अखण्ड-मण्डलाकारम्, व्याप्तम् येन चराचरम्| तत्पदम् दर्शितम् येन, तस्मै श्री गुरवे नमः॥
महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस अर्थात ‘आषाढ पौर्णिमा’ होय आणि हाच दिवस ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘व्यास पौर्णिमा’ म्हणून भारतवर्षात साजरा केला जातो. असा हा गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वीरशैव लिंगायत समाजातही गुरुपरंपरेला महत्त्वाचे स्थान. तेव्हा, आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने वीरशैव परंपरेतील गुरुपरंपरा, महात्मा बसवेश्वरांचे विचार यांचे चिंतन करणारा लेख...
भारतीय संस्कृतीत श्रीगुरूला सर्वांत श्रेष्ठ स्थान दिले आहे. गुरूशिवाय कोणालाही ज्ञान सहजी मिळत नाही. ‘साक्षात भर्गो नराकृति:’ या वचनानुसार भारतात तर गुरूला परमेश्वराचाच अवतार मानले जाते. परमेश्वर सर्वांचा गुरू आहे, तरीही गुरूला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. संतशिरोमणी श्रीमन्मथस्वामींनी ‘परमरहस्य’ या ग्रंथात म्हटले आहे -
शिव परब्रह्म होय सही| परि भेटि बोलणे न घडे कही| हा भेटे बोले समाधान करी सर्वही|
यालागी गुरू अधिक॥
म्हणोनि गुरुपरते दैवत| नाही नाही वो निभ्रांत| यालागी पूजन भजन येकान्त| त्यासीच किजे॥
गुरु माता गुरु पिता| स्वहित कर्ता गुरुचि दाता| ज्यापरते दैवत नाही तत्त्वतां|
तया गुरुसी नमो नमो ॥
गुरु तोचि महादेव| गुरु तोचि सदाशिव|
गुरुपरता नाही देव| म्हणोनि गुरुसी भजिजे॥
प्रथम गुरू शिव
‘स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात्’- योगसूत्र या सूत्रात महर्षी पतंजलींनी शिवाला जगाचा आद्यगुरू मानले आहे. भगवान शिव हाच परब्रह्म आहे. शिव हे विश्वातील पहिले गुरू परब्रह्म. परब्रह्म म्हणजे सर्वश्रेष्ठ असे तत्त्व. परंतु, परब्रह्म शिव आपल्याला कधी भेटत नाही, आपल्याशी कधी बोलत नाही. पण, गुरू मात्र आपल्याला भेटतो, आपल्याशी बोलतो, आपल्या मनातील शंकांचे समाधान करतो. म्हणून, गुरू शिवापेक्षाही श्रेष्ठ आहे. गुरू शिष्याला परमेश्वराचे दर्शन घडवितात, त्याला आत्मज्ञान देतात, म्हणून गुरूला श्रेष्ठ स्थान दिले जाते. गुरुकृपेवाचून मोक्षरूपी पुरुषार्थ दुष्प्राप्य आहे. यासाठी ‘मुण्डकोपनिषदा’त ‘तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्’- अर्थात, आत्मरूप जाणण्यासाठी सकल शास्त्रपारंगत व आत्मज्ञानी अशा श्रीगुरूला शरण जावे, असे म्हटले आहे.
‘गुरू’ शब्दाचा अर्थ
‘गुणान् रुन्ध इति गुरूः’- अर्थातच, ‘शिष्याच्या अंगी असलेल्या रज व तम या गुणांना रोधून, त्याला शिवतत्त्वाचा उपदेश करतो तो गुरू होय,’ अशी ‘गुरू’ या शब्दाची एक व्याख्या नीलकंठ शिवाचार्यांनी ‘क्रियासार’ ग्रंथात केली आहे.
दुसरी व्याख्या अशी : ‘गु’ म्हणजे गुणातीत व ‘रू’ म्हणजे रूपातीत. गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे असलेला आणि रूपातीत म्हणजे रूपाच्या पलीकडे असलेला. सत्त्व, रज व तम हे तीन ‘गुण’ आहेत व अशुद्ध माया हे ‘रूप’ आहे. गुणांपलीकडे असलेल्या व रूपापलीकडे असलेल्या निर्गुण व निराकार शिवाचे जो ज्ञान देतो, तो गुरू होय, असे शिवयोगी शिवाचार्यांनी ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’मध्ये स्पष्ट केले आहे.
गुरूला ‘आचार्य’ असेही म्हणतात. स्वतः आचरण करणारा व शिष्याकडून आचरण करवून घेणारा असा एक, तो ‘आचार्य’ होय. आचार्य हा शिवासमानच मानला जातो. ‘गुणाः पूजास्थानं गुणिषु नच लिंगं नच वयः’ या सुभाषितानुसार, मनुष्याच्या पूज्यतेसाठी त्याचे वय व लिंग महत्त्वाचे नसून, त्याचे गुण महत्त्वाचे ठरतात. मनुष्य वयामुळे अथवा लिंगामुळे (पुरुष अथवा स्त्री) पूज्य ठरत नाही, तर गुणांमुळे पूज्य ठरतो. गुणांमुळे ज्यांना पूज्यता लाभते, ते गुरू असतात.
वीरशैव तत्त्वज्ञान आणि गुरू
वीरशैव सिद्धांतात ‘अष्टावरण’, ‘षट्स्थल’, ‘पंचाचार’ या तत्त्वांना खूप महत्त्व आहे. यामध्ये ‘अष्टावरण’ (अष्ट+आवरण) म्हणजे शिवभक्तांचे सर्व वाईट वृत्तींपासून अष्टावरणे रक्षण करतात म्हणून अष्टावरणांना ‘रक्षाकवच’ असेही म्हणतात. आवरणांची संख्या आठ आहे- गुरू, लिंग, जंगम, पादोदक, प्रसाद, भस्म, रुद्राक्ष व मंत्र ही आहेत. गुरू, लिंग आणि जंगम ही पूजनीय आहेत. विभूती, रुद्राक्ष आणि मंत्र ही पूजेची साधने आहेत आणि पादोदक आणि प्रसाद ही दोन त्या पूजेची फळे आहेत. गुरूंकडून ‘इष्टलिंगदीक्षा’ प्राप्त झालेल्या भक्ताचे काम, क्रोध आदी सहा विकारांपासून या आवरणांमुळे संरक्षण होते व त्याचा मोक्षप्राप्तीचा मार्ग सोपा होतो. गुरू प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे. कारण, शिव ‘मायाशक्तिविशिष्ट’ असल्यामुळे सामान्यांना दृष्टिगोचर होत नाही. शिवच गुरू रूपाने सर्वांना गोचर होतो व उपदेश करतो. म्हणून, गुरूची पूजा केल्याने प्रत्यक्ष शिवाची पूजा केल्याचे फळ मिळते, असा भाव ‘श्रीसिद्धान्तशिखामणी’मध्ये उल्लेखला आहे.
गुरूंची लक्षणे गुरुश्च गुणवान् प्राज्ञः परमानंदभासकः|
गुरूंची अनेक लक्षणे अनेक ग्रंथांत सांगितलेली आढळतात. सामान्यपणे ही लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील- गुरूचे हृदय करुणेने भरलेले असावे. त्यांचे मन अनासक्त असावे. त्यांना संप्रदायाचे पूर्ण ज्ञान असावे. दीक्षा देण्यात ते प्रवीण असावेत. त्यांची शिवाच्या ठिकाणी दृढ निष्ठा असावी. गुरू हे गुरुवंशात जन्मलेले म्हणजे ‘माहेश्वर’ असावेत. गुरू श्रोत्रिय (पूर्ण ज्ञानी) व ब्रह्मनिष्ठ (ब्रह्मसाक्षात्कारी) असावेत. याशिवाय, ते भस्मधारण, लिंगधारण करणारे, आचरणशील असावेत. गुरू सत्कुलोत्पन्न म्हणजे उत्तम कुळात जन्म घेतलेले असावेत. पंचम अर्थात् भक्तकुळातील सद्गुणसंपन्न व्यक्तीला ‘जंगमदीक्षा’ देऊन गुरुगादीवर बसविण्याचीही परंपरा वीरशैवांत आहे.
एका कुळाचा गुरू एकच असावा, अशी वीरशैवांत परंपरा. एकाच गुरूकडून घरातील सर्व सदस्य ‘इष्टलिंगदीक्षा’ व मंत्रोपदेश घेतात. जर एकाच घरातील व्यक्तींनी वेगवेगळे गुरू करून घेतले, तर ते वीरशैवांच्या सदाचाराला बाधक ठरते. पंचपीठांपैकी एका शाखेचा तो मठाधिकारी असतो. कुटुंबात मूल जन्मल्यापासून त्याचे सर्व धार्मिक संस्कार गुरूकडून करविले जातात. या संस्कारांपैकी ‘इष्टलिंगदीक्षा’ हा सर्वांत महत्त्वाचा संस्कार. मुलगा अथवा मुलगी आठ वर्षांची झाल्यावर आपल्या गुरूकडून समारंभाने ‘इष्टलिंगदीक्षा’ मुलांना दिली जाते. याप्रसंगी गुरूने दिलेल्या मंत्रोपदेशानुसार वीरशैव संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वीरशैवाने वागावे लागते. शिष्याच्या घरी होणार्या सर्व मंगलकार्यात व धार्मिक विधीत गुरूकडून मार्गदर्शन लाभते.
गुरू एकच असतो; परंतु त्याच्या कार्यामुळे/ क्रियाभेदामुळे त्याला ‘दीक्षागुरू’, ‘शिक्षागुरू’ व ‘ज्ञानगुरू’ अशी तीन नावे दिली जातात.
दीक्षागुरू : गुरू शिष्याला ‘इष्टलिंगदीक्षा’ देतो, म्हणून त्याला ‘दीक्षागुरू’ असे म्हणतात. वीरशैवांत सर्वांनी दीक्षा घेणे आवश्यक मानले जाते. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही दीक्षा घेण्याचा अधिकार आहे. वयाच्या आठव्या वर्षी घेतलेली दीक्षा उत्तम, सोळाव्या वर्षापर्यंत घेतलेली दीक्षा मध्यम आणि त्यानंतर घेतलेली दीक्षा अधम मानली जाते. दीक्षा घेतल्याशिवाय कोणीही मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही, असे वीरशैव तत्त्वज्ञान मानते. दीक्षा हा अनिवार्य व आवश्यक संस्कार आहे. दीक्षा घेतलेला जीव जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो.
दी - शिवज्ञान देणारी, क्षा - पाशबंधनाचा नाश करणारी ती ‘दीक्षा’, जी शिवज्ञान देऊन ‘मलत्रया’चे पाश नष्ट करते. जीवात्म्याच्या ठिकाणी आणव, मायीय व कार्मिक असे तीन मल/मलत्रय असतात. (आत्म्याच्या इच्छाशक्तीचा संकोच होणे, हा ‘आणव मल’ होय. त्याच्या ज्ञानशक्तीचा संकोच म्हणजे ‘मायीय मल’ आणि क्रियाशक्तीचा संकोच म्हणजे ‘कार्मिक मल’ होय.) दीक्षासंस्कार करणार्या कुलगुरूला ‘दीक्षागुरू’ अशी संज्ञा आहे.
शिक्षागुरू : श्रीगुरू दीक्षेनंतर लिंगपूजेचे नियम आणि इष्टलिंगाला स्वतःच्या प्राणाप्रमाणे समजून शरीरावर निरंतर धारण करण्याचे शिक्षण देतात. त्याबरोबर मंत्रजप कसा करावा व प्राणलिंगाचे चिंतन कसे करावे, हे शिकवितात. म्हणून, त्यांना ‘शिक्षागुरू’ असे म्हटले जाते.
ज्ञानगुरू : ‘आगम’ ग्रंथांत प्रतिपादन केलेले ‘शिवाद्वैत’ आपल्या अनुभवाचा आधार देऊन श्रीगुरू शिष्याला समजावून सांगतात. त्याच्या मनातील सर्व संशय दूर करतात. ‘शिवाद्वैत’ ज्ञानाचा उपदेश केल्यामुळे त्यांना ‘ज्ञानगुरू’ अशी संज्ञा दिलेली आहे.
अशाप्रकारे एकच गुरू दीक्षा देतो, शिक्षण देतो व ज्ञान देतो. त्यामुळे शिष्य ‘मलत्रया’पासून मुक्त होतो. गुरू शिष्याला सन्मार्गाकडे वळवून काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर अशा सहा विकारांपासून त्याचे रक्षण करतात. म्हणून ‘गुरू’ हे शिष्याचे रक्षण करणारे अष्टावरणातील पहिले महत्त्वाचे आवरण होय.
गुरूंचा महिमा गाणारी काही
कन्नड वचने व मराठी अभंग
तनु शुद्धवायितु गुरुविनिंदे
मन शुद्धवायितु लिंगदिंदे
धन शुद्धवायितु जंगमदिंदे
प्राण शुद्धवायितु प्रसाददिंदे
इंती चतुर्विधदिंदेन सर्वांग शुद्धवायितु
कूडलचन्नसंगमदेवा॥
महात्मा बसवेश्वर यांचे भाचे चन्नबसवेश्वर यांचे हे प्रसिद्ध कन्नड वचन आहे. चन्नबसवेश्वरांचे आराध्यदैवत कूडलचन्नसंगमदेवाचा उल्लेख करताना म्हणतात- गुरूमुळे शरीर शुद्ध झाले. लिंगामुळे मन शुद्ध झाले. ज्ञानी पुरुषांमुळे संपत्ती शुद्ध झाली. देवाच्या कृपेमुळे (आशीर्वादामुळे) प्राण शुद्ध झाला. हे कूडलचन्नसंगमदेवा, या चार प्रकाराच्या दिव्य तत्त्वांमुळे, शुद्धीमुळे माझे संपूर्ण शरीर शुद्ध झाले.
गुरु आणि लिंग जंगमाची सेवा|
देई मज देवा जन्मोजन्मीं॥१॥
रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळी|
हेंचि चंद्रमौळी देई मज॥२॥
तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर|
ध्याऊं उमावर जन्मोजन्मीं॥३॥
मन्मथशिवलिंग म्हणे आचरण|
हेंचि अष्टावरण वीरशैवां॥४॥
देवा! गुरू, लिंग आणि जंगम यांची सेवा मला जन्मोजन्मी घडू दे. मी अंगावर रुद्राक्षांच्या माळा धारण कराव्यात आणि कपाळावर भस्म लावावे, हेची वरदान मला दे. तीर्थ व प्रसाद यांचे सेवन करावे आणि षडाक्षरी मंत्राचा जप घडावा. जन्म-जन्मांतरात उमेच्या पतीचे, शंकराचे ध्यान मी करणार आहे. मन्मथस्वामी म्हणतात, ‘गुरू, लिंग, जंगम, रुद्राक्ष, भस्म, तीर्थ, प्रसाद व मंत्र या आठ आवरणांचे पालन करणे, हेच वीरशैवांसाठी धर्माचे आचरण होय.’
गुरु ध्याई गुरु ध्याई| गुरुपरतें सार नाही॥१॥
गुरुसेवेचा संकल्प| तेंची माझें पूर्ण तप॥२॥ गुरुचरणीची रजधुळी| तेंची तीर्थाची आंघोळी॥३|
केले सद्गुरूचें भजन| तेंची माझे अनुष्ठान॥४॥ लिंगेश्वर सांगे वर्म| गुरु तोचि परब्रह्म॥५॥
या अभंगात श्रीगुरूची थोरवी गायलेली आहे. गुरुभक्ती करणे हीच ईश्वरभक्ती होय, असे येथे सूचित केलेले आहे. श्रीगुरूच्या संदर्भात केलेली लहान कृतीदेखील तपश्चर्या, तीर्थस्नान, अनुष्ठान अशा मोठ्या कृत्यांसारखी असते, असे लिंगेश्वरांनी प्रतिपादन केले आहे. लिंगेश्वर म्हणतात, ‘गुरू हा प्रत्यक्ष परब्रह्म आहे, हे रहस्य मी तुम्हाला सांगत आहे.’
महात्मा बसवेश्वर म्हणतात -
शिवपथव नरिवडे गुरु पथवे मोदलू
म्हणजेच, शिवस्वरूप जाणून घ्यायचे असेल; तर आधी श्रीगुरूंना शरण जावे लागेल.
श्री जगद्गुरू रेणुकाचार्य यांनी श्री अगस्त्य महर्षींना गुरूंबद्दल सांगितले होते -
गुणातीतं गुकारं च रूपातीतं रुकारकम्| गुणातीतमरूपं च यो दद्यात् स गुरुः स्मृतः॥ (श्रीसिद्धान्तशिखामणी)
शिष्य मुमुक्षु बनतो तेव्हा त्याला ‘कोऽहम्’ म्हणजेच, ‘मी कोण आहे?’ हा प्रश्न पडतो. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुरू मार्गदर्शन करतात आणि ‘तत्त्वमसी’- ‘तो तूच आहेस’ अशी ओळख करून देतात. शिष्याला आत्मज्ञान करवून देणारे गुरूच! भवारण्यात भटकणार्या आपल्या शिष्याला दीक्षा देऊन काम-क्रोधादी वृत्तींपासून रक्षण गुरू करतात. गुरू आपल्या सगळ्या शक्तिनिशी आपल्या शिष्यासाठी एक बळकट रक्षाकवच तयार करतात, म्हणून गुरुकृपेवाचून मोक्षरूपी पुरुषार्थ दुष्प्राप्य आहे. गुरूच्या सान्निध्यात येऊन शिष्य त्याच्या जीवनातील आध्यात्मिक प्रवासात जसजसे ज्ञान प्राप्त करत जातो; तसतशी त्याच्या मनाची, बुद्धीची शुद्धी होते. त्याच्या सर्व क्रिया परिपक्व होत जातात.
मराठी संतकवी श्रीमन्मथस्वामी यांनी गुरूचे माहात्म्य ‘परमरहस्य’ या ग्रंथात मोठ्या बहारदार शब्दांत वर्णिले आहे-
जेणे कैवल्याचे कैवल्य केले|
रंकासि राजेपण दिधले|
जीवासी शिवपदी बैसविले| जया गुरुनाथे॥
शेखी शिवत्वही नेले| निर्गुणत्व जेणे दिल्हे|
गुण नास्ति म्हणोनि निर्गुणत्वही वाळिले|
अनुपम्य केले गुरुराये॥
तस्मै श्री गुरुवे नमः
शिल्पा स्वामी-निंबाळकर
(लेखिका वीरशैव-लिंगायत संप्रदायाच्या अभ्यासक आहेत.)