मुंबई : (Gargai Dam) मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पालघर जिल्ह्यातील गारगाई धरण प्रकल्प मे २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने निश्चित केले आहे. प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण, जमीन अधिग्रहण आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच वन आणि नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Gargai Dam)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गारगाई धरण पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्राच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याला मोठी बळकटी मिळणार असून, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. प्रकल्पासाठी सुमारे ८४४ हेक्टर जमीन बाधित होणार असून त्यात ६५८ हेक्टर वनजमीन आणि १८६ हेक्टर खासगी जमीन आहे. बुडीत क्षेत्रासाठी १,४०० हेक्टर जमीन पुनर्वनीकरणासाठी उपलब्ध करून दिली जाणार असून, वनविकासासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांत पर्यायी जमीन देण्याची प्रक्रिया सुरू आहे.(Gargai Dam)
या प्रकल्पामुळे ओगदा आणि खोडदे ही दोन गावे पूर्णपणे, तर पाचघर, तिळमाळ, फणसगाव आणि आमले ही चार गावे अंशतः बाधित होणार आहेत. प्रभावित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक २२ पायाभूत सुविधांची उभारणीही प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे. गारगाई धरण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹३,०६५ कोटी असून, त्यामध्ये धरण, जलबोगदा, पुनर्वसनासाठी आवश्यक सुविधा आणि वीज निर्मिती संचाचा समावेश आहे. जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, पर्यायी वनीकरण, वृक्षांचे निव्वळ वर्तमान मूल्य आणि सल्लागार सेवांवरील खर्च स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.(Gargai Dam)
प्रकल्पासाठी केंद्रीय जनजातीय व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय भूकंप संकल्पना मानक समिती तसेच तांत्रिक आणि पर्यावरणीय मंजुरी प्राप्त झाल्या असून, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या अंतिम मंजुरीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पुनर्वसन आणि पर्यावरणीय उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला.(Gargai Dam)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.