कोस्टल रोडवरील नेपियन सी रोड वाहतूक अभ्यासासाठी सल्लागार; निविदेशिवाय नियुक्तीला स्थायी समितीकडून कार्योत्तर मंजुरीची मागणी

    27-Jul-2026
Mumbai Coastal Road
 
मुंबई : (Mumbai Coastal Road) कोस्टल रोडच्या डी विभागातील नेपियन सी रोड येथील प्रवेश आणि निर्गमन मार्गांवरील वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेने ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून, या नियुक्तीसाठी सार्वजनिक निविदा न काढता केलेल्या निर्णयाला स्थायी समितीकडून कार्योत्तर मंजुरी मागण्यात आली आहे. या कामासाठी मे. फिलीप इन्फ्रा कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. यांची रु. ९.९० लाख (जीएसटी वगळून) दराने नियुक्ती करण्यात आली आहे.
 
महापालिकेच्या प्रस्तावानुसार, नेपियन सी रोड येथील कोस्टल रोडच्या प्रवेश व निर्गमन ठिकाणी वाहतुकीचे वैज्ञानिक विश्लेषण करणे अत्यावश्यक होते. मात्र, ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडीसाठी महापालिकेकडे मान्यताप्राप्त सल्लागारांची यादी उपलब्ध नव्हती. तसेच या प्रकारच्या कामाचा समावेश युनिफाइड शेड्यूल ऑफ रेट्स (यूएसओआर)मध्येही नसल्याने खुल्या बाजारातून सल्लागारांकडून दरपत्रके मागविण्यात आली. (Mumbai Coastal Road)
 
या प्रक्रियेत मे. फिलीप इन्फ्रा कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी रु. ९.९० लाखांचा सर्वात कमी दर दिला. तर मे. आर. जी. कन्सल्टंट्स अँड डेव्हलपर्स यांनी रु. १०.९८ लाख आणि मे. कास्टा इंजिनिअर्स प्रा. लि. यांनी रु. ११.२० लाखांचा दर सादर केला होता. सर्वात कमी दर आणि कामाची तातडी लक्षात घेऊन संबंधित कंपनीला काम देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली. (Mumbai Coastal Road)
 
महापालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे की, वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हे काम अत्यंत तातडीचे असल्याने सल्लागाराने ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी पूर्णही केली आहे. त्यामुळे आता या नियुक्तीसाठी कार्योत्तर मंजुरी मागण्यात आली आहे. (Mumbai Coastal Road)
 
या कामाचा खर्च २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील उपप्रमुख अभियंता (वाहतूक) यांच्या तरतुदीतून करण्यात येणार आहे. अद्ययावत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ७२(१) नुसार रु. ३ लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांसाठी सार्वजनिक निविदा आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात कामाची निकड लक्षात घेऊन निविदा प्रक्रिया शिथिल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यासाठी कलम ७२(३) अन्वये स्थायी समितीची कार्योत्तर मंजुरी मागण्यात आली आहे. (Mumbai Coastal Road)
 
 




संबंधित मजकूर