अराजकता निर्माण करणे हाच राहुल गांधींचा अजेंडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर सडकून टीका

    29-Jul-2026
Devendra Fadnavis
 
मुंबई: (Devendra Fadnavis) "देशात अराजकता निर्माण करणे हाच राहुल गांधी यांचा एकमेव अजेंडा आहे. विरोधकांनी सरकारवर टीका करावी, पण देशातील युवकांसाठी सकारात्मक पर्याय मांडण्याऐवजी केवळ आरोप करण्याचे राजकारण सुरू आहे," अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.(Devendra Fadnavis)
 
सीजेपी आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. बहुतांश गुन्हे जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल झाले असून ते मागे घेण्याचे आदेश गृह विभाग आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
 
गडचिरोलीसह काही भागांत नक्षलवाद्यांच्या नावाने लावण्यात आलेल्या पत्रकांबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, तपासात ही पत्रके काही व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थासाठी लावल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.(Devendra Fadnavis)
 
संसदेतील राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी संपूर्ण भाषण ऐकले नाही, कारण त्यांच्याकडे त्यासाठी वेळ नाही. मात्र विरोधी पक्षाने केवळ आरोप करण्यापेक्षा देशातील युवकांसाठी कोणते सकारात्मक पर्याय किंवा उपाय सुचवले, याचे उत्तर द्यावे लागेल. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, "राहुल गांधी कोण आहेत आणि मोदी सरकार काय काम करत आहे, हे देशातील जनतेला चांगलेच माहिती आहे."(Devendra Fadnavis)
 
राज्यात अभूतपूर्व पाऊस
 
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांत पालघर, रायगड, नाशिक आणि आता नागपूरमध्ये अल्पावधीत महिनाभराचा पाऊस पडत असल्याचे दिसत असून ही हवामान बदलाची गंभीर चिन्हे असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरांची जलनिस्सारण व्यवस्था ही मागील 20 ते 25 वर्षांतील सर्वाधिक पावसाच्या आकडेवारीच्या आधारे तयार केली जाते. मात्र काही तासांतच विक्रमी पाऊस झाल्यास कोणतीही यंत्रणा पूर्णपणे सक्षम ठरत नाही. त्यामुळे भविष्यातील पायाभूत सुविधांचे नियोजन नव्या हवामान वास्तवाचा विचार करून करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Devendra Fadnavis)
 
जात प्रमाणपत्राबाबत अडचण नाही
 
मनोज जरांगे पाटील यांनी 58 लाख नोंदींच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्र देण्याची मागणी करत पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे. प्रलंबित अर्जांची संख्या अत्यल्प असून अर्ज करूनही प्रमाणपत्र मिळत नाही, अशी परिस्थिती राज्यात नाही. महायुती सरकारने मराठा समाजासाठी आजवर सर्वाधिक निर्णय घेतले असून त्यांची प्रभावी अंमलबजावणीही केली आहे. तरीही कोणाची नाराजी असल्यास संवादातून मार्ग काढण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Devendra Fadnavis)
 
पीकविमा घटण्यामागे नव्या अटी नाहीत
 
यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दहा लाख शेतकऱ्यांनी कमी पीकविमा घेतल्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, त्यामागे नव्या अटी कारणीभूत नाहीत. एक रुपयात पीकविमा योजनेच्या काळात मोठ्या प्रमाणावर विमा काढण्यात आला होता. मात्र त्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. यामुळे योजनेत सुधारणा करण्यात आली असून आता पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरावा लागत आहे. त्यामुळे विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काहीशी घटल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Devendra Fadnavis)
 
 




संबंधित मजकूर