योगायोगाने सुरू झालेल्या प्रवासाला सिद्ध करत, नादब्रह्माच्या साधनेने १८ वाद्ये वाजवण्यात कलासिद्ध होणार्या राहुल पेणकर याच्याविषयी...
आयुष्याचा नकाशा आपण काढतो; पण त्यावरच्या वाटा बहुधा नियतीच आखते. आपण एका दिशेने चालायला निघतो आणि अचानक एखादे वळण समोर येते. त्या वळणावर उभे राहून, त्याक्षणी आपल्याला त्याचे महत्त्व कळत नाही. ते फक्त आणखी एक वळणच वाटते. पण, काही वर्षांनी मागे वळून पाहिले की, लक्षात येते; खरेतर आयुष्याची सरळ रेषा तिथूनच सुरू झाली होती. अशा योगायोगांची गंमतच वेगळी! ते दार ठोठावत येत नाहीत. ते नकळत येतात, आपल्या खांद्यावर हात ठेवतात आणि आपण त्यांच्यासोबत चालू लागतो. पुढे त्या वाटेवर किती कष्ट आहेत, किती अपयश आहे, किती आनंद आहे किंवा किती यश दडलेले आहे, याची कल्पनाच त्यावेळी नसते. पण, एक गोष्ट मात्र खरी की, अशा प्रवासांची कथा नेहमीच सांगण्यासारखी असते. कारण, ती कथा माणूस घडण्याची असते. अशीच एक यशोगाथा आहे, ठाण्याच्या राहुल पेणकरची!
राहुलचा जन्म आणि बालपण ठाण्यातच. राबोडीच्या सरस्वती हायस्कूलमध्ये शिकणारा हा मुलगा चौथीपर्यंत इतर मुलांसारखाच होता. खेळ, मित्र, अभ्यास... एवढेच त्याचे जग. संगीताची ओढ होती खरी; पण ती आयुष्य बनेल, असा विचार ना त्याने केला होता, ना घरच्यांनी. चौथीत शाळेतील ‘कौन्सिल’ पदांसाठी मुलाखती सुरू होत्या. ‘तुला काय आवडतं?’ या साध्या प्रश्नावर राहुलने सहज उत्तर दिले, ‘संगीत.’ त्या उत्तरात अभ्यासपूर्वक काहीच नव्हते; फक्त एका निरागस मुलाचे ते प्रामाणिक उत्तर होते. पण, कधीकधी नियतीला एवढाच धागा पुरतो.
शाळेतील शिक्षकांनी त्याची आवड ओळखली आणि शाळेतील ‘ड्रम’ वर्गात जाण्याचा सल्ला दिला. तिथे त्याची भेट झाली सचिन पाठक सरांशी, त्याच्या संगीतप्रवासातील पहिल्या गुरूंशी. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात पहिला गुरू हा स्वराइतकाच महत्त्वाचा असतो. कारण, तो वाद्यच शिकवत नाही; तो आत्मविश्वासही देतो. राहुलच्या बाबतीतही तेच घडले. ड्रमच्या तालातूनच त्याला आयुष्याचा सूर सापडू लागला. सहावीपर्यंत राहुलने आश्चर्यकारक प्रगती केली होती. विशेष म्हणजे, तबल्यासारख्या शास्त्रीय तालवाद्याचा पाया नसतानाही, त्याची तालावरची पकड शिक्षकांच्या नजरेत भरली. प्रत्येक खेळाडू किंवा कलाकाराकडे निसर्गाने दिलेली एखादी देणगी असते. राहुलकडे ती होती, ऐकलेला ताल कानातून हातात उतरवण्याची. ही कला शिकवता येत नाही; ती लाभते.
गुरूंनी त्याला तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. पण, त्याच वेळी जगावर ‘कोविड’चे सावट आले. ‘लॉकडाऊन’ने अनेक स्वप्नांना विराम दिला; राहुलच्या सरावावर त्याचा परिणाम झाला नाही. उलट, त्याकाळात आजोबांनी दिलेला तबला आणि ढोलकीवर तो गाण्यांचा सराव करत राहिला. अनेक कलाकार रंगमंचावर घडतात; राहुल मात्र घरात, स्वतःचाच श्रोता आणि परीक्षक होऊन तालसाधना करत होता. ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर त्याने अथर्व कुलकर्णी यांच्याकडे तबल्याचे नियमित शिक्षण सुरू केले. आजही तो त्यांच्याकडे शिकतो. त्यानंतर प्रसिद्ध ढोलकीवादक तुषार जामसांडेकर यांच्याकडेही ढोलकीचे धडे घेत, त्याने आपल्या कलेचा आणखी विस्तार केला. राहुलला एका वाद्यावर समाधान मानायचे नव्हते. प्रत्येक वाद्य म्हणजे, त्याच्यासाठी एका नव्या भाषेची ओळख होती.
दरम्यान, दहावी-बारावी पूर्ण झाली. ‘झी मराठी’ आणि ‘कलर्स मराठी’वरील कार्यक्रमांत साथसंगत करण्याची संधीही त्याला मिळाली. रंगमंचावरील अनुभवाने त्याच्या वादनात परिपक्वता आणली. पण, राहुलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याने कला आणि विज्ञान यांना कधी परस्परविरोधी मानले नाही. म्हणूनच, बारावीनंतर त्याने ठाण्याच्या व्ही. पी. एम. महाविद्यालयात ‘इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी’ची वाट निवडली. दिवसा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आणि संध्याकाळी तालांचा साधक, अशी त्याची दुहेरी ओळख! महाविद्यालयात त्याची ओळख झाली ‘यूथ फेस्टिव्हल’शी. लोकवाद्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक वाद्यांवर प्रभुत्व आवश्यक होते. हा राहुलसाठी नवा प्रदेश होता. मयूर मगरे आणि तुषार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्वतःला येथे नव्याने घडवले. मेहनतीला पर्याय नसतोच, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. याच मेहनतीच्या जोरावर ‘यूथ फेस्टिव्हल’मध्ये त्याने ‘सुवर्णपदक’ पटकावले. केवळ स्पर्धक म्हणून नव्हे, तर विविध ‘स्किट्स’ना संगीतसाथ देणारा संवेदनशील कलाकार म्हणूनही त्याने स्वतःची वेगळीच ओळखही निर्माण केली.
आज राहुल १८ प्रकारची वाद्ये वाजवतो. आजही त्याच्याशी बोलल्यावर अजून किती शिकायचे आहे, अशी उत्सुकता जाणवते. त्याने स्वतःची दोन गाणीही प्रकाशित केली आहेत. इतकेच नव्हे, तर ‘पॉवरलिफ्टिंग’मध्येही राष्ट्रीय ‘सुवर्णपदक’ जिंकून, त्याने शरीर आणि मन या दोन्हींच्या ताकदीचा प्रत्यय दिला आहे. राहुलची कथा ही ‘मला संगीत आवडतं’ या वाक्यापासून सुरू झालेल्या प्रवासाची कथा आहे. शिक्षकांनी योग्य वेळी ओळखलेली क्षमता, गुरूंनी घडवलेला पाया, कुटुंबाने दिलेला आधार आणि स्वतःच्या मेहनतीवर ठेवलेला अढळ विश्वास, या चौघांनी हा कलाकार घडवला. यंदाही राहुल ‘राष्ट्रीय यूथ फेस्टिव्हल’मध्ये ‘सुवर्णपदका’साठी सज्ज होत आहे. पदकांचा विषय काळावर सोडला, तरीही त्याचे संगीताशी जुळलेले नाते पदकापेक्षा अधिक मौल्यवान! कारण, काही प्रवास फक्त साधनेनेच दिव्य होतात. राहुल पेणकरचा प्रवास हा त्यापैकीच एक! त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!