून, कंटेनरमधील माल थेट कोलकाता बंदरातून बिराटनगरपर्यंत रेल्वेने पोहोचविणे शक्य झाले आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा कालावधी, लॉजिस्टिक खर्च आणि माल हाताळणीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून, भारत-नेपाळमधील द्विपक्षीय व्यापार अधिक वेगवान आणि स्पर्धात्मक होणार आहे. (India-Nepal Railway Trade)
 
या प्रकल्पाचा पाया जोगबनी (भारत) – बिराटनगर (नेपाळ) ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे मजबूत झाला. हा रेल्वेमार्ग जून २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन नेपाळचे पंतप्रधान यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये सुधारित लेटर ऑफ एक्स्चेंजवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर बिराटनगरपर्यंत थेट व्यावसायिक रेल्वे मालवाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. (India-Nepal Railway Trade)
 
पहिल्या थेट कंटेनर मालगाडीची वैशिष्ट्ये
 
मार्ग : कोलकाता बंदर (भारत)-बिराटनगर कस्टम्स यार्ड (नेपाळ)
मालगाडी : ४० वॅगनची कंटेनर फ्रेट ट्रेन
माल : कॅनोला
विशेषता : सीमेवर ट्रान्सशिपमेंटशिवाय थेट रेल्वे मालवाहतूक
आधार : सुधारित भारत-नेपाळ रेल ट्रान्झिट प्रोटोकॉल
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर