भारताची विकास यात्रा रोखण्यासाठी देशाच्या नव्या पिढीची विचारसरणी बाधित करण्याचा कुटिल डाव देशातील आणि देशाबाहेरचे शत्रू करत आहेत. एकीकडे त्यांचे हे कार्य सुरू असतानाच, भारतीय तरुण मात्र विविध क्षेत्रांत तिरंगा उंचावत यश साजरे करत आहेत. त्यामुळेच, आजच्या ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’ने आदर्श घेण्यासाठी काही यशोगाथांचा मागोवा घेणारा हा लेख...
रतीय ‘जनरेशन-झी’, स्टार्टअप्स, उद्योग, ‘इस्रो’, ‘डीआरडीओ’ आणि विविध खेळांमधील प्रगती, तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, संशोधन आणि नवोपक्रमातील अलीकडील कामगिरीचे अवलोकन केल्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटतो. आज जग आपल्या यशाकडे पाहात आहे. आपल्या व्यावसायिकांनी, विशेषतः तरुणांची प्रगती, जागतिक समुदायाचा दृष्टिकोन बदलत आहे. आत्मनिर्भरतेला प्राधान्य देत, भारत आता प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. चला, यांपैकी काही अलीकडील कामगिरींवर एक नजर टाकूया.
राष्ट्र उभारणीसाठी अलीकडील रचनात्मक कार्येअंतराळ मोहीम: ‘स्कायरूट एरोस्पेस’च्या ‘विक्रम-१’ रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, भारतीय अंतराळ संशोधकांनी देशाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे स्वागत केले. पहिल्याच प्रयत्नात अंतराळात पोहोचणारे, हे पहिले खासगी क्षेत्राद्वारा विकसित केलेले रॉकेट ठरले. हा टप्पा भारताच्या विस्तारत असलेल्या खासगी अंतराळ क्षेत्राची, एक महत्त्वपूर्ण झेप दर्शवतो. तसेच, देशाच्या अंतराळ महत्त्वाकांक्षेत खासगी क्षेत्राची वाढती भूमिकाही अधोरेखित करतो. ‘विक्रम-१’ हे केवळ २८ वर्षे सरासरी वय असलेल्या एका तरुण अभियांत्रिकी संघाने विकसित केले असून, यानाचे वजन कमी करून त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी यात अत्याधुनिक कार्बन कंपोझिट तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे, भारत खासगी अंतराळ क्षेत्रात एक प्रमुख जागतिक खेळाडू म्हणून पुढे येण्याची अपेक्षा आहे.
भारतीय रेल्वे : एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून विकसित हा उपक्रम, भारतीय रेल्वेची नवोन्मेषाप्रतिची निष्ठा दर्शवतो आणि ऊर्जा कार्यक्षमता व शाश्वत वाहतूकीला प्रोत्साहन देतो. हायड्रोजन ट्रेनची रचना आणि तपशीलाला ’आरडीएसओ’ने मान्यता दिली असून, हा उपक्रम ‘आत्मनिर्भर भारत’मागील दूरदृष्टीचे प्रतीक आहे.
दुर्मीळ खनिजे : भारत विद्युत गतिशीलतेकडे वेगाने वाटचाल करत असताना, विद्युत वाहन क्षेत्रापुढील एक मोठे आव्हान म्हणजे दुर्मीळ खनिजांवरील अवलंबित्व. याची आयात प्रामुख्याने चीनमधून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया होते. बंगळुरुस्थित डीप-टेक फर्म ‘विमाग लॅब्स’ने, यावर एक अभूतपूर्व उपाय शोधल्याचा दावा केला आहे. त्यांच्या ‘व्हर्च्युअल मॅग्नेट’ या शोधाद्वारे केवळ तांबे आणि स्टीलच्या वापरातून मोटर्स उत्पादन शक्य असून, ज्यामुळे दुमिळ खनिजाची गरज पूर्णपणे नाहीशी होते. ‘विमाग लॅब्स’ने अलीकडेच एका इलेट्रिक मोटरसाठी आपले पाचवे भारतीय पेटंट मिळवले असून, जी दुर्लभ-मृदा चुंबकांशिवाय चालते. तसेच चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी सॉफ्टवेअर व पॉवर इलेट्रॉनिसचा वापर करते. पाच दशलक्ष डॉलर्सचे मूल्य असलेली ही छोटी कंपनी, ‘टेस्ला’ आणि ‘जीएम’सारख्या मोठ्या वाहन उत्पादकांना अनेक वर्षांपासून गोंधळात टाकणार्या एका समस्येवर काम करत आहे. चिनी संसाधनांवर अवलंबून न राहता, एक स्पर्धात्मक ‘ईव्ही’ मोटर कशी तयार करावी, यावर तिचे संशोधन आहे.
अणुऊर्जा : अणुऊर्जेच्या क्षेत्रात, भारत एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहोचला आहे. तामिळनाडूतील कल्पक्कम येथील ‘प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिटर’ने (PFBR) दि. ६ एप्रिल रोजी आपली पहिली क्रिटिकॅलिटी (Criticality) गाठली. हे एका शाश्वत अणुसाखळी प्रतिक्रियेच्या प्रारंभाचेच द्योतक असून, भारताच्या अणुकार्यक्रमाचे संस्थापक डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी मूळतः संकल्पित केलेल्या, भारताच्या तीन टप्प्यांच्या अणुऊर्जा उपक्रमाच्या दुसर्या टप्प्यात आपण प्रवेश केला आहे. या यशाचे काही जागतिक परिणाम आहेत. रशियानंतर व्यावसायिक फास्ट ब्रीडर रिटर चालवणारा भारत हा दुसरा देश होणार आहे. ही घडामोड अणुऊर्जा विभागाच्या अनेक दशकांच्या कार्याचे फलित असून, स्वच्छ ऊर्जा उपायांप्रति भारताची वचनबद्धता याने अधोरेखित होते. या यशामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यानुसार, २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याच्या अधिक जवळ आपण पोहोचलो आहोत.
महामार्ग पायाभूत सुविधा : याव्यतिरिक्त, भारत मल्टी-लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली सुरू करून, आपल्या महामार्ग पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ करत आहे. ही प्रणाली सुलभ प्रवास, प्रदूषण कमी करणे, प्रवास खर्च कमी करणे आणि देशभरात कार्यात्मक उत्पादकता वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. पहिला अडथळामुक्त टोल प्लाझा, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील अर्बन एसटेन्शन रोडवरील मुंडका-बक्करवाला येथे कार्यान्वित झाला. मल्टी-लेन फ्री फ्लो प्रणालीचे उद्दिष्ट, दरवर्षी सुमारे २५० कोटी लिटर इंधनाची बचत करणे आणि अंदाजे ८१ हजार टन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे आहे.
भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड : कोलंबियातील बुकारामंगा येथे आयोजित ५६व्या ’आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड २०२६’मध्ये, भारताच्या तरुण भौतिकशास्त्रज्ञांनी उल्लेखनीय कामगिरी करत देशाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली. भारतीय संघाच्या पाचही सदस्यांनी सुवर्णपदके पटकावली असून, या असाधारण कामगिरीमुळे भारताला चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिले स्थान मिळाले. हे यश विज्ञान क्षेत्रातील, भारताची वाढती प्रतिष्ठा आणि जागतिक स्तरावरील उत्कृष्टता अधोरेखित करते.
संरक्षण क्षमता :‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ अर्थात ’डीआरडीओ’ने, राष्ट्राची संरक्षण क्षमता वाढवणार्या तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. दि. १० जून आणि दि. ११ जून रोजी, सलग तीन उड्डाण चाचण्यांमध्ये लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी आणि मध्यम पल्ल्याची जहाजविरोधी क्षमता प्रदान करण्यार्या बहुस्तरीय संरक्षण प्रणालींचे यशस्वी प्रदर्शन करण्यात आले. यामुळे भारताने आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्याची क्षमता असलेल्या, निवडक राष्ट्रांच्या पंगतीत स्थान मिळवले.
क्रीडा क्षेत्र : क्रीडा क्षेत्रात पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या हान यूला पराभूत करून, जपान खुली अजिंक्यपदस्पर्धा जिंकली. बुद्धिबळात, दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी येथे कोनेरू हम्पीवर विजय मिळवून, ‘फिडे महिला विश्वचषक’ विजेतेपद पटकावले. ‘आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये भारताने सात सुवर्ण पदकांसह, एकूण २४ पदकांसह पदकतालिकेत आघाडी घेतली. याव्यतिरिक्त, महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले संघाने, आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने ‘आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक’ अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५२ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
ही आपल्या उल्लेखनीय राष्ट्रवाद्यांची केवळ काही मोजकी कामगिरी आहे. आपण भविष्यात विविध क्षेत्रांमधील त्यांच्या व्यापक कामगिरीचा आढावा घेत, राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो.
राष्ट्राला कमकुवत करणारे विद्ध्वंसक कार्य
तथापि, काही डाव्या विचारसरणीच्या युवा संघटना आणि काही परदेशीअनुदानित गट वेगवेगळे अजेंडे राबवत आहेत. यातून ‘जेन् झी’ आणि ‘जेन अल्फा’ यांना भारत आणि त्याच्या समृद्ध संस्कृतीच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. ते जातीच्या आधारावर फूट पाडतात आणि प्रगती, संशोधन व नवोपक्रमाला विरोध करतात; तसेच अप्रत्यक्षपणे चीन, पाकिस्तान आणि स्वार्थाने प्रेरित जागतिक बाजारपेठेच्या शक्तींना, पाठिंबाही देतात. अनेक तरुण या दिशाभूल करणार्या वृत्तांचेच आज बळी ठरत आहेत. यांना अनेकदा समाज माध्यमे आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या पक्षपाती वृत्तांकनामुळे खतपाणी मिळते. तरुणांनी हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे की, समाजाला आणि राष्ट्राला नेमक अकशाचा फायदा होतो. आपल्या संविधानाला आणि राष्ट्रीय विकासाला धोका निर्माण करणार्या कोणत्याही विचारसरणी नाकारल्याच गेल्या पाहिजेत. योग्य दृष्टिकोनाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे, जी समाज माध्यम आणि सामुदायिक मेळाव्यांच्या माध्यमातून केली जाऊ शकते. प्रत्येक राष्ट्रासमोर आव्हाने असली, तरी सकारात्मक बदल घडवून आणू शकणार्या उपायांवर लक्ष केंद्रित करणेही महत्त्वाचे आहे. तरुणांनी भारताला कमजोर करू पाहणार्या शक्तींशी हातमिळवणी करणे टाळावे; कारण अशा युतींमुळे त्यांच्या भविष्यातील प्रगती आणि राष्ट्राची स्थिरता धोक्यात येऊ शकते.
डॉ. पंकज जयस्वाल
७८७५२१२१६१