मागील भागात केसगळतीच्या प्रमुख कारणांविषयी आपण माहिती करुन घेतली. आजच्या भागात अपुऱ्या पोषणाचे केसांवर होणारे दुष्परिणाम, केसगळती रोखण्यासाठी आहारातील पथ्ये आणि आयुर्वेदातील उपाययोजनांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
अपुरे पोषण झाल्यामुळे केसांवर होणारे प्रमुख दुष्परिणामांची आजच्या लेखातून माहिती करुन घेऊया.
लोह (Iron), जस्त (Zinc) आणि ‘ड’ जीवनसत्त्व यांसारख्या पोषक घटकांची कमतरता असल्यास केस गळण्याचे प्रमाण (Alopecia) वाढते. शरीरात प्रथिनांची किंवा ‘ओमेगा-3 फॅटी ॲसिड’ची कमतरता असल्यास केस कोरडे आणि निस्तेज होतात. अपुऱ्या पोषणामुळे केस पातळ होतात आणि दुतोंडी केस होण्याच्या समस्येमुळे केस सहज तुटतात. केसांच्या वाढीच्या चक्रावर (Anagen phase) वाईट परिणाम होतो, ज्यामुळे केस लांब होणे थांबते किंवा खूप हळूहळू वाढतात.
प्रथिनांचे अतिशय कमी प्रमाण किंवा ‘क्रॉनिक’ कुपोषणामुळे केस कायमचे पातळ होतात आणि काही भागांत टक्कल पडू शकते.
आधुनिक जीवनशैलीमुळे मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढला आहे; त्यामुळे नशेच्या आहारी जाणे, नैराश्य येणे या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे ताणतणाव वाढून (Stress) शरीरात ‘कॉर्टिसोल’ नावाचे संप्रेरक वाढते, ज्यामुळे केसांचे नैसर्गिक चक्र बिघडते. यामुळे केस गळणे (Telogen Effluvium), केस अकाली पांढरे होणे, टाळूवर खाज सुटणे किंवा संसर्ग आणि केस पातळ होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.
ताणतणावामुळे केसांवर होणारे मुख्य दुष्परिणाम
टेलोजेन इफ्लुविअम (Telogen Effluvium) : जेव्हा व्यक्ती खूप ताणतणावात असते, तेव्हा अतिप्रमाणात विचार डोक्यात चालू असतात व अतिविचारामुळे शरीरातील ‘कॉर्टिसोल’ नावाचे ताण देणारे संप्रेरक वाढते. हे संप्रेरक केसांच्या नैसर्गिक वाढीच्या चक्रात अडथळा आणते, ज्यामुळे केस अकाली गळण्याच्या टप्प्यात प्रवेश करतात आणि केस मोठ्या प्रमाणात गळतात. जेव्हा तुम्ही तीव्र तणावाखाली असता, तेव्हा जास्त प्रमाणात केस वाढण्याच्या टप्प्यातून थेट ‘विश्रांती’च्या किंवा गळण्याच्या टप्प्यात जातात. यामुळे केस धुताना किंवा विंचरताना अचानक मोठ्या प्रमाणात केस गळतात.
केस अकाली पांढरे होणे : दीर्घकाळ ताणतणावात राहिल्याने ‘मेलॅनिन’ (केसांना काळा रंग देणारे घटक) तयार करणाऱ्या पेशींवर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात.
एलोपेशिया एरियाटा (Alopecia Areata) : तणावामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती स्वतःच्याच केसांच्या मुळांवर (फॉलिकल्स) हल्ला करू शकते, ज्यामुळे टाळूवर गोलाकार टक्कल पडू शकते.
ट्रायकोटिलोमॅनिया (Trichotillomania) : काही लोकांना खूप ताण किंवा चिंता आल्यास सवयीनुसार स्वतःचे केस ओढण्याची किंवा तोडण्याची सवय जडते, ज्यामुळे केस विरळ होतात.
केसांची वाढ खुंटणे : ‘कॉर्टिसोल’ संप्रेरकामुळे टाळूतील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत आणि केसांची वाढ थांबते. याबरोबरच नैसर्गिक कारणांमध्ये प्रदूषित पाणी, क्लोरीन असलेले पाणी आपल्या केस, त्वचा आणि सर्वांगीण आरोग्यासाठी हानिकारक आहे. या पाण्यामुळेसुद्धा केस गळणे, रूक्ष होणे, टाळूला खाज येणे यांसारख्या समस्या होतात.
मी माझ्या मागील लेखात सांगितल्याप्रमाणे, आधुनिक युगात आधुनिक जीवनशैलीमुळे काही गोष्टी न टाळता येण्यासारख्या आहेत, तर काही गोष्टी आपण टाळू शकतो. त्यातील आपण आपल्या केसांच्या आरोग्यासाठी काय टाळायचे किंवा काय टाळू शकतो, हे स्वतः स्वतःचे ठरवायचे. ते खालीलप्रमाणे ः
केसांच्या उत्तम आरोग्यासाठी
गरम पाण्याचा वापर : गरम पाण्याने केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक ओलावा आणि तेल निघून जाते. त्यामुळे केस कोरडे आणि निजव होतात. नेहमी कोमट किंवा थंड पाण्यानेच केस धुवावेत.
रासायनिक हेअर उत्पादने : पॅराबेन (Paraben) आणि सल्फेटने (SLS) युक्त शॅम्पू टाळावेत. हे घटक केसांची मुळे कमकुवत करतात. त्याऐवजी नैसर्गिक घटक असणारी, स्वतःच्या प्रकृतीला योग्य असणारी उत्पादने वापरावी.
ओल्या केसांची निगा : ओले केस खूप नाजूक असतात. त्यामुळे ते टॉवेलने जोरात घासणे किंवा ओल्या केसांना कंगवा (विशेषतः प्लास्टिकचा) वापरणे टाळावे. कंगवा जर लाकडी असेल, तर उत्तम! ओले केस बांधून न ठेवता, कोरडे होईपर्यंत खुले ठेवणे किंवा टॉवेलने हळुवार हलक्या हाताने कोरडे करावे.
अति स्टायलिंग आणि रसायने : ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर यांसारख्या हीट स्टायलिंग साधनांचा अतिवापर टाळावा. तसेच केसांवर केमिकल कलर्स किंवा ब्लीचिंग करणे टाळावे. जर केसांना कलर किंवा ब्लो ड्रायर, स्ट्रेटनिंग करणार असालच, तर चांगल्या ठिकाणी व योग्य साधनांच्या साहाय्याने करावे.
आहार आणि सवयी
धूम्रपान, मद्यपान, जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न, फास्ट फूड आणि साखरेचे पदार्थ टाळावेत. या सवयींमुळे रक्ताभिसरण मंदावते आणि केसगळती वाढते. पोषणमूल्ये जास्त असणाऱ्या पदार्थांचा जेवणात समावेश करावा.
ताणतणाव कमी करणे : तणाव (Stress) कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करावा. दररोज 10-15 मिनिटे ध्यान (मेडिटेशन) आणि गाढ झोप घ्यावी. यासोबतच, आवडत्या छंदात वेळ घालवणे आणि कामातून थोडा वेळ काढून आपल्या परिवारासोबत घालवणे उत्तम.
आजारांवर नियंत्रण : स्थूलता, थायरॉईड समस्या, मधुमेह आणि ल्युपस या आजारांमध्ये केसांच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या आजारांवर औषधी व योगसाधना यांनी नियंत्रण मिळवता येते.
महिलांमध्ये हार्मोनल बदल, बाळंतपण, गर्भनिरोधक गोळ्या घेणे किंवा स्त्रीच्या मासिक पाळीत होणारे बदल यामुळे केस गळू शकतात.
केसांची योग्य निगा राखण्यासाठी आयुर्वेदीय उपाय
केसांच्या आरोग्यासाठी पंचकर्म ही आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी ‘डिटॉक्स’ प्रक्रिया आहे. हे शरीरातील विषारी घटक (Ama) बाहेर टाकून रक्तप्रवाह सुधारते आणि केसांच्या मुळांना (Follicles) पोषण देते. पंचकर्मामुळे केस गळणे थांबते आणि नवीन केस उगवण्यास मदत होते.
केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख पंचकर्म प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत :
नस्य (Nasya) : नाकामध्ये औषधी सिद्ध तेल किंवा तूप टाकून शिरोरोग आणि मानेचे आजार दूर केले जातात. हे टाळूचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते.
शिरोधारा (Shirodhara) : कपाळावर एका विशिष्ट गतीत धारेतून कोमट औषधी तेल किंवा आयुर्वेदिक द्रव सोडला जातो. यामुळे मानसिक ताण, चिंता कमी होते आणि हार्मोन्स संतुलित होऊन केस गळणे थांबते.
शिरो-अभ्यंग (Shiro Abhyanga): कोमट औषधी तेलाने (उदा. भृंगराज, ब्राह्मी किंवा आवळा तेल) डोक्याची मालिश केली जाते. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण वाढते.
शिरोलेप (Shiro Lepa) : टाळूवर औषधी वनस्पतींची पेस्ट लावून काहीवेळ ठेवली जाते. कोंडा कमी करणे आणि केसांना पोषण देणे यासाठी हा लेप गुणकारी आहे.
विरेचन (Virechana) : शरीरातील अतिरिक्त उष्णता आणि पित्त दोष बाहेर काढण्यासाठी ही ‘डिटॉक्स’ पद्धत वापरली जाते, ज्यामुळे पचन सुधारून केसांना योग्य पोषण मिळते.
जलौकावचरण : केसांसाठी ‘जलौका’ (ज्याला ‘लीच थेरपी’ किंवा ‘जलौकावचरण’ म्हटले जाते,) ही एक प्राचीन आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा आहे. केस गळणे, चाई पडणे (Alopecia/Indralupta) आणि टाळूच्या विकारांवर ही थेरपी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
केसांच्या आरोग्यासाठी बीजचक्र (Seed Cycleing) ः केसांच्या वाढीसाठी मदत करणाऱ्या बियांमध्ये जवस, भोपळ्याच्या बिया आणि मेथीच्या बियांचा सर्वाधिक उल्लेख केला जातो. खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल, द्राक्षाच्या बियांचे तेल, जोजोबा, आवळा आणि व्हिटॅमिन ‘ई’ तेलासारख्या लोकप्रिय तेलांसोबत या बिया निरोगी टाळू मिळवून केसांच्या निरोगी वाढीस चालना देण्यास मदत करू शकतात.
केसांच्या आरोग्यासाठी औषधी वनस्पती (केशद्रव्ये)
शिकाकाई : नैसर्गिक शॅम्पू म्हणून आपण शिकाकाईचा वापर करू शकतो. केसांमधील कोंडा आणि केस गळणे यांसारख्या विविध केसांच्या समस्यांवर उपचार करण्यापासून ते केसांचे आरोग्य सुधारण्यापर्यंत शिकाकाईचा वापर केला जातो. तुम्ही शिकाकाई शॅम्पू, कंडीशनर, तेल किंवा ‘हेअर मास्क’ अशा अनेक स्वरूपांत वापरू शकतात. शिकाकाई वापरण्याचे सर्वांत सामान्य मार्ग म्हणजे पावडर.
हीना (मेंदी/Lawsonia inermis) ही एक अतिशय लोकप्रिय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. केस मजबूत करणे आणि केसांना नैसर्गिक रंग देणे यासाठी उपयोग होतो.
भृंगराज : केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी ओळखले जाते. भृंगराजनिर्मित केशतेल केसांची वाढ व केसांना पोषण देण्यासाठी फायदेमंद आहे.
आवळा : आवळा तेल केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी, मुळे मजबूत करण्यासाठी आणि टाळूचे आरोग्य सुधारण्यासाठी ओळखले जाते. हे केस गळणे कमी करण्यास मदत करते, नैसर्गिक चमक जोडते आणि अकाली पांढरे होणे कमी करण्यास मदत करते. ते खोलवर
‘हायड्रेटिंग’देखील करते.
यष्टिमधु : यष्टिमधु टाळूतील रक्तपुरवठा सुधारते, ज्यामुळे केस गळणे थांबते. टाळूची जळजळ शांत करते, कोरडेपणा कमी करते आणि कोंडा दूर करते. ‘फ्लेव्होनॉईड्स’ आणि ‘फायटोस्ट्रोजेन्स’मुळे केसांची मुळे मजबूत होतात. हे नैसर्गिक कंडीशनर म्हणून काम करते, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
रिठा : टाळूवरील घाण, जास्त तेल आणि कोंडा काढून टाकते, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. केसांच्या मुळांना पोषण देते, केस गळणे कमी करते आणि केसांची वाढ वाढवते. ‘ॲण्टी-प्रोटोझोअल’ गुणधर्मांमुळे ते डोक्यातील उवा मारण्यास मदत करू शकते. केस धुण्यास उपयोगी.
-डॉ. स्नेहा बोरुटकर वांढरे
(लेखिका ‘बीएएमएस’, ‘एमडी’ (कायचिकित्सा) आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट,आयुर्वेदिक आहारतज्ज्ञ असून, ठाणे पश्चिम येथील ‘स्नेहस्पर्श स्किन ॲण्ड हेअर क्लिनिक’मध्ये कार्यरत आहेत.)
(लेख ‘आरोग्य भारती कोकण प्रांता’द्वारे प्रकाशित)