
मुंबई, दि. २७ : प्रतिनिधी
देशाच्या समृद्धीचा संबंध दर दहा लाख लोकसंख्येमागील पीएच.डी.धारकांच्या संख्येशी जोडला जाऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मविभूषण प्रा. एम. एम. शर्मा यांनी केले. एसव्हीकेएमच्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) ने पीएच.डी. बॅच २०२६ चे उद्घाटन करत विविध १३ विषयांतील नव्या संशोधकांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला भारतातील अग्रगण्य रासायनिक अभियंते, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी) चे माजी संचालक आणि रॉयल सोसायटी (लंडन) चे फेलो म्हणून निवडले गेलेले पहिले भारतीय अभियंता पद्मविभूषण प्रा. मनमोहन शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी एनएमआयएमएसचे प्रोव्होस्ट (प्रशासन) डॉ. शरद म्हैसकर, प्रो-व्हाइस चान्सलर डॉ. अभिषेक रंजन, कुलसचिव डॉ. तन्मय चक्रवर्ती, तसेच स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (रिसर्च, इनोव्हेशन अँड फॅकल्टी डेव्हलपमेंट) चे डीन डॉ. मयंक जोशीपुरा यांच्यासह विविध विभागांचे डीन, प्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक आणि नव्याने प्रवेश घेतलेले संशोधक उपस्थित होते.
पीएच.डी. बॅच २०२६ मध्ये व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, डेटा सायन्स, विज्ञान, फिजिओथेरपी, गणित, सांख्यिकी, वाणिज्य, अर्थशास्त्र, विधी, आर्किटेक्चर आणि लिबरल आर्ट्स या १३ शाखांतील संशोधकांचा समावेश असून, संशोधन आणि नवोन्मेषासाठी एनएमआयएमएसच्या बहुविषयक दृष्टिकोनाचे ते प्रतीक आहे.
नव्या संशोधकांना मार्गदर्शन करताना प्रा. शर्मा म्हणाले, की, "एखाद्या देशाची समृद्धी दर दहा लाख लोकसंख्येमागील पीएच. डी. धारकांच्या संख्येशी जोडली जाऊ शकते. संशोधनासाठी आवड, संयम आणि परिश्रम आवश्यक आहेत. अपयशाला घाबरू नका, कारण अपयश हे यशाचे पायाभूत पाऊल असते. शोधांशिवाय नवोन्मेष शक्य नाही. उत्कृष्ट कल्पना या सुविधा-संपन्नतेपेक्षा अधिक महत्त्वाच्या असतात. संशोधन संस्कृती मजबूत करण्यासाठी आणि डॉक्टरेट शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एनएमआयएमएस करत असलेल्या प्रयत्नांचे मी अभिनंदन करतो. संपूर्ण समर्पणाने कठोर परिश्रम करा आणि जीवनाचा आनंदही घ्या."
एनएमआयएमएसचे प्रोव्होस्ट (प्रशासन) डॉ. शरद म्हैसकर म्हणाले, "पीएच.डी. म्हणजे केवळ ज्ञान ग्रहण करण्यापासून ज्ञाननिर्मितीकडे जाण्याचा प्रवास आहे. आपण निर्माण केलेले ज्ञान व्यापक समाजहितासाठी पोहोचले पाहिजे. संशोधन हे केवळ शैक्षणिक मर्यादेत न राहता उद्योग, समाज आणि पर्यावरणासमोरील आव्हानांवर उपाय शोधणारे असावे."