सामान्य कुटुंबात जन्मलेले कै. मधुकरराव (भाऊ) बडवे ही व्यक्ती संघाच्या संस्कारांनी इतकी समृद्ध झाली की, स्वतःचे आयुष्य, वेळ, श्रम, बुद्धी आणि हृदय सर्व काही त्यांनी राष्ट्रकार्याला अर्पण केले. त्यांच्या सहवासात आलेली प्रत्येक व्यक्ती हीच त्यांची आपली माणसे होती. म्हणूनच ते केवळ एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते, तर संघपरिवारातील असंख्य स्वयंसेवकांचे खरे अर्थाने 'भाऊ' होते. त्यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे संघसंस्कार, त्याग, आत्मीयता आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणादायी गाथाच होय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा इतिहास लिहिताना प्रकाशझोतात न आलेल्या, पण आपल्या निःस्वार्थ कार्याने संघाच्या पायाभरणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या अनेक स्वयंसेवकांची नावे आदराने घ्यावी लागतात. कै. मधुकरराव (भाऊ) बडवे हे असेच एक ज्येष्ठ स्वयंसेवक. दि. २३ जुलै १९२३ रोजी मालेगाव येथे त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण मालेगावात झाले, तर पुढील दोन वर्षे त्यांनी अमळनेर येथे माध्यमिक शिक्षण घेतले. अमळनेरमध्ये असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. भाऊ बडवे हे साने गुरुजींचे आवडते विद्यार्थी मानले जात. त्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. याच काळात त्यांची रामभाऊ गोडबोले यांच्याशी अतूट मैत्री झाली. वडिलांनी स्वतःच्या शिक्षणासाठी दिलेले पैसेही त्यांनी मित्राच्या शिक्षणासाठी खर्च केले. या मैत्रीतूनच त्यांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. रामभाऊ गोडबोले यांनी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत नेले आणि संघकार्याशी त्यांची आयुष्यभराची नाळ जुळली.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी मुंबईतील व्ही.जे.टी.आय.मध्ये टेक्स्टाईल विषयाचे शिक्षण घेतले. वसतिगृहात राहत असताना त्यांनी माटुंगा येथे संघाची शाखा सुरू केली. त्या काळात त्यांना वसंत कुंटे, विनायक गोखले, दामले यांसारखे कार्यकर्ते लाभले. त्यांच्या निवासस्थानी प्रल्हादजी अभ्यंकर, माधवराव परळकर यांसारखे वरिष्ठ कार्यकर्ते तसेच अनेक प्रचारक व स्वयंसेवक सातत्याने येत असत. त्यामुळे त्यांची संघदृष्टी अधिक व्यापक होत गेली. घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी प्रचारक जीवन स्वीकारले होते. १९४६ ते १९५१ या काळात त्यांनी सोलापूर विभागातील पंढरपूर जिल्ह्यात प्रचारक म्हणून कार्य केले. त्या काळात रामभाऊ म्हाळगी, केशवराव केळकर, सोहनी, यशवंतराव इनामदार, राजा वाकणकर, अविनाश माळी यांसारख्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संघकार्याचा विस्तार केला. प्रचारक जीवन अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. अनेकदा केवळ चणे खाऊन दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आली, पण संघकार्यावरील श्रद्धा आणि ध्येयनिष्ठा यांत कधीही तडा गेला नाही.
१९४८ मध्ये संघावर बंदी आल्यावर त्यांनी अत्यंत धाडसाने भूमिगत कार्यात सहभाग घेतला. बडवे यांच्या घराच्या तळघरात स्वयंसेवकांच्या गुप्त बैठका होत असत. सत्याग्रहाची आखणी, स्वयंसेवकांना सत्याग्रहासाठी पाठविणे, पत्रके छापणे, ती चित्रपटगृहांमध्ये वाटणे किंवा उडवणे, सत्याग्रहींच्या कुटुंबीयांना भेटी देणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडल्या. त्या काळातील त्यांचे योगदान संघकार्याच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग ठरते. भाऊ बडवे हे संघाचे तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक होते. तृतीय वर्षाच्या शिक्षणवर्गात त्यांच्यासोबत पुढे भारताचे पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयीही सहभागी होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून संघकार्य अखंड सुरू ठेवले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावून ठेवले.
मुंबईतील गोरेगाव परिसरात संघाने सुरू केलेल्या सन्मित्र शाळेत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य इंग्रजीचे मार्गदर्शन केले. शिक्षण ही समाजसेवेची प्रभावी साधना आहे, या भावनेतून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. त्याचबरोबर संघाच्या विविध संस्थांसाठी निधी संकलनात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि या व्यापक जनसंपर्काचा उपयोग त्यांनी समाजकार्यासाठी केला. संघ शिक्षावर्गांच्या व्यवस्थेची जबाबदारी ते नियमितपणे स्वीकारत असत. प्रत्येक वर्गात सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची काळजी आणि शिस्तबद्ध व्यवस्था यासाठी त्यांची विशेष ओळख होती. संघाने राबविलेल्या विस्तारक योजनेत त्यांनी वरळी आणि सफाळा येथे प्रत्येकी सहा महिन्यांचा कालावधी पूर्णवेळ कार्यासाठी दिला. १९९० आणि १९९२ मध्ये अयोध्येतील कारसेवेतही त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
भाऊ बडवे यांचे संपूर्ण आयुष्य संघकार्याला समर्पित होते. ते कोणत्याही पदासाठी काम करत नसत; कार्य हाच त्यांचा पुरस्कार होता. त्यांची साधी राहणी, निरलस वृत्ती आणि प्रत्येक कार्यकर्त्यावरील आत्मीयता यामुळे ते सर्वांचे "भाऊ" बनले होते. संघातील नव्या स्वयंसेवकापासून ते ज्येष्ठ कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाशी ते आपुलकीने वागत. मृत्यूपूर्वीच्या तीन-चार महिन्यांत प्रकृतीने साथ सोडल्यामुळे ते घरातच होते. मात्र त्या काळातही गोरेगावातील स्वयंसेवक त्यांना नियमित भेटायला येत असत. हे केवळ एका कार्यकर्त्याविषयीचे प्रेम नव्हते, तर त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या आत्मीय संबंधांचे ते जिवंत प्रतीक होते.
दि. ०७ ऑगस्ट २००४ रोजी भाऊ बडवे यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संघकार्याला एक निःस्वार्थ, ध्येयनिष्ठ आणि प्रेमळ कार्यकर्ता गमवावा लागला. सामान्यतः कुटुंबप्रमुख ही संज्ञा स्वतःच्या घरापुरती मर्यादित असते; परंतु भाऊ बडवे यांच्या बाबतीत संघ आणि त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक स्वयंसेवक, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक परिचित हीच त्यांची विस्तीर्ण कुटुंब व्यवस्था होती. भाऊ बडवे यांचे जीवन हे प्रसिद्धीपेक्षा कार्याला, पदापेक्षा कर्तव्याला आणि स्वतःपेक्षा समाजाला प्राधान्य देणाऱ्या संघसंस्कारांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. अशा निःस्वार्थ संघसेवकांच्या त्याग, तपश्चर्या आणि समर्पणामुळेच संघकार्याची भक्कम परंपरा आजही समाजजीवनात प्रेरणादायी ठरत आहे.