म्यानमारचा मृत्यूलोक...

    29-Jul-2026   
 
 
Myanmar Civil War
 
आशियातील एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळख असलेले म्यानमार गेल्या अनेक वर्षांपासून हिंसाचार, अस्थिरता आणि भीषण गृहयुद्धात होरपळत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये म्यानमारच्या लष्कराने ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेत्या आंग सान सू की यांच्या लोकनियुक्त सरकारची सत्ता उलथवून टाकली. या सत्तापालटानंतर म्यानमारमध्ये लोकशाहीचे पुनरुज्जीवन होण्याऐवजी संपूर्ण देश तीव्र नागरी संघर्षात ढकलला गेला.
 
म्यानमारला १९४८ मध्ये ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले. मात्र, स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच म्हणजे, १९६२ मध्ये जनरल ने विन यांनी लष्करी बंड करून सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून म्यानमारवर बहुतांश काळ लष्कराचीच पकड राहिली. १९८८ मध्ये लष्करी राजवटीविरोधात मोठा नागरी उद्रेक झाला. याच काळात आंग सान सू की यांनी लोकशाही चळवळीचे नेतृत्व केले. प्रदीर्घ संघर्षानंतर २०१५ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि आंग सान सू की यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ (एनएलडी) पक्षाने दणदणीत विजय मिळवून लोकशाही सरकार स्थापन केले. मात्र, या काळातही सैन्याने संविधानाद्वारे देशाच्या राजकारणात आणि महत्त्वाच्या मंत्रालयांवर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. नोव्हेंबर २०२०च्या निवडणुकीत ‘एनएलडी’ पक्षाने पुन्हा मोठा विजय मिळवला. परंतु, लष्कराने निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत दि. १ फेब्रुवारी २०२१ रोजी सत्तापालट केला आणि आंग सान सू की यांच्यासह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केले.
 
या बंडानंतर म्यानमारमधील तरुण आणि नागरिक रस्त्यावर उतरले. लष्कराने शांततापूर्ण आंदोलने हिंसकपणे चिरडल्यानंतर या आंदोलनाचे रूपांतर सशस्त्र संघर्षात झाले. अनेक नागरी संरक्षण दले आणि प्रादेशिक वांशिक बंडखोर गट एकत्र येऊन लष्कराशी लढा देऊ लागले. या संघर्षात आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिक बेघर आणि विस्थापित झाल्याची माहिती आहे.
 
म्यानमारच्या संघर्षाला २०२६च्या सुरुवातीला एक नवे वळण मिळाले. तत्कालीन लष्करप्रमुख मिन आंग ह्लाइंग यांनी राष्ट्रपतीपद स्वीकारण्याची तयारी सुरू केल्यानंतर, त्यांनी आपले विश्वासू सहकारी आणि माजी गुप्तचर अधिकारी ये विन ऊ यांची नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. जागतिक स्तरावर संघर्षाचे आणि हिंसाचाराचे निरीक्षण करणार्‍या ‘आर्म्ड कॉन्फ्लिट लोकेशन अ‍ॅण्ड इव्हेंट डेटा’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या नेतृत्वबदलानंतर म्यानमार लष्कराच्या कारवायांमध्ये अधिक क्रूरता दिसून येत आहे.
 
लष्कराने आपल्या कमांड संरचनेत महत्त्वाचे बदल केले. एकाच लक्ष्यावर दोन ते पाच लढाऊ विमानांच्या तुकड्यांद्वारे सलग हवाई हल्ले केले जात आहेत. २०२६च्या पहिल्या सहामाहीत किमान डझनभर सामूहिक हत्याकांडांची नोंद झाली असून, त्यामध्ये ४५०हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. यांपैकी सुमारे ४० टक्के मृत्यू म्यानमारच्या मध्यवर्ती अन्यार प्रदेशात झाले आहेत. लष्कराच्या कारवायांमध्ये केवळ हवाई बॉम्बहल्लेच नव्हे, तर गावांवर थेट धाडी टाकणे, नागरिकांना मारहाण करणे, मालमत्ता लुटणे आणि थेट हत्या करणे या गोष्टींचा समावेश आहे. नव्या लष्करप्रमुखांच्या नेतृत्वाखाली लष्कराने सीमावर्ती भागात नव्याने आक्रमणे तीव्र केली आहेत. या भागातील दुर्मीळ खनिजसाठे आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गांवर ताबा मिळवणे, हे लष्कराचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
देशांतर्गत परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना, म्यानमारचे लष्करी नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सरकारला वैधता मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. राष्ट्रपती मिन आंग ह्लाइंग यांनी भारत आणि चीन यांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या शेजारी देशांना भेटी दिल्या आहेत. आता म्यानमार लष्कर ‘आसियान’सोबत पुन्हा संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
२०२६ मध्ये म्यानमारच्या लष्करी नेतृत्वात बदल झाला असला आणि कारवायांच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी सामान्य नागरिकांवरील दडपशाहीत किंवा अत्याचारांत कोणतीही घट झालेली नाही. उलट, दडपशाही अधिक संघटित, व्यापक आणि प्राणघातक स्वरूपात सुरू आहे. पण, शेवटी या राजकीय व लष्करी संघर्षात म्यानमारचा सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये पुन्हा लोकशाहीची पहाट उजाडेल, तो सुदिन!




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर