आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यासांचा जन्म झाला, तो दिवस आपण ‘गुरुपौर्णिमा’ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ म्हणून साजरा करतो. हिंदू संस्कृतीत व्यासांना ‘जगाचे गुरू’ (जगद्गुरू) मानले गेले आहे. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस व्यासांच्या स्मृतीला समर्पित. आज गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यासांच्या महत्तेचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|’ ही लोकोक्ती सुपरिचित. पण, काहीच त्याचा अर्थ जाणतात. या उक्तीचा अर्थ असा की, या जगात असा कोणताही विषय नाही, ज्याचे निरूपण महर्षी व्यासांनी केलेले नाही. येथे ‘उच्छिष्ट’ या शब्दाचा अर्थ ‘उरलेले’ असा नसून, ’ज्याचा विचार केला आहे, ज्याला आपल्या ज्ञानाने स्पर्श केला आहे,’ असा आहे. ही उक्ती व्यासांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेची आणि भारतीय ज्ञानपरंपरेवरील त्यांच्या अमिट ठशाची साक्ष देते. महर्षी वेदव्यासांविषयी व्यक्त झालेला हा सर्वोच्च गौरव आहे.
एवढे व्यासांनी काय रचले?
भारतीय वाङ्मयपरंपरेत महर्षी व्यास हे केवळ एक ऋषी नाहीत, तर ते विपुल साहित्याचे शिल्पकार आहेत. शंकराचार्यांचे प्रसिद्ध वचन आहे,
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र|
येन त्वया भारततैलपूर्णः
प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः॥
या श्लोकात व्यासांच्या ज्ञानाची तुलना अशा दीपाशी केली आहे, ज्याने ’महाभारत’ या तेलाने संपूर्ण मानवजातीच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरविला.
वेदांचे संपादन
व्यासांनी वेदांचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार विभाग केले. प्रत्येक वेदांच्या अनेक शाखा आहेत. पतञ्जली ऋषींनी लिहिलेल्या ‘महाभाष्य’ग्रंथानुसार वेदांच्या १ हजार १३१ शाखा होत्या. प्रत्येक शाखेचे चार भाग आहेत - संहिता, ब्राह्मण, आरण्यक व उपनिषद.
हे कार्य केवळ संपादन नव्हते, तर भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन करणारे युगप्रवर्तक कार्य होते. म्हणूनच ‘आषाढ पौर्णिमा’ हा दिवस ’व्यासपौर्णिमा’ किंवा ’गुरुपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय गुरु-शिष्य परंपरेचे ते आद्यगुरू मानले जातात.
महाभारताचे रचनाकार
महर्षी व्यासांचे सर्वांत महान कार्य म्हणजे महाभारत. सुमारे एक लाख श्लोकांचा हा ग्रंथ मानवी जीवनाचा विश्वकोश आहे. धर्म-अधर्म, न्याय-अन्याय, सत्ता, कर्तव्य, प्रेम, त्याग, कुटुंब, राज्यकारभार, युद्धनीती आणि अध्यात्म अशा जीवनाच्या सर्व अंगांचा त्यात विचार आहे. म्हणूनच महाभारतातच असे घोषित केले आहे,
यदिहास्ति तदन्यत्र, यन्नेहास्ति न तत्क्वचित्॥
म्हणजेच, जे येथे आहे, ते इतरत्रही असेल; परंतु जे येथे नाही, ते अन्यत्र कुठेही नाही.
महर्षी व्यासांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची वस्तुनिष्ठ दृष्टी. त्यांनी कोणत्याही पात्राचे अंध स्तुतिगान केले नाही. भीष्मांचे व्रत, कर्णाची दानशीलता, विदुरांचे नीतिज्ञान, द्रौपदीचा स्वाभिमान, युधिष्ठिराची धर्मनिष्ठा आणि दुर्योधनाचा अहंकार सर्वांचे गुणदोष त्यांनी निःपक्षपातीपणे मांडले. त्यामुळे ’महाभारत’ हा केवळ इतिहास नसून मानवी मानसशास्त्राचा श्रेष्ठ ग्रंथ ठरतो.
महाभारताचा सर्वांत तेजस्वी रत्न म्हणजे ’श्रीमद्भगवद्गीता’. अर्जुनाच्या विषादाचे निरसन करतांना भगवान श्रीकृष्णांनी कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा जो समन्वय सांगितला, तो आजही जगभरातील विचारवंतांना प्रेरणा देतो. गीता महाभारताच्या शांतिपर्वात सांगितली आहे. जेव्हा भीष्म शरपंजरी झोपतात, तेव्हा धृतराष्ट्र त्यांना भेटायला येतो. त्यावेळी संजय उपस्थित असतो. म्हणून गीतेच्या पहिल्या श्लोकात कुरुक्षेत्रात काय झाले, असा प्रश्न धृतराष्ट्र संजयला करतो.
पुराणे रचली
महर्षी व्यासांना १८ महापुराणांचे रचनाकार मानले जाते. भागवत, विष्णुपुराण, स्कंदपुराण, मार्कंडेयपुराण यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी वेदांचे तत्त्वज्ञान लोकभाषेत आणि कथारूपाने समाजापर्यंत पोहोचविले. मानवी जीवनाला सदाचाराचा मार्ग दाखवला.
वेदान्त दर्शन
’ब्रह्मसूत्र’ हा वेदान्त दर्शनाचा सूत्रग्रंथ त्यांनी रचला. म्हणून त्यांना वेदान्त दर्शनाचे प्रवर्तक मानतात. भारतीय तत्त्वज्ञानातील प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यांपैकी एका महान ग्रंथाचे ते कर्ते ठरतात.
आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असले, तरी मानवी जीवनातील मूलभूत प्रश्न तेच आहेत, कर्तव्य की स्वार्थ? सत्ता की सेवा? संपत्ती की समाधान? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यासांच्या ग्रंथांत सापडते. म्हणूनच, त्यांचे साहित्य कालातीत आहे. ते कोणत्याही एका पंथाचे किंवा एका काळाचे नसून संपूर्ण मानवजातीचे आहे.
महर्षी व्यास हे चिरंजीवी (अमर) मानले गेले आहेत. त्यांनी मानवाला केवळ धर्म आणि कर्तव्याची व्याख्या शिकवली नाही, तर जीवन जगण्याची खरी कला दाखवून दिली.
गुरुपौर्णिमा आणि व्यासपौर्णिमा
त्यांचे मूळ नाव कृष्णद्वैपायन. गंगेच्या एका द्वीपावर जन्म झाल्यामुळे ते ’द्वैपायन’ आणि सावळ्या वर्णामुळे ’कृष्ण’ म्हणून ओळखले गेले. वेदांचे चार विभाग करून त्यांनी ज्ञानाच्या सुव्यवस्थित परंपरेची निर्मिती केली. म्हणूनच ते ‘वेदव्यास’ या नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. बदरी (बोर) वनात जन्म झाल्याने ते ‘बादरायण’ या नावानेदेखील प्रसिद्ध आहेत. नावे वेगवेगळी प्रचलित असली, तरी व्यास एकच आहेत. महर्षी व्यास हे केवळ एक ऋषी नव्हते, तर ते मानवजातीला ज्ञानाचा महासागर देणारे महान विचारवंत, तत्त्वज्ञ आणि साहित्यिक होते.
उपसंहार
महर्षी व्यासांनी भारतीय संस्कृतीला वेदांचे संरक्षण, महाभारताचे अमर महाकाव्य, भगवद्गीतेचे जीवनतत्त्वज्ञान, पुराणांचे लोकशिक्षण आणि ब्रह्मसूत्रांचे तात्त्विक अधिष्ठान दिले. भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृती आणि साहित्याचा इतिहास महर्षी व्यास यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. भारतीय विचारविश्वाचा पाया महर्षी व्यासांनी घातला. म्हणूनच जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी त्यांना विशालबुद्धे असे संबोधले आणि भारतीय परंपरेने कृतज्ञतेने उद्गार काढले,
‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|’ ही केवळ एक प्रशंसात्मक उक्ती नाही; ती महर्षी वेदव्यासांच्या विश्वव्यापी ज्ञान, अद्वितीय साहित्यसंपदा आणि भारतीय संस्कृतीवरील त्यांच्या अमर प्रभावाची यथार्थ ओळख आहे.
श्रीश देवपुजारी
(लेखक हे संस्कृतभारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आहेत)