मुंबई : (Laxmanrao Joshi) ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे मंगळवार, दि. २८ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. दुपारी २ वाजता देवनगर येथील सत्यम हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्रकारितेतील त्यांची प्रदीर्घ कारकीर्द पाहता त्यांनी सुरुवातीला 'तरुण भारत' या दैनिकात पत्रकार म्हणून कार्य केले. त्यानंतर काही काळ गोव्यात पत्रकारिता केली. तिथून परतल्यावर ते 'तरुण भारत' मध्ये कार्यरत राहिले.
पुढे त्यांनी 'लोकशाही वार्ता' या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या लेखणीने अनेक सामाजिक विषयांना प्रभावीपणे वाचा तर फोडलीच परंतु नवोदित पत्रकारांना वारंवार मोलाचे मार्गदर्शनही मिळत गेले. बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून (सहकार नगर, १७९, कुकुराज अपार्टमेंट) येथून अंत्ययात्रा निघणार असून सहकार नगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. (Laxmanrao Joshi)
नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अभ्यासू वृत्ती आणि सामाजिक भान यांचा संगम असलेली त्यांची पत्रकारिता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजमन घडविण्याचे कार्य केले, तसेच असंख्य पत्रकारांना मार्गदर्शन करत त्यांनी मूल्याधिष्ठित पत्रकारितेची समृद्ध परंपरा जपली. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता क्षेत्राने एक ज्येष्ठ, अभ्यासू आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो. (Laxmanrao Joshi)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक