शिक्षक भरती पेपरफुटी प्रकरणात एमबीबीएस डॉक्टरला अटक; प्रति उमेदवार ५० हजारांचा सौदा; आतापर्यंत २९६ जणांविरोधात कारवाई

    29-Jul-2026   
Economic Offenses Wing
 
मुंबई : (Economic Offenses Wing) बिहार लोकसेवा आयोगाच्या शिक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एमबीबीएस डॉक्टर मनीष कुमार याला अटक केली आहे. आर्थिक गुन्हे पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली असून, या बहुचर्चित प्रकरणात आतापर्यंत एकूण २९६ जणांना अटक करण्यात आली आहे.
 
तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, डॉ. मनीष हा पेपरफुटी रॅकेटचा सक्रिय सदस्य होता. मुख्य आरोपी संजीव मुखिया याचा मुलगा डॉ. शिव याचा तो निकटवर्तीय असल्यामुळे तो या संपूर्ण टोळीशी जोडला गेला होता. शिक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी उमेदवारांपर्यंत पोहोचविण्याच्या कटात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासातून समोर आले.(Economic Offenses Wing)
 
आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, जहानाबाद जिल्ह्यातील परसबिघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहालपूर गावचा रहिवासी असलेला डॉ. मनीष कुमार याने २०२१ मध्ये पटणा येथील एनएमसीएच मधून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले होते. त्याने कैमूर जिल्ह्यात सरकारी डॉक्टर म्हणूनही सेवा बजावली होती. मात्र नंतर सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन तो पटण्यात नीट-पीजी परीक्षेची तयारी करत होता.(Economic Offenses Wing)
 
प्रति उमेदवार पन्नास हजारांचा व्यवहार; ३० उमेदवारांना हजारीबागमधील हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप
 
तपासात असे आढळून आले की, प्रत्येक उमेदवाराची सेटिंग करून देण्यासाठी डॉ. मनीष याला प्रति उमेदवार ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. १५ मार्च २०२४ रोजी झालेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या दोन ते तीन दिवस आधी त्याने सुमारे ३० उमेदवारांना पटण्यातून झारखंडमधील हजारीबाग येथील कोहिनूर हॉटेलमध्ये नेले होते. तेथे उमेदवारांना परीक्षेपूर्वीच लीक झालेली प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरे उपलब्ध करून देण्यात आली होती, जेणेकरून ती पाठ करून ते परीक्षेत यशस्वी होऊ शकतील.
 
उमेदवारांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर डॉ. मनीष पुन्हा पटण्याला परतला होता. तपास यंत्रणेच्या मते, याच नेटवर्कच्या माध्यमातून शिक्षक भरती परीक्षेचा प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध करून देण्याचा संपूर्ण कट रचण्यात आला होता. असा आरोप आहे की, या टोळीने उमेदवारांना शिक्षक भरतीत यश मिळवून देण्याच्या नावाखाली संघटित पद्धतीने पेपरफुटी केली. डॉ. मनीष आणि त्याच्या नेटवर्कने ३० उमेदवारांकडून सुमारे १.२० कोटी रुपये वसूल केल्याचाही आरोप आहे.(Economic Offenses Wing)
 
सीसीटीव्ही आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे अटक
 
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, इतर भौतिक पुरावे तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित माहितीची पडताळणी करताना आर्थिक गुन्हे शाखा त्यांच्यापर्यंत पोहोचली. चौकशी आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे अखेर त्याला अटक करण्यात आली. अशी माहिती आहे की, डॉ. मनीष हा त्याचे सहकारी डॉ. शिव आणि डॉ. शुभम यांच्यासोबत मिळून पेपरफुटी रॅकेट चालवत होता. सीलबंद प्रश्नपत्रिकेचे बॉक्स कोणतीही हानी न पोहोचवता उघडणे आणि पुन्हा पूर्ववत सीलबंद करणे, यात तो निष्णात असल्याचेही तपासात समोर आले आहे.(Economic Offenses Wing)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर