आजि मी ब्रह्म पाहिले
आगळे रूप डोळा पाहिले
- संत तुकाराम महाराज
अर्थ : आज मी परब्रह्म प्रत्यक्ष पाहिले. त्याच रूप इतकं विलक्षण होतं की डोळ्यांचं पारणं फिटलं.
वरील अभंग तुकोबारायांच्या आत्मसाक्षात्काराची अनुभूती आहे. त्यांना जेव्हा विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन झालं, तेव्हा हा अभंग त्यांना स्फुरला.
हा संदर्भ आज इथे घेण्याचे प्रयोजन असे की, महाराष्ट्रात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये आढळणार्या सारस पक्ष्याचे मला दर्शन झाले. त्या द्विज-गणाच्या दर्शनाने मलाही असाच अपार आनंद अनुभवता आला. म्हणून हा लेखनप्रपंच. मनातील कागदावर उतरवण्याचा अल्पसा प्रयत्न.
निमित्त होते, गोंदिया वनविभागाच्यावतीने स्थानिक सारस मित्रांच्या साथीने गेल्या दि. २२ जूनला आयोजिलेली ‘सारस गणना.’ दरवर्षी, ही गणना केली जाते. अकोल्याहून अस्मादिक आणि माझे मित्र मिलिंद जोग या गणनेसाठी हजर झालो.
गोंदियातील माझा खास सखा मुकुंद धुर्वे (‘महाराष्ट्र पक्षी मित्र’च्या स्थापनेपासून आम्ही एकत्र पक्षी निरीक्षण करायचो. संघटनेची पायाभरणी करण्यात खारीचा वाटा उचलून गावोगावी भटकायचा.) अशोक पडोळे, संजय आखरे, रूपेश निंबर्ते यांसह २२ तारखेला पहाटे ३.४५ वाजता सारस दर्शनाला निघालो. शहरापासून १८ किमीवर असलेल्या ‘वैनगंगा-वाघ’ या सरितांच्या संगमावर आम्हाला पोहोचायचे होते. मार्गावर अंधाराने आपली चादर पसरवली होती. तरी, रेतीच्या मालवाहू गाड्या वेगाच्या गतीशी स्पर्धा करून वेगाने धावत होत्या. आमच्या सारथ्याला समोरची वाहने चुकवताना चांगलीच कसरत करावी लागत होती. साधारण ५.१० वाजता आम्ही संगम स्थानी दाखल झालो. आसमंतातील शीतल हवा सुखावत होती. झुंजूमुंजू होऊ घातले होते. द्विज-गणांचा रानगलका परिसराला आगळ्या सुरांची साथ देत होता. असे भासत होते की, निसर्ग जणू भरभरून अमृतवाटप करतोय. उल्हसित मनाने सारस दर्शनाची आस बेचैनी वाढवत होती. आम्हा अनाहुतांच्या आगमनामुळे परिसरातील रहिवासी नाराजीनेच आम्हाला बघत होते. दोन्ही नद्यांच्या विशाल पात्रातील पिवळी धमक रेती अंधारातही चमकत होती. जणू काही हेमकणांचा नजराणाच! धनेश, सुभग, सातभाई, लालबुड्या बुलबुल, होले, कोतवाल, कोकिळ, दयाळ, पुकपुक्या, बहिरे पोपट, वटवटे, शिंपी, करडा धोबी, हरियाल ही मंडळी काठावरील वृक्षराजींवर मधुर स्वरात गीतगुंजन करून आम्हाला रिझवत होती. भारद्वाजाचे युगुल प्रेमालाप आळवण्यात मग्न होते. नदीपात्रात असलेल्या पाण्यात नदीटिटवी, वंचक, गायबगळे, ढोक, लाजर्या पाणकोंबड्या, थोरला धोबी हे नभचर पोटपुजेची सामग्री शोधत होते. पण आम्हाला ज्यांच्या दर्शनाची ओढ लागली होती, त्यांचे दर्शन अजून झाले नव्हते. ती हुरहूर मनात गोंधळ घालत असतानाच अचानक उत्सवमूर्ती सारस काठावरच्या शेतातून आवाज करत आम्हाला हूल देऊन परागंदा झाले. उदास मनाने ‘आता काय करायचे,’ ही चर्चा चालू असताना धुर्वेंचा भ्रमणध्वनी गुणगुणला. संदेश आला की, तेथून पाच किमीवर असलेल्या दासगाव घाटानजीकच्या एक सारस मित्राच्या शेतात सारसाच्या दोन जोड्या मुक्काम ठोकून आहेत. मग काय? लगेच बाडबिस्तरा (कॅमेरे, ट्रायपॉड, ट्रॅव्हल बॅग) आवरून तिकडे निघालो!
ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान वर्णन केले आहे, प्रतीक्षेच्या फळाचे. ते म्हणतात,
"प्रतीक्षा हीच खरी साधना आहे. फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्न करा; फळ नक्की मिळेल.” दासघाटात गेल्यावर आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. शेतातील एका उंच वृक्षाखाली चार सारस रमले होते. त्यांचे दर्शन घ्यायला आलेल्या सारस प्रेमींमध्ये गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपवन संरक्षक पवन जोंग, ताडोबाचे सचिन शिंदे ही युवा अधिकारी मंडळी उत्साहाने, उत्सुकतेने, तल्लीनतेने सारस दर्शनात मग्न होते. स्थानिक सारस मित्र व गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर त्यांच्या सहकार्यांसह हजर होते.
अंदाजे २०० फुटांवरून आम्ही द्विनेत्रीने सारस न्याहाळले आणि आनंदाची बम्पर लॉटरीच आपल्याला लागली आहे, असे मी समजतो. ते देखणे द्विजगण साडेचार ते पाच फूट उंचीचे, भस्मी रंगाने रंगलेले, चोचीपासून डोक्यापर्यंत रक्तवर्णी. ‘मिसेस सारस’ उंचीने थोडी लहान, तर ‘मिस्टर’ तिच्यापेक्षा उंच. आपल्याच आनंदात मश्गुल. मधूनच चोचीने स्वतःला, साथीदाराला खाजवत, एकमेकांशी संवाद साधत, चोच मातीत खुपसून खाद्य शोधत, आकाशाच्या दिशेने मुख करून जोरात ध्वनी करून परिसराचा अंदाज घेत होते. आम्ही भानावर आलो नि पटापट छायाचित्रे टिपली. २०-२५ मिनिटांनी सभोवतालची सारस मित्रांची संख्या फुगली, तसा कोलाहल वाढला. त्यामुळे चौघेही सावध झाले नि क्षणार्धात पलीकडच्या शेतात जाऊन उतरले. सारसांचे ते रूप खरंच लोभसवाणे होते.
नमनाला घडाभर तेल ओतून (खरडून) झाल्यावर मला आता मोह आवरत नाही, तो ‘सारस आख्यान’ लावायचा. सारसाची चोच म्हणजे, जणू काही लोखंडाची टोकदार पटाशीच (सुतार कामात लाकूड तासतात ती पटास) बेडूक, मासे, गोगलगायी, पक्षांची नवजात पिल्ले, धानाच्या जाड ओंब्या/गवत खाण्यासाठी निसर्गाने दिलेलं वरदान. पण शोकांतिका अशी की, एवढा उंच देखणा पक्षी शिकार्यासाठी सोपं सावज असतं. सुदैवाने मात्र भारतात ते सुखेनैव वावरतात. कारण रामायणात उल्लेख आहे की, भगवान राम जेव्हा पंपा सरोवराजवळ पोहोचतात, तेव्हा तेथील विपुल पक्षीसंपदा बघून ते आनंदित होतात. तेव्हा चर्चेच्या ओघात तेथील ऋषींनी दशरथपुत्राला सांगितले की, क्रौंच कुळातील सारस पक्षी मानवी आहारासाठी वर्ज्य आहे. त्यामुळे सारसाला विशेष संरक्षण बहाल करण्यात आले आहे. म्हणून भारतात मानवाकडून सारसाची शिकार होण्याचे प्रमाण अल्प आहे.
मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः|
यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम्॥
वाल्मिकींच्या मुखातून आलेला संस्कृत साहित्यातील हा पहिला श्लोक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे सारसाला संरक्षणाचे कवच लाभले आहे.
सारस पक्षी साथीदाराशी एकनिष्ठ असतात. दोघांपैकी एक मृत्युमुखी पडला, तर दुसरा विरहात देहत्याग करतो किंवा ‘एक अकेला इस शहर मे (नाही) खेत मे,’ या हिंदी गीताप्रमाणे उर्वरित जीवन व्यतित करत असावा.संस्कृतमध्ये सारसाला तीन विविध नावांनी संबोधले आहे. ‘मिथुनिन, कामिवल्लभ आणि गोनंद.’ सारस हा उत्तर प्रदेशाचा राज्य पक्षी आहे. तेथे नऊ जिल्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात गणना केली जाते. २०२५च्या गणनेनुसार १८९० सारसांची नोंद झाली आहे. आपल्या इथे फक्त ३२ सारसांची नोंद यावर्षी झाली. यावरून आपल्या लक्षात येईल की, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील वनविभागाने, कृषी विभागाने, विद्युत मंडळाने, स्थानिक सारस मित्रांनी, शेतकर्यांनी सध्या जी सारस संवर्धन आणि संरक्षणाची मोहीम चालविली आहे, तिला अधिक बळकटी देणे गरजेचे आहे. मी तर गोनंद दर्शनाने भारावलो आहे. आता पुढील वर्षी न चुकता गोंदिया वारी करायची नि कामिवल्भाचे दर्शन घ्यायचे.
दिपक जोशी
(लेखक पक्षीमित्र असून माजी मानद वन्यजीव रक्षक, अकोला आहेत.)
९४२३१५०५५०