ऑलिम्पियन रनर व्हायचा आनंद लुटा...

    27-Jul-2026

 
Pandharpur Wari
 
अनेक जागतिक स्पर्धांमध्ये चालणे, धावणे, जलद चालणे असे विविध खेळ आपण पाहतो. मात्र, हे सारे हिंदू धर्मांत आधीपासूनच असलेले आपल्याला दिसतात. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे पंढरीची वारी! या वारीमध्ये होणारे चालणे, विविध खेळ, धावणे, रिंगणे या सगळ्यात एक क्रीडा लपली आहे. अशाच वारीतील क्रीडांचा मागोवा घेणारा हा लेख...
 
ग्रीसमधील अथेन्सचे प्राचीन ऑलिम्पिक असो किंवा आजचं आधुनिक ऑलिम्पिक असो, अशा काही जागतिक क्रीडा स्पर्धांचा अविभाज्य भाग म्हणजे ‘अ‍ॅथलेटिस’ हा जलद चालण्याचा अथवा धावणे होय. काही क्रीडा प्रकार जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये आले व गेले. अगदी ग्लासगो येथील दि. २३ जुलै ते दि. २ ऑगस्ट या कालावधीत खेळल्या गेलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून दहा खेळांना वगळण्यात आलं असलं, तरी अ‍ॅथलेटिसचा समावेश हा असतोच. भारताचा विचार करता, मिल्खा सिंग जसा धावण्याच्या शर्यतीत आपल्याला आवडतो, तशी वनवासी पाड्यातून आलेली आपली कविता राऊतही आपल्या आवडीची. शहरी असो अथवा ग्रामीण भागातील जनता विविध कारणांसाठी रोज धावतच असते. डोळ्यांसमोर चुकणारी ‘एसटी’ असो वा लोकल पकडायची असेल, तर भरभर चालता अथवा पळता येणे फार गरजेचे.
 
आपण सारेच वारीची चर्चा नेहमीच करतो. समाजातील सर्व स्तरांमधील लोक सवडीनुसार यात सहभागी होतात. गुरुवार, दि. २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती होती. समाजाला गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकत्र आणण्यात मोलाची कामगिरी करणार्‍या लोकमान्यांचा, पंढरीच्या वारीशी आणि वारकरी संप्रदायाशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध. अध्यात्माचा उपयोग समाजप्रबोधन आणि लोकसंग्रहासाठी व्हावा, याच विचारातून टिळकांनी वारीच्या परंपरेकडेही पाहिले. लोकमान्य टिळक देहू-आळंदीच्या पालखीत, स्वतः पायी चालत सहभागी होत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दि. २२ जुलै रोजी वाढदिवस होता, तेव्हा त्याचेच औचित्य साधून तेदेखील काही काळ वारीत सहभागी झाले. वारीत चालण्याची संधी मिळणे, तसेच संत पादुकांचे दर्शन घेता येणे, हेच भाग्याचे. एवढेच नव्हे, तर पुण्यातील एफसी रोडवरील ‘जेन-झी’ जनताही दिवे घाटापर्यंत वारीत चालून आली.
 
वारी ही ज्ञानेश्वरांच्या अगोदरही होती, किंबहुना हा विठ्ठलाच्या उपासनेचा संप्रदाय हा विठ्ठलाएवढाच पुरातन आहे. फक्त ज्ञानेश्वरांनी या उपासना संप्रदायाला एक वेगळ्या प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त करून दिले, तर तुकाराम महाराज हे त्याचे कळस झाल्याचे मत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी मांडले आहे. पुरातन काळापासून चालत आलेली अशी ही ‘वारी’ आपण यावर्षीही अनुभवली. ‘बालपण ही जीवनाची सकाळ, तेथे खेळांचा सुकाळ’ असं म्हटलं जातं; तो सुकाळ हा तुकाराम महाराजांनीही अनुभवला. कारण, त्यांच्या अनेक अभंगांत खेळांतील काही कल्पना आहेत. ‘हुतूतू’, ‘हमामा’ हे शब्दही त्यात येतात. यावरूनच आपण असं म्हणू शकतो की, तुकाराम महाराज हे चांगले खेळाडू असले पाहिजेत आणि प्रकृतीनेसुद्धा निकोप असले पाहिजेत.
 
तुकोबांची अभंगगाथा ज्या देहू परिसरात लिहिली, त्या परिसरातील भंडारा डोंगर म्हणजे तुकोबांचे साधनास्थान. आजही या डोंगरावर ती गुहा आहे, जेथे तुकोबा ध्यानधारणा आणि चिंतन करीत. अध्यात्मात रुची घेणार्‍यांबरोबरच, गिरीप्रेमी, पर्यटकांनीही भेट द्यावी, असे ते स्थान आहे. पंढरपूरचा विटेवरचा विठ्ठल हा नंतरचा आहे. तुकोबांना दिसणारा विठ्ठल हा निराकार होता. विठ्ठलाचे असे स्वरुप जाणणारे तुकाराम महाराज, एक साक्षात्कारी योगीपुरुष म्हणूनच आपल्याला ज्ञात आहेत.
 
पंढरीच्या यात्रेत रिंगण, धावा अशा परंपरेचे खास महत्त्व आहे. एकदा तुकाराम महाराज वारीत वेळापूर येथे थांबले. तेव्हा वेळापूरच्या टेकडीवरून त्यांना पंढरीच्या मंदिराचा कळसाचे दर्शन झाले. त्या क्षणी पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्यांना सहन झाली नाही, म्हणून ते वेळापूरातील तोंडले-बोंडले मार्गे पंढरपूरपर्यंत धावत गेले. त्यांचे हे धावणेहे केवळ विठ्ठल भेटीपोटी केले. आजही ती परंपरा ‘धावा’ म्हणून सुरू आहे. याच भावनेतून ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ हा अभंग पूर्ण झाल्यावर, वेळापूर ते तोंडले-बोंडलेदरम्यानच्या उतारावरून वारकरी विठ्ठल भेटीच्या तीव्र ओढीने धावतात. एरव्ही पळायला होत नसलं, तरी तो ‘धावा’ अगदी वयस्क वारकरीही चुकवत नाहीत. ते हळूहळू का होईना, पण मनापासून धावतात; जणू काही ते मॅरेथॉनपटू झाले आहेत!
आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि देहूहून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी, तोंडले-बोंडले परिसरात एकमेकींना मिळते. त्यानंतर हे दोन्ही पालखी सोहळे एकत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. हा ‘धावा’ म्हणजे पंढरपूरची तीव्र ओढ असते. नेहमीच्यातील ऑलिम्पियन धावपटूंचे कठोर शारीरिक प्रशिक्षण आणि पंढरपूरच्या वारीत धावणारे वारकरी, यांच्यात ‘शारीरिक तग धरण्याची क्षमता’ आणि ‘मानसिक कणखरपणा’ या समान गोष्टी आहेत. आधुनिक धावपटू जिद्दीने अंतर कापतात, तर वारकरी भक्तीच्या बळावर वारी सहज पूर्ण करतात. ऑलिम्पिक व तत्सम मॅरेथॉन धावक वेळेचे नियोजन, डायट आणि आधुनिक बुटांचा वापर करतात. तर पंढरीचे वारकरी हे ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांच्या नामाचा गजर करत आणि टाळ-मृदंगाच्या तालावर कोणतीही साधने नसतानाही वारी पूर्ण करतात. ऑलिम्पिक धावक हे साधारणपणे पूर्ण किंवा अर्ध मॅरेथॉन ठरावीक मीटर धावत किंवा जलद चालत एकाच दिवसात पूर्ण करतात, तर वारकरी कित्येक किमीचे अंतर चालून या धावण्यात सहभागी होतात. या दोन्ही प्रकारच्या धावणार्‍यांना अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तीव्र इच्छाशक्तीची गरज असते. वारकर्‍यांची विठ्ठल भेटीची ओढच, त्यांना शारीरिक वेदना विसरायला मदत करते.
 
देहू-आळंदी येथून निघून पंढरपूरपर्यंत जाताना वाटेत, वारकरी नानाविध खेळ खेळतात. अनेक खेळांत ते उड्या मारत नामघोष करतात. त्यांच्या त्या उड्यांमध्ये मुख्यतः एक अथवा दोन्ही पायांच्या उड्यांचा समावेश असतो. त्यासाठी पायातील मांड्यांच्या, पिंढर्‍यांच्या स्नायूंचा उपयोग होतो व नकळत त्यांचा व्यायामही होतो. पंढरीच्या वारीत मुख्य रिंगण सोहळा संपल्यानंतर वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर एकत्रितपणे हवेत उड्या मारत, आनंद व्यक्त करतात. त्यात तालबद्ध भजन, फुगड्या आणि एकत्रित उड्यांचाही समावेश असतो. रिंगण पूर्ण झाल्यावर विविध दिंड्यांचे वारकरी, टाळकरी, वीणेकरी आणि पखवाजवादक पालखीजवळ गोल वर्तुळ किंवा समोरासमोर येत, एका लयीत पखवाज व टाळांच्या ठेयावर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ किंवा ‘विठ्ठल विठ्ठल’ असा अखंड नामघोष करतात. भजनाचा ठेका जसा तीव्र होतो, तसे सर्व वारकरी तल्लीन होऊन हवेत उड्या मारत फेर धरतात. थकवा विसरून पावसात किंवा चिखलातही हा खेळ आनंदाने खेळला जातो.
 
ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत धावायचे असेल, तर खेळाडूंना पात्रता प्रक्रिया पार कराव्या लागतात. पण आमच्यात अशी काही बंधने नाहीत. कोणीपण यावे आणि ‘धावा’वे! आमचे सगळेच धावक विजेते असतात, कारण त्यांच्यात स्पर्धाच नसते! आषाढी वारीत सहभागी होणारे वारकरी, हे पंढरपूर वारीतील ‘धावा’ हा पालखी सोहळ्यासाठी पात्रच असतात. यात दिंडी क्रमांकानुसार दिंड्या धावतात. ज्या वारकर्‍यांना अधिकृत असा दिंडी क्रमांक वगैरे नसतो, असेही सगळे हौशी त्यात धावू शकतात.

अश्व धावे अश्वामागे| वैष्णव उभे रिंगणी|
टाळ, मृदुंगा संग| गेले रिंगण रंगुनी॥
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीने लावलेली शिस्तबद्ध रांग, अश्वांची दौड, वारकर्‍यांच्या पायांनी धरलेला ठेका, टाळ-मृदंगांच्या गजरात रंगलेल्या फुगड्या अन् पालखी सोहळ्यातील उभ्या रिंगणाचा सोहळा, तर दुसर्‍या ठिकाणी पालखीभोवती सुमारे १०० मेंढ्यांनी वेगाने गोल फेरी मारून एक अनोखं रिंगण साकारलं जातं. त्यांच्या मागोमाग भगव्या पताका घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन महिला, विणेकरी, टाळकरी, पखवाजवादक आणि दिंड्यांमधील वारकरी धावत सहभागी होतात. कर्नाटकहून आलेले सुमारे चार हजार सायकलपटू वारकरीही, परंपरेप्रमाणे सायकलवरून हरिनामाच्या जयघोषात रिंगण सोहळ्यात सहभागी होतात. तेवढ्यासाठी त्यांना ‘सायकल ऑन संडे’ची गरज नसते. या सायकल दिंडीकरांनी सायकल चालविणे हा आरोग्यदायी, पर्यावरणपूरक व किफायतशीर वाहतुकीचा पर्याय असल्याचेच, समाजापुढे वारीच्या माध्यमातून दाखवून देतात. नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते, असा संदेश ते यावेळी देतात. सायकलस्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळते.
 
आपल्याकडे सर्वसाधारणपणे मंगळागौरीचा कार्यक्रम असतो, तेव्हा ‘फुगडी’ची चर्चा रंगते. मग काही ठिकाणी महिला मंडळांना खास निमंत्रित केले जाते. पण वारकर्‍यांना फुगडीचा ‘डेमो’ वगैरे द्यावा लागत नाही, महिलाच नव्हे, तर पुरुष वारकरीपण फुगड्या खेळतात. त्यांच्या फुगड्या पाहिल्या की, आज-कालच्यांना दंड फुगडी, बस फुगडी, जाते फुगडी, नाल्या, भुई फुगडी, कासव फुगडी, लोळण फुगडी असे काय काय प्रकार असतात ते समजते. एकमेकांचा तोल सांभाळत फुगडी खेळणे हे सोप्पं आहे की कठीण हेअनुभवल्यावरच कळणार.
 
फु फु फु फु फुगडी ये| दोघी घालू झगडी गे|
विटेवरील पाऊल येऊ गे| राही माझ्या हृदयी गे|
जेथे वैष्णवांचा भार गे| तेथे घालीन फुगडी गे|
 
हे संत एकनाथांचे भारुड आपल्याला विठ्ठलभक्ती, भागवत धर्म आणि संतसंगतीचे महत्त्व सांगते. याच खेळाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधन केले आहे. वारीतील खेळ पाहिले की, लक्षात येते की वारीतले खेळ म्हणजे करमणूक नाही, एकमेकांशी केलेली स्पर्धा नाही, तर ती भक्ती, समता आणि शारीरिक-मानसिक ऊर्जेची एक उपासनाच आहे. ऑलिम्पिकला न जाता, वारी करणारे हे ‘मॅरेथॉन रनर’ एक प्रकारचे ऑलिम्पियनच नाहीत का!

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४




संबंधित मजकूर