मूळच्या पुण्याच्या; पण आता मिरा-भाईंदर येथे स्थायिक असलेल्या शिवकन्या ‘आयर्नमॅन’ रेश्मा कुटेंचे विचार-कर्तृत्व हे समाजासाठी दीपस्तंभच. त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारा हा लेख...
व्हिएतनाम येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत 180 किमी ‘सायकलिंग’, 42 किमी ‘रनिंग’ आणि 3.8 किमी ‘स्विमिंग’ असे अंतर निर्धारित वेळेअगोदर पूर्ण करून रेश्मा कुटे यांनी ‘फुल आयर्नमॅन’ हा सन्मान मिळवला. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले, सराव केला यात शंका नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेश्मा यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले. त्या स्पर्धेत अव्वल आल्या. यात त्यांचे कर्तृत्व असले, तरीसुद्धा पडद्यामागे जे घडले, ते जर पाहिले; तर रेश्मा यांच्या यशाबाबत एक काव्यपंक्ती मनात स्मरते. ती म्हणजे, कवी कुसुमाग्रज यांची काव्यपंक्ती- ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला...!’
दुर्दम्य आशावाद आणि आत्मशक्तीच्या बळावर नकारात्मक परिस्थितीमध्येही सकारात्मक यश मिळवणाऱ्या रेश्मा कुटे! त्या 2024 सालापासून ‘आयर्नमॅन’ स्पर्धेची तयारी करीत होत्या. धावणे, पोहणे आणि ‘सायकलिंग’ वगैरे स्पर्धा असतात. त्याचा एकत्रित निकाल बघून विजेता ठरवला जातो. रेश्मा यांनी सर्व स्पर्धांसाठी भरपूर सराव केला. ‘सायकलिंग’ स्पर्धेसाठी सराव केलेली सायकल त्या व्हिएतनाममध्येही स्पर्धेसाठी घेऊन दाखल झाल्या होत्या. पण, ऐनवेळी काही आंतरराष्ट्रीय नियमावलीमुळे त्यांना व्हिएतनाममध्ये ती सायकल नेता आली नाही. त्यामुळे व्हिएतनाममध्ये ऐनवेळी सायकल उपलब्ध करण्यात आली. पण, ती सायकल तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण होती. इतर सगळ्या स्पर्धा रेश्मा यांनी लीलया सर केल्या. आता ‘सायकलिंग’मध्ये माघार घेणार की, प्राप्त परिस्थितीवर मात करत यशाचा गड जिंकणार? हा प्रश्न होता.
स्वतःला ‘शिवकन्या’ म्हणवणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार-कर्तृत्वाला प्रमाण मानणाऱ्या रेश्मा यांनी हार मानायची नाही, हे ठरवले. मनातल्या आत्मशक्तीने तांत्रिक अडचणीवर मात केली आणि रेश्मा यांनी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली. तसे त्यांनी गेल्या वष दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध ‘कॉम्रेड मॅरेथॉन’ 10 तास, 16 मि., 20 सेकंदात पूर्ण करून ‘ब्रॉन्झ’ पदकही जिंकले होते. त्यांनी यापूर्वी अनेक ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. देश आणि राज्यस्तरीय अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले.
एक महिला खेळाडू म्हणून त्यांचे कर्तृत्व उत्तुंग असेच. अनेक स्पर्धांमधील त्यांचे यश पाहिले की वाटते, खेळाडू म्हणून लौकिक मिळवण्याचे बाळकडूच त्यांना मिळाले असावे किंवा त्यांच्या घरातच तसे वातावरण असावे. लहानपणापासूनच त्यांना खेळाडू होण्यासाठीची सर्व परिस्थिती लाभली असावी. पण, तसे नाही. मराठा समाजाचे श्रीधर कुटे आणि शैला कुटे या दाम्पत्याला तीन अपत्ये. त्यांपैकी एक रेश्मा. कुटे दाम्पत्य जुन्नरचे. श्रीधर हे ऊस, कांदा, भेंडी आणि असेच काही पिकवत असत. पण, त्यातून कधीही पोटापेक्षा जास्त उत्पन्न मिळत नसे. त्यामुळे अर्थातच, घरी आर्थिक संपन्नता नव्हतीच. गरीब शेतकऱ्याच्या घरी जे वातावरण असेल, तेच वातावरण या घरचेही. मात्र, इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार-संस्कारांचा वारसा होता. तो वारसा या गरिबीतही रेश्मा यांच्या अंतरंगात भरून राहिला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत जन्म घेतला आहे, याचा यथोचित आनंद आणि अभिमान रेश्मा यांना बालपणीही होता आणि आताही तितकाच आहे. असो. श्रीधर अतिशय निर्भीड, कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची त्यांची तयारी! तोच निर्भीडपणा रेश्मा यांच्यातही आला. श्रीधर जास्त शिकलेले नव्हते; पण त्यांनी रेश्मा यांच्या शिक्षणाला नकार दिला नाही. आपली मुलगी शाळेत काहीतरी चांगले करते, याची जाणीव कुटे दाम्पत्याला होती. त्यांचा मुलीवर विश्वास होता. दुसरीकडे रेश्मा यासुद्धा आई-बाबांना शेतीकामात मदत करायच्या. रोजंदारीवर माणूस ठेवण्यापेक्षा घरातल्या व्यक्तीने काम केले, तर चार पैसे वाचतील असा त्यामागचा विचार. काम करत-करत त्या शिक्षण घेऊ लागल्या.
त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांची आत्मशक्ती त्यांच्यात होतीच. त्यात ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ आणि किरण बेदी यांचे ‘आय डेअर’ ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. या दोन पुस्तकांनी त्यांच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवला. “तुम्ही गरिबीत जन्मलात, यात तुमची चूक नाही. मात्र, गरिबीतच मृत्यू पावलात, तर ते चूक आहे,” हे ‘अग्निपंख’मधील वाक्य त्यांच्या मनात रुजले. आपणही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयुष्यात असे काहीतरी करायचे की, आपल्या घराचे, समाजाचे आणि देशाचे नाव उंचावता येईल, ही जिद्द त्यांनी मनात ठेवली. त्यातूनच पुढे त्यांना पोलीस दलात नोकरी लागली. मात्र, ती नोकरी न समजता समाजासाठी काहीतरी करण्याची संधी, असेच त्या मानतात. नोकरी करता-करता त्यांनी खेळाडू म्हणूनही सराव कायम ठेवला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महिला खेळाडू म्हणून त्यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळेच ‘शिवकन्या’ रेश्मा कुटे यांचे अभिनंदन!
9594969638