सौदर्य कांदळ फुलांचे

    27-Jul-2026
 
 
Mangrove Flowers
 
माणूस जन्मतःच सौंदर्याचा उपासक आहे. निसर्गातील हिरवीगार झाडे, फुलांचा सुगंध, पक्ष्यांचे मधुर किलबिलाट, समुद्राच्या लाटा किंवा सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य यांमधून त्याला आनंद, शांतता आणि प्रेरणा मिळते. अशाच सौंदर्याची उधळण भारतातील कांदळवनातील फुलेदेखील करीत असतात. अशाच कांदळ फुलांबद्दल आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत...
 
भारतातील कांदळवनामध्ये ऋतुनिहाय कांदळ फुलांचा फुलोरा फुलतो. महाराष्ट्रातील तीवर (Avicenia officinalis) या वनस्पतीचे सौंदर्य पिवळ्या फुलांच्या बरोबरीने अधोरेखित होते. पिवळ्या किंवा फिकट केशरी रंगाची हलकीशी छटा फुलाच्या मधोमध दिसते. यात चौकोनामध्ये चार पुंकेसर उठून दिसतात. किंचित केसाळलेली ही फुलें कुबट वासाची जरी असली, तरी तीन ते सात फुलांच्या गुच्छात ती वेगळी ठरतात. एप्रिल मे महिन्यात ती फुलू लागतात. याउलट, पांढर्‍या चिपीची (Sonneratia alba) वेगळी ओळख तिच्या चार ते सहा सेमी व्यासाच्या वेगळ्या फुलांमुळे होते. पांढर्‍या रंगाच्या असंख्य लांब पुंकेसरांमुळे वनस्पतीला आकर्षण प्राप्त होते. जाडसर हिरव्या संदलावर (sepals) उभारलेली ही घुमट चार ते सहा खंडात बनलेली असते. आतील बाजू लालसर असून, फुले संध्याकाळच्या वेळीच फुलत असतात. परिणामी, यावर आधारलेले वटवाघळे, पतंग फुलांच्या उग्र वासाने त्यांच्याकडे धाव घेतात. परागीभवनाची क्रिया याच पाहुण्यांमुळे अधिक सोपी होते. ‘कांदळ’ म्हणजेच (Rhizophora mucronata) या वृक्षाची फुले साधी असली, तरी त्यांची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक आहे. पिवळसर-पांढर्‍या रंगाची, उभयलिंगी फुले पानांच्या बगलेत येणार्‍या दोन ते चार फुलांच्या द्विशाखीय किंवा त्रिशाखीय पुष्पगुच्छांमध्ये उमलतात. हे पुष्पगुच्छ लांब, गुळगुळीत व खाली लोंबणार्‍या पुष्पदंडावर असल्यामुळे फुले झाडावर अतिशय देखणी दिसतात. प्रत्येक फुलाच्या तळाशी लहान वाटीसारखी उपपर्णे असतात. चार जाड, मांसल आणि गुळगुळीत संदले फुलाला भक्कम आधार देतात, तर चार पांढर्‍या, भाल्यासारख्या पाकळ्यांच्या कडांवर असलेले सूक्ष्म पांढरे केस हे या फुलाचे महत्त्वाचे ओळखवैशिष्ट्य आहे. फुलामध्ये आठ स्वतंत्र केसरदले असून त्यांचे परागकोश (Anthers) तळाशी जोडलेले असतात. मध्यभागी असलेला शंकूसारखा किंजपुट अर्ध-अधःस्थ असून तो पुष्पकोशाशी संलग्न असतो. प्रत्येक कप्प्यात दोन बीजके असतात आणि द्विखंडी कुक्षी (Stigma) हे या फुलाच्या प्रजोत्पादन रचनेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
 
कांदळवनात आढळणार्‍या किरपा (Lumnitzera recemosa) या वृक्षाची फुले आकाराने लहान, पांढरी आणि अत्यंत नाजूक असतात. उभयलिंगी, देठविरहित (Stalkles) फुले पानांच्या बगलेत दोन ते सात सेंमी लांबीच्या घोसांमध्ये (Axillary clusters) उमलतात. फुलांना मंद, आल्हाददायक सुगंध असला, तरी त्यामध्ये मुबलक प्रमाणात मध (Nectar) असल्यामुळे मधमाश्या, फुलपाखरे आणि इतर परागीभवन करणारे कीटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. प्रत्येक फुलामध्ये पाच पांढर्‍या लंबगोलाकार पाकळ्या असतात. पुष्पकोश (Calyx)चा नळीसारखा भाग चपट्या आकाराचा, टिकाऊ (Persistent) असून त्याच्या तळाशी दोन रुंद अंडाकृती उपपर्णे (Bracteoles) असतात. पुष्पकोशाची खंडे (alyx lobes) रुंद अंडाकृती असून त्यांच्या टोकावर काही वेळा सूक्ष्म ग्रंथी (Glands) दिसून येतात. फुलामध्ये दहा केसरदले (Stamens) असून ती पाकळ्यांएवढी किंवा किंचित बाहेर आलेली असतात. पांढर्‍या शुभ्र पाकळ्या, मध आणि नाजूक रचना यांमुळे किरप्याची फुले कांदळवनातील साधेपणातही मोहक सौंदर्याची अनुभूती देतात.
 
अशीच फुलांची वैशिष्ट्ये घेऊन कुरुड (Aegiceras corniculatum)
 
या वनस्पतीचा फुलोरा फांद्यांच्या टोकावर जन्म घेतो. फुले पाच ते २५ फुलांच्या छत्राकृती पुष्पगुच्छांमध्ये एकत्र उमलतात, त्यामुळे फुलोरा अत्यंत आकर्षक दिसतो. ही पांढुरकी, सुगंधी फुले कळीच्या अवस्थेत शंकूसारखी दिसतात. निदलपुंज सुमारे पाच ते सात मिमी लांब व दोन ते तीन मिमी रुंद असून त्याची निदले आच्छादित (Imbricate) असतात. पाकळ्यांचा तळभाग जाडसर असून त्यावर तळापासून मध्यभागापर्यंत अतिशय सूक्ष्म काळे ठिपके दिसून येतात. पाकळ्या पांढर्‍या रंगात भिजून एकत्र आल्यासारख्या वाटतात. यांच्या आतमध्ये नलिकेच्या आतील बाजूस, विशेषतः मुखाजवळ, दाट सूक्ष्म केस असतात. पाकळ्या त्रिकोणी आकाराच्या असून त्यांची लांबी आठ ते १२ मिमी आणि रुंदी पाच ते सात मिमी असते. सफेद रंगाच्या या जाणिवा पुसून टाकण्यासाठी कांदळवनाच्या सुरुवातीलाच मारंडी (Acanthus ilicifolius)ची झुडपे फिकट जांभळ्या रंगाची वलये निर्माण करतात. साधारण दिवाळीदरम्यान वनस्पती निळसर किंवा जांभळटरंगी मंजिर्‍यांतून फुलून येते. यातील फुलाचा खालचा ओठ (Labium) हा त्रिखंडी असतो, हे या फुलाचे वैशिष्ट्य आहे. याहून वेगळी रचना हुरी (Exocaria agalocha) मध्ये पाहायला मिळते. नर फुले देठरहित दोन खंडांत विभागलेली आणि पिवळ्या रंगाची असतात. याच्या तुलनेत मादी फुले गुच्छागुच्छांमध्ये फुलून येतात. सकाळी सहा ते नऊ या वेळातच ती फुललेली दिसतात. नर फूल फुलल्यांनंतर अर्धा तासात परागकण बाहेर फेकते.हवेच्या माध्यमातून होणारे परागीभवन जेव्हा शक्य नसते, तेव्हा नर फुलातला मकरंद शोधत येणारे कीटक परागीभवनाची क्रिया सोपी करतात. यात मधमाश्या फुलपाखरांची महत्त्वाची भूमिका असते. कांदळवनात या वनस्पतीखेरीज आणखी काही सहयोगी वनस्पती दाटीवाटीने फुलून येतात. यात सागरगोटे (Ceasalpinia crista)ची पिवळी फुले सुगंधाने लक्ष वेधून घेतात. लांब मंजिरीमध्ये केसदलाच्या पिवळसर पंखात सफेद मऊ केसांचा झुपका आपल्याला खुणावतो. मात्र, काटेरी खोडामुळे वनस्पतीकडे जाणं नकोसं वाटतं. अशाच स्वरूपात झुडपाझुडपांतून कडुमेहंदी (olkameria inermis) पांढर्‍या फुलांची जादू दाखवते; मात्र याचा पुंकेसर लाल रंगाचा असतो. कांदळ फुलांची ही रेलचेल वर्षभर सुरूच असते. वनस्पतीअनुरूप फुलोर्‍याचा काळ बदलतो. बर्‍याच वेळा पावसाच्या परिणामामुळे हे घडतं. मात्र, हा कांदळवनातला फुलोरा अनुभवायला मिळणं प्रत्येकाच्याच नशिबी नसतं. यासाठी कांदळवन राखणं आणि त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे.

परेश गुरव
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभागात साहा. प्राध्यपक म्हणून कार्यरत आहेत.)
७४४७३७६९९७




संबंधित मजकूर