बाळाचे पाय पाळण्यातच...

    27-Jul-2026
 
 
Lamine Yamal
 
‘ये आर्ट हैं ना भाई, ये किसी की बपौती नहीं हैं| ये तो बस बहती हुई गंगा हैं, जो एक से दूसरे तक पहुँचती हैं|’ २०१९ सालच्या ‘गल्ली बॉय’ चित्रपटातील हा संवाद, ‘सॉकर’ नावाचा खेळ तब्बल शतकभर जगतोय. नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉलच्या रणसंग्रामातही, हाच संवाद पुन्हा एकदा जिवंत झाला. यंदा त्याचा केंद्रबिंदू होता, स्पेनचा लामिन यमाल!
 
अर्लिंग हालांड, व्हर्जिल व्हान डाएक, रोमेलु लुकाकू असे आडदांड अन् क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, लुका मॉड्रिच अशा दिग्गज खेळाडूंचे वलय भेदत, लामिन यमालने स्पेनच्या माथी ‘फिफा’ विश्वचषक विजयाची न पुसणारी रेष ओढली. दि. १९ जुलै रोजी ती सत्यात उतरली आणि स्पेनने दुसर्‍यांदा विश्वचषकाचे कडकडून चुंबन घेतले. स्पर्धेत आपल्या खेळाने प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवणारा यमाल, यंदा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. त्याचे ‘ड्रीबलिंग’ कौशल्य अवाक् करणारेच होते.
 
लामिन यमालचे वय कितीसे हो? अवघे १९ वर्षे! वजनही तसे जेमतेमच. स्टाईल मात्र न्यारी! आणि एखाद्या हॉलीवूडच्या अभिनेत्याच्या तोडीचा तो स्वॅग! आपल्या अवतीभोवतीच्या मुलांशी तुलना केल्यास, त्याच्या वयाची पोरं चौपाटीवर पाणीपुरी खाताना, मित्रमैत्रिणींबरोबर खिदळताना आणि एखाद्या थिएटरमध्ये चित्रपटाचा आनंद घेताना दिसतील. याच वयात, यमाल मात्र त्यांच्यासाठी आदर्श झाला आहे.
 
फुटबॉल हेच त्याचे सर्वस्व. चेंडूवरील पकड, खेळाची समज आणि संयम यांतूनच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. २०२४ मधील युरो कप आणि २०२६ मधील ‘फिफा’ विश्वचषक हे दोन्ही किताब जिंकणारा, फुटबॉलच्या इतिहासातील तो सर्वांत तरुण खेळाडू ठरला. पेले आणि ज्युसेप्पे बर्गोमी यांच्यानंतर विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकणारा यमाल, हा इतिहासातील तिसरा सर्वांत तरुण खेळाडू. त्याची शैली अत्यंत दुर्मीळ आणि प्रभावी मानली जाते. वेगाबरोबर चेंडूवर त्याचे अप्रतिम नियंत्रण आहे. अगदी कमी जागेतही, प्रतिस्पर्धी संघाच्या बचावपटूंना चकवण्याची क्षमता तो ठेवतो. पायांची वेगवान हालचाल करून, बचावपटूंना हुलकावणी देण्यात तर त्याचा हातखंडा. यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक यशस्वी ‘ड्रिबल्स’ त्याच्याच नावे आहेत. आक्रमकतेसह सहकार्‍यांची जागाही अचूक ओळखत, ‘असिस्ट’लाही तो तेवढेच प्राधान्य देतो.
 
तसा यमाल स्थलांतरीत कुटुंबातलाच मुलगा. चांगल्या जगण्याच्या शोधात, त्याचे वडील मोरक्कोतून स्पेनमध्ये आले. आईदेखील इक्वेटोरियल गिनी या आफ्रिकेतील छोट्या देशातून स्थलांतरीत झाली. त्यामुळे त्याच्या खेळात या दोन्ही देशांच्या वेगळेपणाचा संगम दिसतो. मोरक्कोप्रमाणेच त्यानेही फुटबॉलला धर्म मानले. त्या सोबतीला इक्वेटोरियल गिनीचा चिवटपणाही त्याच्या रगारगांत भिनला. स्पेनच्या ‘टिकीटाका’ (फुटबॉल खेळाची अद्भुत शैली) याची धार, त्याच्या खेळात उतरली आणि एक विलक्षण रसायन जगाला अनुभवायला मिळाले. सौदी अरेबियाविरुद्ध त्याने चपळता दाखवली; ऑस्ट्रियाविरुद्ध तो आक्रमक झाला; बेल्जियमविरुद्ध तो आपल्या सहकार्‍यांचा सारथी झाला, तर फ्रान्सशी दोन हात करताना त्याने त्याचे प्रमुख अस्त्र बाहेर काढले! ‘ड्रीबलिंग’ने त्याने प्रतिस्पर्ध्यांचा तगडा बचाव भेदला. अंतिम सामन्यात त्याने अप्रतिम ‘पासेस’ दिले. त्याचे धाडस कौतुकास पात्र ठरले. तीन ते चार बचावपटूंच्या गराड्यातही तो निर्भीडपणे घुसला व त्यांना चकवलेही. ‘फेविकॉल’प्रमाणे चेंडू पायाला चिकटून ठेवण्याची त्याची शैली, निव्वळ अप्रतिमच!
 
फुटबॉलच्या महासंग्रामात तो मॅसेडोनियाचा राजा ‘अलेझांडर द ग्रेट’ (सिकंदर)सारख्या, युवा योद्ध्याप्रमाणे लढला आणि जिंकलाही! लढाईची मैदाने जरी विभिन्न असली, तरी सिकंदरसारखीच अफाट विद्वत्ता, धाडस यमालच्या खेळात दिसते. ‘फिफा’ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी प्रसारमाध्यमांवर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो होता, ‘द ग्रेट लिओनेल मेस्सी’ आणि इवलासा यमाल यांचा! वर्ष होते २००७. हा फोटो कमालीचा बोलका होता. अवघ्या काही महिन्यांच्या यमालला मेस्सीने लाडाने आपल्या छातीजवळ घेतले होते. कदाचित फुटबॉलचे एक महान पर्व एकाकडून दुसर्‍याकडे जात तर नव्हते? मेस्सीला भविष्यातील दिग्गज खेळाडूचे पाय तेव्हाच पाळण्यात दिसले होते? आज तब्बल १९ वर्षांनंतर, त्याचाच प्रत्यय ‘फिफा’ विश्वचषकानिमित्ताने आला असावा.
 
- रोहित गुरव 




संबंधित मजकूर