मुंबई : (Drugs Free Mumbai) तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त जीवनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मुंबईत 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचा शुभारंभ ३० जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानात शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
मंगळवारी महापालिका मुख्यालयात झालेल्या समन्वय बैठकीत आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी योग्य वयात समुपदेशन आणि जनजागृती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने या अभियानाची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयांपासून करण्यात येत आहे. त्यांनी शिक्षण विभाग, पालक-शिक्षक संघ, सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर तसेच स्वयंसेवी संस्थांना हे अभियान व्यापक लोकचळवळ बनविण्याचे आवाहन केले. (Drugs Free Mumbai)
कौशल्य, उद्योजकता व नवोपक्रम मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून हे अभियान राबविण्यात येत आहे. वरळी येथे होणाऱ्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Drugs Free Mumbai)
या अभियानांतर्गत पालिका आणि खासगी शाळांमधील हजारो विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाशी जोडले जाणार असून 'ड्रग्स फ्री मुंबई' ची शपथ घेतील. अधिकाधिक विद्यार्थ्यांचा या शपथ अभियानात सहभाग व्हावा तसेच पालक-शिक्षक संघांनाही याची माहिती देण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. (Drugs Free Mumbai)
या अभियानात पालिका रुग्णालयांतील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर, सुमारे १५० स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारीही ऑनलाइन माध्यमातून सहभागी होणार आहेत. वरळी येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात येणार असून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित पथनाट्याचेही सादरीकरण करण्यात येईल. (Drugs Free Mumbai)
पालिका आयुक्तांनी बेस्ट बस आणि मेट्रो स्थानकांवर या अभियानाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांसाठी drugfreemumbai.org या संकेतस्थळावर ऑनलाइन शपथ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावर नोंदणी करून शपथ घेणाऱ्या सहभागी नागरिकांना तत्काळ डिजिटल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. (Drugs Free Mumbai)