जंतरमंतरवर ६० टन कचरा टाकून ‌‘झुरळे‌’ पसार!

    28-Jul-2026   

‘सीजेपी‌’चे आंदोलन झाले, या आंदोलनातील सर्वांमुखीचा शब्द म्हणजे ‌‘अकाऊंटेबलिटी‌’ अर्थात जबाबादारी! मात्र, दिल्लीत आलेली ही झुरळांची संघटना, स्वत:ची स्वच्छतेची जबाबदारी सपशेल विसरली. त्यामुळेच त्यांनी केलेला 60 टन कचरा जमा करण्यासाठी दिल्ली प्रशासनाला कंबर कसावी लागली. हा कचरा जरी प्रशासनाने साफ केला असला, तरी या ‌‘झुरळ‌’प्रेमींच्या अपशब्द आणि कुविचारांचा कचरा साफ करण्यासाठी समाजालाही मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर ‌‘कॉकरोच जनता पार्टी’ने, ‌‘नीट‌’ परीक्षेतील घोटाळ्याबद्दल आंदोलन केले. या आंदोलनात लडाखचे सोनम वांगचूक यांनी दीर्घकाळ उपोषण करून, ‌‘सीजेपी‌’ने जे आंदोलन धगधगत ठेवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात आपले हात धुवून घेण्याचा प्रयत्न, विविध विरोधी पक्षांनीही केला. काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, विविध डावे पक्ष, डाव्या विद्यार्थी संघटना, शेतकरी संघटना अशा अनेकानेक पक्ष, संघटनांनी यानिमित्ताने आपल्या शिडात हवा भरून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात हौसे, गवसे आणि नवसे असे सर्वचजण सहभागी झाले. या आंदोलनात सहभागी झालेल्या ‌‘जेन-झी‌’मुळे, आंदोलन सफल झाल्याचा डांगोरा पिटण्यात आला. पण, देशातील वातावरण आणखी बिघडू नये आणि असामाजिक तत्त्वांच्या हाती आंदोलनाची सूत्रे जाता कामा नयेत, हे लक्षात घेऊनच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

विद्यार्थी चळवळीत कार्य करताना पोलिसांचा लाठीमार सहन केलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना, त्यांचा काही दोष नसताना पायउतार व्हावे लागले. या आंदोलनादरम्यान त्यात सहभागी झालेल्या युवक-युवतींनी अत्यंत असभ्य भाषेत, अशिष्ट वर्तन करून पंतप्रधानांचा आणि अन्य नेत्यांचा अपमान केला. आपल्यावर काहीच चांगले संस्कार झाले नसल्याचेच, या आंदोलकांनी याद्वारे दाखवून दिले. आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. या आंदोलनामुळे जंतरमंतर परिसरात जी अस्वच्छता पसरली, जो प्रचंड कचरा निर्माण झाला, त्यास जबाबदार कोण?

या आंदोलनामुळे त्या परिसरात सुमारे 60 मेट्रिक टन कचरा निर्माण झाला. दीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनानंतर, तो परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी काय एकट्या दिल्ली प्रशासनाची? आंदोलकांचे काहीच कर्तव्य नाही का? आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची जी हानी झाली, त्याची भरपाई कोण करून देणार? एकीकडे गुंडगिरी करायची आणि असे करणाऱ्यांवरील केसेस मागे घेण्यास भाग पाडायचे. या आंदोलनाच्या निमित्ताने तरुणाईचे एक विकृत चित्र देशवासीयांना पाहावयास मिळाले.

‌‘कॉकरोच जनता पार्टी’च्या या आंदोलनामुळे, नवी दिल्ली महानगर परिषदेस त्या परिसराची साफसफाई करण्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांना नेमावे लागले. तेथील 60 टन कचरा उचलण्यासाठी अवजड यंत्रसामग्री वापरावी लागली. आंदोलनाच्या ठिकाणी पडलेला कचरा साफ करणे, रस्ते धुवून काढणे, सार्वजनिक भिंतींवर आंदोलकांनी ज्या घोषणा रंगविल्या होत्या, त्याची साफसफाई करणे; पदपथांची दुरुस्ती, त्या भागातील हरित पट्टा पुन्हा तयार करणे, तेथील लॅण्डस्केपिंग पूर्ववत करणे, आजूबाजूचे अन्य मार्ग दुरुस्त करणे अशा अनेकानेक कामांची जबाबदारी दिल्ली प्रशासनावर यामुळे पडली. जंतरमंतरप्रमाणेच टॉलस्टॉय मार्ग, संसद मार्ग, जयसिंह मार्ग, कॅनॉट प्लेसचा काही भाग आदी परिसरांत जी हानी झाली होती, ती दुरुस्त करण्याचे कामही दिल्ली प्रशासनास हाती घ्यावे लागले.

नवी दिल्ली प्रशासनानुसार, आंदोलनाच्या ठिकाणी विविध प्रकारचा असा 60 टन कचरा होता. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवसांमध्ये, सदर कचरा हलविण्याचे काम दिल्ली प्रशासनास करावे लागले. दिल्ली प्रशासनाचे अधिकारी आणि 500 कर्मचारी या मोहिमेत गुंतले होते. अन्नपदार्थांची वेष्टणे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, कागदी कप, कपडे, साहित्य, राडारोडा, दगड आदी साहित्याचा या कचऱ्यात समावेश होता. हा सर्व कचरा हटविण्यासाठी दिल्ली प्रशासनाने विविध यंत्रसामग्रीसह, शेकडो सफाई कामगारांना कामाला लावले होते. यासाठी जो प्रचंड खर्च आला, तो काही या आंदोलकांकडून वसूल करण्यात आला नाही. जनतेने कररूपाने जो पैसा सरकारला दिला, त्यातूनच हा खर्च करण्यात आला ना!

जंतरमंतरवर जे आंदोलन झाले, त्या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी जो कचरा केला होता, तो दिल्ली प्रशासनाने साफ केला. पण, अशी आंदोलने ज्या-ज्या ठिकाणी होतात, तेथील कचरा साफ करण्यासाठी जो खर्च येतो, त्याची जबाबदारी आंदोलक घेतील काय? सार्वजनिक स्वच्छता राखणे हे आपलेही एक कर्तव्य आहे, असा विचार त्यांच्या मनात येईल का? हुल्लडबाजी करायची, वाहनांची नासधूस करायची, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करायचे, दगडफेक करायची अशा मार्गांचा वापर करून आंदोलन ‌‘यशस्वी‌’ करायचे, हे कितपत योग्य? आंदोलनानंतर त्या परिसराची स्वच्छता करण्याचा चांगला विचार, ‌‘जेन-झी‌’च्या डोक्यात कधीच आला नाही का? ‌‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अभिजित दीपके यास आपण मोठी लढाई जिंकली, असेच वाटत असेल. पण, आपला वापर करून आपल्याभोवती जमलेले हेच कोंडाळे आज ना उद्या आपल्याला अडगळीत टाकून देणार आहे, ते त्याच्या कधी लक्षात येणार?

आक्रमक भूमिका घ्या : पाक लष्कराचा आदेश

पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानातील माध्यमांवर, भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्यासाठी दबाव आणत असल्याचे अलीकडेच उघड झाले आहे. हा गौप्यस्फोट एका पाकिस्तानी पत्रकारानेच केला. या पाकिस्तानी पत्रकाराचे नाव इम्रान रियाझ असे आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ‌‘डायरेक्टर जनरल ऑफ इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्स‌’ या विभागाने, माध्यम क्षेत्रातील वरिष्ठ आणि पत्रकारांची एक गुप्त बैठक आयोजित केली होती. भारताविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याचा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. ‌‘भारत आता विखंडीत होण्याचा मार्गावर आहे, असा प्रचार, असे कथन करावे,‌’ असा आग्रह पाकिस्तानी माध्यमगृहांपुढे लष्कराकडून धरण्यात आला. आपला शेजारी असलेल्या भारताविरुद्ध अपप्रचाराचे गरळ ओकण्यात यावे, असेही पाकिस्तानी लष्कराने या माध्यमगृहांना सांगितले असल्याची माहिती बाहेर आली.

पाकिस्तानात विविध आघाड्यांवर तेथील राजवटीला जे अपयश आले आहे, त्यावरून जनतेचे अन्यत्र लक्ष वळविण्यासाठीच या तंत्राचा वापर करण्याचे पाकिस्तानी लष्कराने ठरवले असल्याचे दिसते. लष्करासमवेतच्या या गुप्त बैठकीत, माध्यम क्षेत्रातील वरिष्ठांना भारतविरोधी प्रचार करण्यास सांगण्यात आल्याची माहितीही पत्रकार इम्रान रियाझ यांनी दिली. बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीर या भागांतील जनतेत सध्या मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. सुशासनाचा अभाव, भ्रष्टाचारामुळे तेथील जनता गांजली आहे. अशा सर्वांवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी, पाकिस्तानी लष्कराने माध्यमांना भारतविरोधी प्रचार करण्यासाठी वेठीस धरण्याचे ठरवल्याचे दिसते. पण, भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी प्रतिमा निर्माण झाली आहे, ती पाकिस्तानच्या अशा कृतींमुळे मुळीच मलिन होणार नाही.

नागर शैलीतील प्राचीन शिव मंदिर!

जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यामध्ये, दहाव्या - अकराव्या शतकातील नागर वास्तुकलेचा वापर करून निर्माण करण्यात आलेले शिव मंदिर आहे. बिल्लावर या ऐतिहासिक गावामध्ये हे शिव मंदिर आहे. हे शिव मंदिर अर्जुनाचा पुत्र राजा बभ्रुवाहन याने बांधल्याची स्थानिक जनतेची श्रद्धा आहे. या गावाचे नाव ‌‘बेलापूर‌’ किंवा ‌‘विल्लापूर‌’ असावे. त्याचे नंतर ‌‘बिल्लावर‌’ झाले असावे. या मंदिराचे गर्भगृह, अंतराळ आणि मंडप असे भाग आहेत. मंदिराच्या भिंतीवर विविध देवता, दिक्पालांच्या मूर्ती आहेत. उत्तर भारत आणि हिमालयातील राज्ये यांना जोडण्यामध्ये, या मंदिराने महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर एक सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र म्हणून कार्यरत होते. दहाव्या-अकराव्या शतकातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून, या मंदिराकडे पाहिले जाते. आता या मंदिराचा मंडप जवळजवळ नाहीसा झाला आहे. पण, मंदिराच्या बाह्य भिंतीवर अनेक शिल्पाकृती कोरल्याचेही आढळते. या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. या मंदिराचे शिखर नागर शैलीतील वास्तुकलेचा उत्तम नमुना. जम्मू-काश्मीरमध्ये असलेली ही हिंदू मंदिरे त्या भागात जी सनातन संस्कृती कित्येक वर्षांपासून रुजली होती, त्याचेच द्योतक आहेत.

9869020732





दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.
 
 
संबंधित मजकूर