मुंबई : (Rashtra Sevika Samiti) राष्ट्र सेविका समितीची अखिल भारतीय कार्यकारिणी व प्रतिनिधी मंडळाची प्रथम अर्धवार्षिक बैठक हरियाणातील समालखा येथे संपन्न झाली. या बैठकीस वंदनीय प्रमुख संचालिका माननीय शांताक्का, प्रमुख कार्यवाहिका सीताक्का यांच्यासह देशभरातील ४० प्रांतांमधून ४८८ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत फेब्रुवारी २०२६ पासून आतापर्यंत विविध स्तरांवर झालेल्या समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. गेल्या सहा महिन्यांत कार्यरत जिल्ह्यांची तसेच शाखा आणि मिलन केंद्रांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. सध्या देशातील ८५२ जिल्ह्यांमध्ये ४,८८६ शाखा, १,१७३ मिलन केंद्रे आणि १,३३२ सेवा प्रकल्प कार्यरत आहेत.
राष्ट्र सेविका समितीच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवृद्धीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच सध्याची सामाजिक परिस्थिती, महिला आणि युवक-युवतींसमोरील विविध समस्या व त्यावरील संभाव्य उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अखेरच्या दिवशी देशातील लोकसंख्येतील असंतुलनाची कारणे आणि त्याचे परिणाम या विषयावर चर्चा झाली. या विषयाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत एक ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाद्वारे केंद्र व राज्य सरकारांनी सर्व समाजघटकांसाठी समान राष्ट्रीय लोकसंख्या धोरण राबवावे तसेच समान नागरी संहिता लागू करावी, अशी मागणी करण्यात आली. (Rashtra Sevika Samiti)
तीन दिवसीय बैठकीच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना वंदनीय प्रमुख संचालिका माननीय शांताक्का म्हणाल्या, "कुरुक्षेत्राची भूमी आपल्या अंतर्मनातील द्वंद्व दूर करून स्थिरचित्ताने समाजहितासाठी दृढ संकल्प करण्याचा संदेश देते. धर्मसंस्थापनेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र भूमीपासून प्रेरणा घेत आपण गुणवत्तापूर्ण कार्यविस्ताराचा दृढ संकल्प केला पाहिजे. त्याचबरोबर कार्यकर्ता म्हणून आपले व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम, सुसंस्कारित आणि कार्यक्षम बनविले पाहिजे. समितीची ९० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून शताब्दीच्या दिशेने वाटचाल करताना आपली प्रत्येक पावले ध्येयाकडे अधिक दृढतेने आणि सातत्याने पडली पाहिजेत." (Rashtra Sevika Samiti)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक